राज्‍यभरात दहीहंडीचा कार्यक्रम उत्‍साहात साजरा !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – ‘गोविंदा रे गोपाळा’, ‘आला रे आला गोविंदा आला’, या गोविंदाची गाण्‍यांच्‍या तालावर राज्‍यभरात दहीहंडीचा कार्यक्रम उत्‍साहात पार पडला. अनेक ठिकाणी राजकीय पक्षांनी दहीहंडीचे आयोजन केले होते. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० हून अधिक दहीहंड्यांच्‍या कार्यक्रमांना उपस्‍थिती लावली. उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍यासह विविध राजकीय पक्षाच्‍या नेत्‍यांनी दहीहंडीच्‍या कार्यक्रमांना उपस्‍थिती लावली. या वेळी अनेक ठिकाणी सहस्रावधी नागरिक जमले होते. चित्रपटसृष्‍टीतील कलाकारांनी दहीहंडीच्‍या कार्यक्रमाच्‍या ठिकाणी उपस्‍थिती लावली. दहीहंडीच्‍या कार्यक्रमांसाठी लाखो रुपयांची पारितोषिके ठेवण्‍यात आली होती. दहीहंडी फोडणार्‍या पथकासह अन्‍य पथकांनाही प्रोत्‍साहनपर पारितोषिके देण्‍यात आली. मुंबई, ठाणे भागांत काही ठिकाणी दहीहंडी फोडण्‍यासाठी अधिकाधिक ९-१० थर उभारण्‍यात आले होते. ठाणे येथे दहीहंडी उत्‍सवात १३ गोविंदा घायाळ झाले आहेत.

गर्दीसाठी नृत्‍यांगनांच्‍या नाचगाण्‍यांच्‍या कार्यक्रमांचे आयोजन !

दहीहंडीच्‍या कार्यक्रमांना गर्दी जमवण्‍यासाठी राज्‍यात नृत्‍यांगनांच्‍या कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते. बोरीवली येथील मागाठाणे येथे दहीहंडीला लावणी नृत्‍यांगना गौतमी पाटील यांचा नाच आयोजित करण्‍यात आला होता. ‘हे सरकार तुम्‍ही मार्केट केले जाम’ अशा प्रकारच्‍या गाण्‍यांच्‍या तालावर नाच करण्‍यात आला. पारंपरिकतेला बगल देऊन हे कार्यक्रम अश्‍लीलतेकडे झुकलेले पहायला मिळाले.

दहीहंडीचे लावणीच्‍या कार्यक्रमाप्रमाणे वृत्तांकन !

गौतमी पाटील यांच्‍या नृत्‍याचे वृत्तांकन करतांना बहुतांश प्रसारमाध्‍यमांनी ‘गौतमी पाटील यांच्‍या दिलखेचक अदांनी तरुणाई घायाळ’, ‘सबसे कातील गौतमी पाटील’ अशा प्रकारे वृत्तांकन केले. दहीहंडीची परंपरा सांगण्‍याऐवजी वृत्तवाहिन्‍यांनी गौतमी पाटील यांनी कोणती साडी नेसली ? त्‍यांनी घातलेल्‍या नथीचे वैशिष्‍ट्य अशा प्रकारची वृत्ते दाखवली. (लोकशाहीचा चौथा आधारस्‍तंभ म्‍हणवणार्‍या प्रसिद्धीमाध्‍यमांनी समाजाला दिशा देणारे वृत्तांकन करून पत्रकारितेचा दर्जा टिकवून ठेवावा ! – संपादक)