सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या वेळी साधकांना देण्यात आलेल्या उत्सवचिन्हाच्या (बिल्ल्याच्या) संदर्भातील अनुभूती

‘संत म्हणजे चैतन्याचे स्रोत ! ‘अनेक तीर्थक्षेत्री जाऊन आल्यावर मिळणारे फळ गुरुस्वरूप संतांचा सत्संग आणि त्यांची केलेली सेवा यांद्वारे मिळते’, अशी अनुभूती अनेक साधक अन् शिष्य यांनी घेतली आहे. संतांनी वापरलेल्या वस्तू, त्यांचे कपडे, त्यांचे लिखाण आणि त्यांच्याशी संबंधित प्रत्येक वस्तूमध्ये चैतन्य सामावलेले असते अन् प्रत्येक वस्तूमधून सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होते. त्यामुळे अशा वस्तू जपून ठेवण्याची पद्धत रूढ आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या वेळी साधकांना देण्यात आलेल्या उत्सवचिन्हाच्या (बिल्ल्याच्या) संदर्भातील अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या वेळी साधकांना देण्यात आलेले उत्सवचिन्ह

१. प.पू. भक्तराज महाराज यांच्या ७५ व्या जन्मदिनाच्या सोहळ्याच्या वेळी दिलेल्या उत्सवचिन्हाप्रमाणेच ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या वेळी साधकांना देण्यात आलेल्या उत्सवचिन्हाच्या संदर्भात अनुभूती येणे

मी लहान असतांना वर्ष १९९५ मध्ये प.पू. भक्तराज महाराज यांच्या इंदूर (मध्यप्रदेश) येथे झालेल्या ७५ व्या जन्मदिनाच्या सोहळ्याचे आयोजन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केले होते. त्या वेळी साधकांना त्या सोहळ्यास उपस्थित रहाण्यासाठी उत्सवचिन्हे देण्यात आली होती. त्या वेळी देण्यात आलेले ते उत्सवचिन्ह आजही पाहिले, तरी प.पू. भक्तराज महाराज यांच्या अस्तित्वाची अनुभूती येते आणि आपण त्या सोहळ्यातील चैतन्य अनुभवू लागतो, तसेच आपल्या पूर्ण देहामध्ये चैतन्य प्रवाहित होत असल्याचे जाणवते.

तशीच अनुभूती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या वेळी साधकांना देण्यात आलेल्या उत्सवचिन्हाच्या संदर्भातही येते.

सौ. प्रियांका गाडगीळ

२. संत चैतन्याच्या स्थितीत राहून विश्‍वमनाद्वारे कार्य करत असल्याने त्यांच्याशी संबंधित वस्तूंमधूनही चैतन्य (सकारात्मक ऊर्जा) बाहेर पडत असणे

संतांचा मनोलय झालेला असतो आणि त्यांची त्रिगुणातीत होण्याकडे, म्हणजे निर्गुणाकडे वाटचाल चालू असते. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील त्रिगुणांचे प्रमाण अल्प होत जाऊन शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांचे प्रमाण वाढत आहे. त्यांचा मनोलय झालेला असल्याने त्यांच्याकडून विश्‍वमनातून येणार्‍या विचारांनुसार अधिकांश कर्मे होत असतात. अधिकांश वेळ ते शिवात्मादशेत असतात, तर कर्म करतांना ते काही काळासाठी जीवात्मादशेत येतात. जीवात्मादशेतही कार्यासाठी आवश्यक त्या स्वरूपात त्यांच्यातील त्रिगुण कार्य करतात. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित वस्तूंमधूनही कार्याच्या प्रकारानुसार चैतन्य प्रक्षेपित होते.

२ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी दिलेले उत्सवचिन्ह केवळ उत्सवचिन्ह नसून चैतन्याचा स्रोत असणे

‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात’, या अध्यात्मातील नियमानुसार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या वेळी साधकांना देण्यात आलेल्या उत्सवचिन्हाच्या स्वरूपात ब्रह्मोत्सवाच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी धारण केलेले विष्णुरूप आणि त्याच्याशी संबंधित शक्ती साधकांच्या मनात अनेक वर्ष सामावून रहाणार आहे. त्यामुळे हे केवळ उत्सवचिन्ह नसून चैतन्याचा स्रोत असल्याचे मला जाणवले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या सोहळ्याच्या वेळी साधकांना देण्यात आलेले उत्सवचिन्ह मी माझ्या घरातील देवघरात ठेवले आहे. त्याची पूजा केल्यानंतर दिवसभर त्यातून चंदनाचा सुगंध येतो आणि सूक्ष्मातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ते मनोहारी विष्णुरूप न्याहाळत असल्याची अनुभूती मला येते.’

– सौ. प्रियांका गाडगीळ, डोंबिवली. (२२.८.२०२३)

• या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक