सरकारला जागे करण्‍यासाठी किसान सभेद्वारे जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्‍या बीड जिल्‍ह्यात दुष्‍काळी अनुदान मिळेना !

प्रतिकात्मक चित्र

बीड – दुष्‍काळी अनुदान आणि पीक विम्‍याच्‍या मागणीसाठी महाराष्‍ट्र राज्‍य किसान सभेच्‍या वतीने १३ नोव्‍हेंबर या दिवशी येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयावर भव्‍य मोर्चा काढण्‍यात आला. या वेळी भजन आणि कीर्तन यांच्‍या माध्‍यमातून सरकारला जागे करण्‍याचा प्रयत्न करण्‍यात आला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्‍यापासून हा मोर्चा जिल्‍हाधिकारी कार्यालयावर काढण्‍यात आला होता. या वेळी मोर्च्‍यामध्‍ये शेतकरी टाळ आणि मृदुंग घेऊन सहभागी झाले होते. सरकारने आपला शब्‍द पाळला नसल्‍याने राज्‍य आणि केंद्र सरकारच्‍या विरोधात शेतकर्‍यांनी घोषणा दिल्‍या.

बीड जिल्‍ह्यातील शेतकर्‍यांना दुष्‍काळी अनुदान मिळत नाही, तसेच पीक विम्‍याचेही पैसे जमा होत नसल्‍याने किसान सभेने आंदोलनाची चेतावणी दिली होती. त्‍यानुसार जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्‍यात आले. विशेष म्‍हणजे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा जिल्‍हा असलेल्‍या बीड येथेच शेतकर्‍यांना दुष्‍काळी अनुदानासाठी आंदोलन करावे लागत असल्‍याने याची सर्वत्र चर्चा होत आहे.

बीड जिल्‍ह्यामध्‍ये पावसाचे प्रमाण अल्‍प झाल्‍याने सोयाबीन आणि कापूस या पिकांच्‍या उत्‍पादनामध्‍ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्‍यात या दोन्‍ही पिकांना अधिकचा भाव मिळत असल्‍याने आणि त्‍यात घट झाल्‍याने शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. पाणी उपलब्‍ध नसल्‍याने रब्‍बी हंगाम घेणेही शेतकर्‍यांना शक्‍य नाही. त्‍यामुळे ‘सरकारने तात्‍काळ उर्वरित पीक विमा आणि शेतकर्‍यांना दुष्‍काळी अनुदान द्यावे’, अशी मागणी किसान सभेच्‍या वतीने करण्‍यात आली आहे.