सनातन धर्म सोडून जगणे म्हणजे स्वार्थीपणाचे लक्षण ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

ठाणे जिल्ह्यातील ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि हितचिंतक यांना मार्गदर्शन

डावीकडून श्री. सुनील कदम आणि मार्गदर्शन करतांना पू. रमानंद गौडा

ठाणे – कलियुगात मागील ३ पिढ्यांनी धर्माचरण, धर्म-संस्कृतीचे पालन केले नाही. त्यामुळे आज हिंदु धर्म आणि हिंदूंवर विविध आक्रमणे होत आहेत. त्यांना कुणीही वाली उरलेला नाही. या उलट मुसलमान, ख्रिस्ती यांना त्यांच्या पंथाचा अभिमान आहे.  हिंदूंनी आपल्या धर्माचे शिक्षण घेऊन स्वतःची पारमार्थिक उन्नती करून घ्यायला हवी. ‘सनातन धर्म सोडून जगणे, म्हणजे स्वार्थीपणाचे लक्षण आहे’, असे आपल्या धर्मग्रंथात लिहिले आहे, तसेच संत आणि महात्मे यांनी सांगितले आहे. त्यामुळे सनातन धर्माचा अवलंब करा, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी केले. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, डोंबिवली आणि अंबरनाथ येथील वाचक अन् हितचिंतक यांच्याशी त्यांनी अष्टांग साधना, त्याचे महत्त्व, मनुष्यजन्माचे सार्थक, षडरिपूंवर नियंत्रण, धर्मशिक्षणाची आवश्यकता आदी सूत्रांवर पू. गौडा यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सनातन संस्थेच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांची वंदनीय उपस्थिती होती. हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

पू. गौडा पुढे म्हणाले, ‘‘पारमार्थिक उन्नती करण्यासाठी सर्वश्रेष्ठ साधना योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे. मनुष्य हाच एकमेव जन्म आहे की, ज्यात आपण हे साध्य करू शकतो. बाकी जन्मांत हे शक्य होत नाही. पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धत होती. त्यात धर्मशिक्षण, धर्माचरण, साधनेचे महत्त्व आदी सूत्रांवर मार्गदर्शन केले जात होते; मात्र त्यानंतर आलेल्या मेकॉले शिक्षणपद्धतीतून चुकीचे शिक्षण देण्यात आले. त्याचाच परिणाम आज दिसून येत आहे. सनातन संस्थेच्या माध्यमातून धर्मशिक्षण, धर्माचरण, पारमार्थिक उन्नती आदींवर मार्गदर्शन केले जाते आणि समाजातील व्यक्तींना साधनेचे महत्त्व पटवून दिले जाते. समाजातील एखादी व्यक्ती अन्य संप्रदाय, गुरु परंपरेच्या माध्यमातून साधना करत असेल, तरी सनातन सांगत असलेल्या मार्गाचाही अभ्यास करून प्रत्येकाने योग्य मार्ग अवलंबावा. आपण जी साधना करतो, त्यातून आनंद मिळाला पाहिजे. तसे झाल्यासच भविष्यात ईश्वरप्राप्ती (मोक्ष) होऊन जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून आपली सुटका होईल अन् मनुष्यजन्माचे खर्‍या अर्थाने सार्थक होऊ शकेल.’’