सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील विश्रामगृह लग्नाच्या वर्‍हाडासाठी दिले

बाहेरगावांहून आलेल्या प्राध्यापकांना त्रास !

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील राजकीय पाहुणे, सिनेटचे सदस्य, व्यवस्थापकीय मंडळ आणि प्राध्यापक यांसाठी असलेल्या ‘अतीमहत्त्वाच्या व्यक्तीं’साठी असलेल्या विश्रामगृहातील १३ खोल्या लग्नाच्या वर्‍हाडासाठी दिल्या. कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांच्या तोंडी आदेशानंतर या खोल्या लग्नासाठी दिल्याचे समजते. पुणे जिल्ह्यासह अहिल्यानगर आणि नाशिक येथून आलेल्या सदस्यांना खोल्या उपलब्ध झाल्या नाहीत, म्हणून हा विषय ‘मॅनेजमेंट कौन्सिल’मध्ये (व्यवस्थापकीय मंडळ) उपस्थित करण्यात आला. या प्रकरणी प्राध्यापकांनी तक्रार दिली. (प्राध्यापकांनी तक्रार केली नसती तर हा प्रकार उघडकीस आला नसता ! असे यापूर्वीही घडले आहे का ? याचे अन्वेषण करणे आवश्यक आहे ! – संपादक)

व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य प्रा. संदीप पालवे यांनी विवाहासाठी २ ते ३ दिवस विश्रामगृह वापरणे ठीक आहे; परंतु ८ दिवस खोल्या का दिल्या ? कुणाच्या आदेशानुसार खोल्या दिल्या ? त्याचे भाडे नेमके कोण देणार ? असे प्रश्न या बैठकीमध्ये उपस्थित केले. ‘विद्यापिठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती’चे अध्यक्ष राहुल ससाणे म्हणाले, ‘‘संशोधक विद्यार्थ्यांना विभागाच्या प्रमुखांचे पत्र असल्याविना विश्रामगृहातील खोली मिळत नाही. विद्यार्थ्यांकडून प्रतिदिन ३०० रुपये आकारले जातात. या विश्रामगृहांवर काही विशिष्ट लोकांचे नियंत्रण आहे. मनमानी पद्धतीने गेल्या अनेक वर्षांपासून काही ठराविक लोक विश्रामगृहात रहात आहेत. त्यावर कुलगुरु आणि प्रशासन काहीच कारवाई करत नाही.’’

संपादकीय भूमिका

विद्यापिठातील विश्रामगृहाचा वापर स्वत:च्या लाभासाठी करणारे प्राध्यापक आणि कुलगुरु यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करणे आवश्यक आहे !