Advocate Hari Shankar Jain : केवळ काशी आणि मथुराच नव्हे, तर प्रत्येक मंदिर परत घेणार !

सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ अधिवक्ता पू. हरि शंकर जैन यांचा दृढनिश्‍चय

अधिवक्ता पू. हरि शंकर जैन

नवी देहली – काशी आणि मथुरा येथील मंदिरे घेऊन उर्वरित मुसलमानांना देण्यात येणार नाहीत. प्रत्येक मंदिर परत घेतले जाईल, अशी प्रतिक्रिया सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ अधिवक्ता पू. हरि शंकर जैन यांनी व्यक्त केली आहे. नुकतेच विश्‍व हिंदु परिषदेने ‘काशी आणि मथुरा येथील मंदिरे मुसलमानांनी हिंदूंना परत दिल्यास उर्वरित मंदिरांविषयी आग्रह करणार्‍यांना समजावण्यात येईल’, असे विधान केले होते. त्यावर पू. जैन यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलतांना वरील मत व्यक्त केले. काशी, मथुरा, भोजशाळा, संभल आदी ठिकाणची मंदिरे मुक्त करण्याच्या संदर्भात अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन यांनी याचिका प्रविष्ट केल्या आहेत.

अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन म्हणाले की,

‘तीन देणे आणि उर्वरित सोडणे’ ही विचारसरणी गुलामगिरीचे लक्षण !

मशिदी बांधण्यासाठी जी काही मंदिरे पाडली गेली आहेत, त्यात एकही मंदिर किंवा एक इंचही जागाही आम्ही त्यांच्यासाठी शिल्लक ठेवणार नाही. सर्व परत घेतली जाणार. ‘तीन घेणे आणि उर्वरित सोडणे’ ही विचारसरणी गुलामगिरीचे लक्षण आहे. तसेच ही विचारसरणी आक्रमणकर्त्यांविषयी भीती दर्शवते.

मूठभर लोक संपूर्ण हिंदु समाजाचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत !

मूठभर लोक संपूर्ण हिंदु समाजाचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. जे हिंदू आज तडजोडीबद्दल बोलत आहेत ते स्वतःच्या पायावर गोळी झाडत आहेत. जे हिंदूंना तडजोडीची शिकवण देत आहेत, ते इतिहासावर अन्याय करत असून त्यांना इतिहास कधीही क्षमा करणार नाही.

जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत कायदेशीर लढाई लढून सर्व मंदिरे परत घेणार !

अयोध्या, काशी आणि मथुरा यांविषयी हिंदूंच्या मनात विशिष्ट स्थान आहे.  त्याचप्रमाणे ज्या अन्य ठिकाणी मंदिरे पाडून मशिदी बांधण्यात आल्या, तेथील लोकांच्या मनातही तेथील पाडलेल्या मंदिरांविषयी विशेष स्थान आहे. अशा परिस्थितीत जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत कायदेशीर लढाई लढून मशिदीत रूपांतरित झालेली १० सहस्र मंदिरे परत घेईन. मी सर्व मंदिरे परत घेण्याचा संकल्प केला आहे. देवाच्या नावाने घेतलेला ठराव मोडता येत नाही. अशा परिस्थितीत मला कुणी समजावू शकतो, असे जर कुणाला वाटत असेल, तर ते चुकीचे आहे. ना कुणी मला समजावणार ना आम्हाला कुणी समजून घेणार !