गोवा : विद्यालयाच्या व्यवस्थापनावर कारवाई होण्याची शक्यता

दाबोळी येथील केशव स्मृती विद्यालयातील हिंदु विद्यार्थ्यांना मशीद दर्शन घडवल्याचे प्रकरण

वास्को, १३ सप्टेंबर (वार्ता.) – दाबोळी येथील केशव स्मृती विद्यालयातील हिंदु विद्यार्थ्यांना अनधिकृतपणे मशिदीत इस्लामी कार्यशाळेसाठी पाठवल्याच्या प्रकरणी विश्व हिंदु परिषद आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी आंदोलन केल्यानंतर विद्यालयाच्या व्यवस्थापनाने विद्यालयाचे प्राचार्य शंकर गावकर यांना सेवेतून निलंबित केले होते. या प्रकरणी केशव स्मृती उच्च माध्यमिक विद्यालयाने १२ सप्टेंबर या दिवशी शिक्षण खात्याला अहवाल सुपूर्द केला आहे. खात्याने हा अहवाल सरकारला पाठवला असून या प्रकरणी अन्वेषण चालू आहे. या प्रकरणी विद्यार्थ्यांना मशिदीत नेऊन धार्मिक कृती करण्यास भाग पाडले असल्यास विद्यालयाच्या व्यवस्थापनावरही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी केवळ प्राचार्यच नव्हे, तर व्यवस्थापनही उत्तरदायी ठरत असल्याने त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्यांचा प्राचार्यांच्या समर्थनार्थ मोर्चा

मशिदीत हिजाब परिधान करण्यास सक्ती न केल्याचा दावा

वास्को – केशव स्मृती विद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थ्यांनी १३ सप्टेंबर या दिवशी दाबोळी येथे मोर्चा काढून विद्यालयाच्या प्राचार्यांवर कारवाई न करण्याची मागणी केली (अल्पवयीन विद्यार्थ्यांची ढाल बनवून विद्यालयाच्या कृतीवर पांघरूण घालण्याचा हा प्रयत्न आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यांना योग्य-अयोग्य समजू शकत नाही आणि असे विद्यार्थी शाळेच्या समर्थनार्थ मोर्चा कसा काढू शकतात ? विद्यार्थ्यांचा वापर करून शाळेच्या गैरकृत्याला पाठीशी घालण्याचा हा प्रकार असून याची चौकशी झाली पाहिजे. विद्यार्थ्यांना मोर्चा काढण्यास कुणी उद्युक्त केले, ते शोधले पाहिजे. विद्यालयाने हे प्रकरण उघडकीस येण्यापूर्वी ‘हा प्रकार अन्य कुणालाही सांगू नका’, असे विद्यार्थ्यांना सांगितले होते आणि म्हणून अनेक दिवस हे प्रकरण दडपून राहिले आणि पुष्कळ दिवसांनंतर सामाजिक माध्यमाद्वारे हे प्रकरण उघडकीस आले आहे, हे येथे लक्षात घेतले पाहिजे ! – संपादक)

 (सौजन्य : Prudent Media Goa)

या वेळी काही विद्यार्थिनींनी मशिदीत हिजाब घालण्यास सक्ती न केल्याचा दावा केला. या वेळी काही विद्यार्थिनी म्हणाल्या, ‘‘आम्ही डोक्यावर गणवेशाचा दुपट्टा सन्मान राखण्यासाठी घेतला होता आणि यासाठी आम्हाला कुणीही सक्ती केली नाही.’’ (कुणीही सक्ती केली नाही, तरी मशिदीत जर मुसलमान महिलांना जाण्यास बंदी आहे, तर अन्य धर्मीय मुलींना तेथे कसे काय नेण्यात आले आणि त्याला मौलानांनी अनुमती कशी दिली ? म्हणजे ते  मौलाना इस्लामचे पालन योग्यरित्या करत नाहीत. आधी बुद्धीभेद आणि नंतर धर्मांतर हाच उद्देश ठेवून मुलींना मशिदीत प्रवेश दिला गेला असावा ! – संपादक)


हे ही वाचा –

गोवा : सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ३० हिंदु विद्यार्थ्यांना मशिदीत पाठवून इस्लामनुसार कृती करायला लावली !
https://sanatanprabhat.org/marathi/719656.html