Goa Denigration Shiva Temple : आग्वाद किल्ल्यावर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महादेवाची पुरातन घुमटी कायमस्वरूपी झाकण्याचा प्रकार !

  • प्रसारमाध्यमांतून वृत्त प्रसारित झाल्यावर घुमटीचे दार उघडले !

  • देव आणि धर्म यांची चेष्टा यापुढे खपवून घेणार नाही ! : ‘बजरंग दला’ची चेतावणी

महादेवाची घुमटी ‘प्लायवूड’ ठोकून बंद केल्याची संतप्त घटना

पणजी, ६ डिसेंबर (वार्ता.) : ऐतिहासिक आग्वाद किल्ल्यावर महादेवाची पुरातन घुमटी आहे. किल्ल्यावर काही दिवसांपूर्वी मोठा ‘इव्हेंट’ (कार्यक्रम) झाल्याने  महादेवाची घुमटी ‘प्लायवूड’ ठोकून बंद केल्याची संतप्त घटना उघडकीस आली आहे. याविषयीचे वृत्त ‘इन गोवा’ या वृत्तवाहिनीवर प्रसारित झाल्यानंतर आणि वृत्तावर दर्शकांकडून आक्रमक प्रतिक्रिया (कॉमेंट्स) व्यक्त झाल्यानंतर किल्ल्याच्या व्यवस्थापनाने घुमटीला लावलेले दार काढले आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ६ डिसेंबर या दिवशी घटनास्थळी भेट देऊन घुमटीतील श्री महादेवाची पूजाअर्चा केली, तसेच कार्यकर्त्यांनी ‘देव आणि धर्म यांची चेष्टा यापुढे खपवून घेणार नाही’, अशी चेतावणी सरकारला दिली आहे.

आग्वाद किल्ल्यावर महादेवाची लहानशी घुमटी आहे. यामध्ये लिंग आणि नंदी आहे, तसेच लिंगाच्या वरती घंटा आहे आणि बाजूला नंदादीप आहे. हे स्थळ पुरातन असल्याचा उल्लेख असलेली एक पाटी जवळच लावलेली आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, ‘‘किल्ल्याच्या व्यवस्थापनाच्या मते त्या ठिकाणी कुणीही कचरा वगैरे टाकू शकतात; म्हणून घुमटी बंद केली. असे असले, तरी उलट घुमटी बंद केल्याने या ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रमाण वाढू शकते. घुमटी असल्यास त्या ठिकाणी कुणीही कचरा टाकणार नाही. घुमटी जवळच्या जागेत ‘इव्हेंट’च्या वेळी मांसाहारी स्वयंपाक केला जातो. हा संतापजनक प्रकार आहे. व्यवस्थापनाने स्थानिक परिस्थितीचे भान ठेवावे आणि देवाच्या जागेवर असे करू नये. स्थानिक आमदार आणि पर्यटनमंत्री यांनी या घटनेची नोंद घ्यावी आणि याची पुनरावृत्ती टाळावी. व्यवस्थापनाने या प्रकरणी सर्वांची क्षमा मागावी, अन्यथा आम्ही पुढील कारवाई करणार आहोत.’’

संपादकीय भूमिका

देवतांच्या विडंबनाच्या विरोधात आवाज उठवणार्‍या बजरंग दलाचे अभिनंदन !