Yunus Government Fired Hindu Police Officers : बांगलादेशात १०० हिंदु पोलीस अधिकार्‍यांना युनूस सरकारने काढून टाकले !

  • नव्या भरतीत हिंदूंना स्थान नाही !  

  • इस्लामी कट्टरतावाद्यांची पोलीसदलात भरती होणार

बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात हिंदु पोलिसांना नोकरीवरून काढून टाकले जात आहे. तसेच नव्या भरतीमध्ये हिंदूंचा समावेश केला जाणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे. हे सर्व काम बांगलादेशाचे अंतरिम सरकार करत आहे. बांगलादेशाच्या पोलीस प्रमुखांनाही यासाठी सूचना देण्यात आल्याचे वृत्त आहे. या वृत्तानुसार बांगलादेशामध्ये अलीकडेच १०० हिंदु पोलीस अधिकार्‍यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. हे अधिकारी महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, पोलीस अधीक्षक आणि विशेष पोलीस अधीक्षक अशा पदांवर तैनात होते. त्यांच्याकडे जिल्ह्यापासून मोठ्या विभागापर्यंतचे दायित्व होते. त्यांच्या जागी इस्लामी कट्टरतावादी असलेल्या अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे. हे नवे अधिकारी ‘जमात-ए-इस्लामी’ या पक्षाशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले आहे.

१ सहस्र ५०० हिंदु उमेदवारांचे अर्ज रहित

बांगलादेशात शेख हसीना सरकारच्या काळात ७९ सहस्र पोलिसांची भरती गेल्या वर्षी करण्यात आली होती. आता ती रहित करण्यात आली आहे. त्यामुळे १ सहस्र ५०० हिंदु उमेदवारांचे अर्जही रहित करण्यात आले आहेत. त्याच्या जागी नवीन भरती होणार आहे. त्यात हिंदु उमेदवार घेतले जाणार नसल्याचा दावा केला जात आहे. या आदेशासाठी बांगलादेशाचे पोलीस प्रमुख बहारुल इस्लाम यांना विशेष सूचना देण्यात आली आहे. पात्र असूनही हिंदूंची निवड केली जाणार नाही, असे सांगण्यात आले आहे. याखेरीज नोकरशाहीत त्यांच्या प्रवेशावरही बंदी आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेश आणि पाकिस्तान येथे हिंदूंना सरकारी नोकरीत, पोलीस दलात स्थान मिळत नाही; मात्र भारतात अधिकाधिक मुसलमानांना सरकारी नोकरीत घेण्यासाठी सरकारच प्रयत्नशील आहे, हे लक्षात घ्या !