भर वर्गात विद्यार्थिनींना श्वसनाचा त्रास : डिचोली (गोवा) येथील उच्च माध्यमिक विद्यालयातील घटना

  • १० मुली रुग्णालयात भरती

  • ‘पेपर स्प्रे’चा वापर झाल्याचा निष्कर्ष

डिचोली येथील उच्च माध्यमिक विद्यालयात ‘पेपर स्प्रे’चा वापर !

डिचोली, १७ ऑगस्ट (वार्ता.) – येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयात कला शाखेच्या ११ वीच्या वर्गातील ११ विद्यार्थिनींना १७ ऑगस्ट या दिवशी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वर्ग चालू असतांनाच अचानक श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागला, तर काहींची शुद्ध हरपली. यामुळे त्यांना तात्काळ डिचोली आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले; परंतु त्यातील १० जणांची प्रकृती गंभीर वाटल्याने त्यांना अधिक उपचारासाठी म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. वर्गात ‘पेपर स्प्रे’चा वापर झाल्याने हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे डिचोली परिसरात खळबळ माजली आहे. पालकांनी या प्रकरणी संताप व्यक्त करून व्यवस्थाप मंडळाने सखोल अन्वेषण करून प्रकरणाचा उलगडा करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

स्थानिक आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी विद्यार्थिनींच्या प्रकृतीची चौकशी करून घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळानेही रुग्णालयात भेट देऊन विद्यार्थिनींच्या प्रकृतीची चौकशी केली. म्हापसा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या विद्यार्थिनींची प्रकृती सुधारत आहे. त्यांच्या डोळ्यांना दाह होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अन्वेषण चालू केले आहे. पोलिसांनी ‘सीसीटीव्ही फूटेज’ कह्यात घेतले आहे.

 (सौजन्य : OHeraldo Goa)

‘पेपर स्प्रे’ म्हणजे काय ?

‘पेपर स्प्रे’ हा अडचणीच्या प्रसंगी आत्मसंरक्षणासाठी वापरण्यात येतो. यामध्ये ‘ओलिओरेसिन कॅप्सिकम्’ हा घटक असतो. ‘ओलिओरेसिन कॅप्सिकम्’ हे अनेक प्रकारच्या गरम मिरच्यांमध्ये आढळणारे नैसर्गिक तेल आहे, तसेच ‘पेपर स्प्रे’मध्ये अन्य एक घटक अत्यंत दाहक असतो. ज्यामुळे डोळे आणि श्वसनमार्ग यांना अडथळा निर्माण होत असतो.

पोलिसांचे विद्यालयाच्या व्यवस्थापनाला पत्र

संशयित अल्पवयीन असल्याने आम्ही कारवाई करू शकत नाही, विद्यालयाच्या व्यवस्थापनाने कठोर कारवाई करावी !

डिचोली येथील घटनेवरून पोलिसांना ‘पेपर स्प्रे’चा वापर करणार्‍या ४ विद्यार्थ्यांची ओळख पटली आहे; मात्र हे विद्यार्थी अल्पवयीन असल्याने पोलीस त्यांच्यावर कोणतीच कारवाई करू शकत नाहीत. या प्रकरणी पोलिसांनी विद्यालयाच्या व्यवस्थापनाला एक पत्र लिहिले आहे. यामध्ये पोलीस म्हणतात, ‘‘विद्यालयाच्या व्यवस्थापनाने दोषी विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करावी. गैरवर्तन करणार्‍या विद्यार्थ्यांना विद्यालयातून बडतर्फ करावे.’’