४ आरोपींना अटक
बुलढाणा – येथील समृद्धी द्रुतगती महामार्गावर डिझेल चोरीच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे. यासाठी महागड्या चारचाकी वाहनांचा सर्रास वापर करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी ४ आरोपींना अटक केली आहे.
किरण कुमार लिंगया कनुकुंटल या प्रकरणातील तक्रारदार असून त्यांनी महामार्गावर त्यांचे मालवाहू वाहन थांबवून विश्रांती घेतली. ते गाढ झोपेत असतांना त्यांच्या वाहनातील पाऊण लाख रुपये किंमतीचे डिझेल अज्ञातांनी चोरले, तसेच वाहनाची समोरील काच फोडल्याचे दिसून आले. या प्रकरणी प्रविष्ट केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी घातलेल्या धाडीत लक्ष्मण उपाख्य संतोष गुलाब लहाने, निलेश संतोष भारूडकर आणि देविदास प्रकाश दसरे यांना कह्यात घेण्यात आले. त्यांच्याकडेन २ चारचाकी आणि ३५ लिटर क्षमतेचे ४ प्लास्टिक कॅन शासनाधीन करण्यात आले. तिघांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी चौथ्या सहकार्याची माहिती दिली. त्यानंतर सचिन परशराम घुबे (वय २१ वर्षे) याला अटक करण्यात आली. त्याने डिझेल चोरल्याचे मान्य केले. या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाअशा चोरट्यांना कारागृहातच डांबायला हवे ! |