तेलंगाणात तरुणीवर बलात्कार करणार्‍या वासनांधाचे घर संतप्त नातेवाइकांनी पेटवले !

पोलिसांच्या गाड्याही पेटवल्या

प्रतिकात्मक छायाचित्र

भाग्यनगर – तेलंगाणातील गुडीहतनूर गावात तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणार्‍या वासनांध तरुणाच्या घरावर मुलीच्या कुटुंबियांनी आक्रमण केले आणि घर पेटवले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीची सुटका करण्याचा प्रयत्न केला. या वेळी संतप्त ग्रामस्थांनी पोलीस पथकावरही आक्रमण केले.

याविषयीच्या एका वृत्तानुसार वासनांध तरुणाने पीडित तरुणीचे अपहरण करून तिला त्याच्या घरात कैद करून ठेवले होते. तरुणाने या तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती तरुणीच्या नातेवाइकांना समजताच त्यांनी तातडीने आरोपीचे घर गाठून त्याच्यावर आक्रमण केले. संतप्त नातेवाइकांनी आरोपीचे घर आणि पोलिसांच्या २ गाड्या पेटवून दिल्या.

संपादकीय भूमिका

भारतात बहुतांश बलात्कारांच्या प्रकरणात पीडीतांना न्याय मिळत नाही. त्यामुळेच जनता आता कायदा हातात घेऊन अशा कृती करत आहे. हे व्यवस्थेला लज्जास्पद !