हिंदु, हिंदुत्व आणि राहुल गांधी !

‘राजस्थानमधील जयपूर येथे काँग्रेसने १२.१२.२०२१ या दिवशी महागाईविरुद्ध एका फेरीचे आयोजन केले होते; पण या फेरीत महागाईविरुद्ध बोलण्याऐवजी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची जीभ नेहमीप्रमाणे हिंदूंविरुद्धच घसरली. याही वेळी त्यांनी निरर्थक, विसंगत आणि हिंदूंना भ्रमित करणारी विधाने केली. ते म्हणाले, ‘‘या देशात वर्ष २०१४ पासून हिंदुत्वनिष्ठांची सत्ता आहे, हिंदूंची नाही. या हिंदुत्वनिष्ठांना सत्तेतून बाहेर काढा आणि देशात पुन्हा हिंदूंची सत्ता आणा. मी स्वतः हिंदु आहे; पण हिंदुत्वनिष्ठ नाही. देशात या दोन शब्दांचा संघर्ष आहे. म. गांधी हिंदु होते, तर गोडसे हिंदुत्वनिष्ठ होते.’’ खरे तर राहुल गांधी यांनी हिंदु, हिंदुत्व आणि हिंदुत्वनिष्ठ म्हणजे काय ? या भानगडीत पडायलाच नको; कारण हिंदु आणि हिंदुत्व समजून घ्यायला त्यांना कित्येक जन्म घ्यावे लागतील ! ‘कोणताही अभ्यास न करता बेधडकपणे विधाने करणे’, ही राहुल गांधी यांची नित्याची सवय आहे. म्हणूनच मग प्रत्येक विधान त्यांच्या अंगलट येते. त्यांनी केलेल्या हिंदु आणि हिंदुत्वनिष्ठ या विधानात पुष्कळ प्रमाणात विसंगती आहे.   

(भाग १)

श्री. शंकर गो. पांडे

१. हिंदु समाज जागृत होत आहे !

मुळात या देशातील हिंदु (समाज) पूर्वी कधी नव्हता एवढा जागृत झाला आहे. त्याला स्वतःचे मूळ सत्त्व आणि स्वत्वाची प्रकर्षाने जाणीव होत आहे. त्यामुळे तो एकत्रित होत आहे. त्यामुळेच त्याने नेहमी हिंदूंच्याच मतावर सत्तारूढ होऊन हिंदूंचाच द्वेष करणार्‍या पक्षांना झिडकारून संघसमर्थित हिंदुत्वनिष्ठ पक्ष असणार्‍या भाजपला वर्ष २०१४ आणि २०१९ या वर्षी झालेल्या दोनही निवडणुकांत प्रचंड बहुमताने निवडून दिले. समवेतच काँग्रेसला लोकसभेत विरोधी पक्ष नेतेपदही मिळू नये एवढ्या मोठ्या प्रमाणात पराभूत केले.

२. मोदी यांचे लोकप्रिय नेतृत्व !

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी एकीकडे देशाचे शत्रू असणारे चीन, पाकिस्तान, तसेच आतंकवादी अशा बहिर्गत आणि देशातंर्गत असणार्‍या शत्रू अन् देशद्रोही यांचा पक्का बंदोबस्त करण्याचा, तर दुसरीकडे इतके दिवस अपमानित झालेल्या हिंदु श्रद्धाकेंद्रांचा गौरव करण्याचा धडाका लावला. शेकडो जनकल्याणकारी आणि सर्वच क्षेत्रांत भारताला आत्मनिर्भर करण्याच्या योजना कार्यवाहीत आणल्या. नरेंद्र मोदी यांच्या प्रामाणिक, कणखर, मुत्सद्दी; परंतु भावनाशील नेतृत्वामुळे एकीकडे त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख सारखा वाढतच चालला आहे. मुख्य म्हणजे विकासाच्या कोट्यवधींच्या योजना केवळ आखल्याच नाही, तर त्या मुदतीच्या आत पूर्णही केल्या; पण नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील एकाही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा एक शिंतोडाही उडवता आला नाही.

३. विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये हिंदूंच्या धार्मिक कृती करण्याची शर्यत !

राहुल गांधी

या देशातील हिंदू आता जागृत आणि संघटित होत असलेला पाहून आतापर्यंत हिंदूंना अन् त्यांच्या भावनांना, तसेच श्रद्धास्थानांना सतत पायदळी तुडवणार्‍या, जे धर्मांध आणि कट्टर आहेत त्यांना धर्मनिरपेक्षतेची शिकवण देण्याऐवजी जे जन्मतःच सहिष्णु अन् समंजस आहेत, त्या हिंदूंनाच धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजणार्‍या अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये आता स्वतःला ‘धार्मिक’ हिंदू म्हणवून घेण्याची जणू शर्यत लागली आहे. राहुल गांधी आणि प्रियंका वढेरा हिंदूंची पारंपरिक वेषभूषा करून मंदिरात जाऊन पूजा करू लागले आहेत. राहुल गांधी, तर स्वतःला ‘शांडिल्य गोत्री’ ब्राह्मण म्हणवून घेत सदर्‍याच्या वरून जानवे घालू लागले. धोतरात पाय अडकून पडत असले, तरी धोतर नेसू लागले. प्रियंका वढेरा साडी नेसून गंगास्नान करत ओलेत्याने गंगेला पाण्याचे अर्घ्य देऊ लागल्या.

देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल हनुमानाच्या मंदिरात जाऊन चक्क ‘हनुमान चालिसा’ म्हणत आहेत. बंगालमध्ये सातत्याने मुसलमानांच्या दाढ्या कुरवाळणार्‍या, तेथील हिंदूंना जगणे नकोसे करणार्‍या, अनेक हिंदूंच्या धर्मांधांकडून हत्या होऊनही डोळ्यांवर कातडे ओढून घेणार्‍या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुर्गादेवीच्या मंदिरात जाऊन ‘चंडीस्तोत्र’ म्हणू लागल्या आहेत, तसेच मुंबईत येताच सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाऊन श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होऊ लागल्या आहेत. सहस्रोे रामभक्तांच्या हत्येने ज्यांचे हात रक्ताने लाल झाले आहेत, ते समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव ब्राह्मणांचे संमेलन भरवून भगवान परशुरामांचा भव्य पुतळा उभारण्याच्या बाता मारू लागले आहेत आणि गंगास्नान करून स्वतःला श्रद्धावान हिंदु म्हणवून घेऊ लागले आहेत. एकेकाळी ‘‘तिलक (ब्राह्मण), तराजू (वैश्य) और तलवार (क्षत्रिय) । इनको मारो जुते चार ।’’ अशा घोषणा देणार्‍या उत्तरप्रदेशाच्या पूर्वमुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा आता ब्राह्मण, वैश्य आणि क्षत्रिय यांना ‘‘हाथी नही गणेश है । ब्रह्मा, विष्णु, महेश है ।’’ असे गौरवू लागल्या आहेत. हिंदू अजून जागृत आणि संघटित झाले, तर हे नेते साधू-साध्वींचा पोशाखही घालायला कमी करणार नाहीत; पण असे सारे सोंगढोंग करूनही शहाणी झालेली जनता मात्र राजकीय नेत्यांच्या या ‘नौटंकी’ला (नाटकांना) कुरवाळण्यास सिद्ध होतांना दिसत नाही. त्यामुळे मग हिंदूंना भ्रमित करणारी विधाने राहुल गांधी यांच्यासारख्यांकडून करण्यात येतात.

४. ‘हिंदु’ शब्दाच्या विविध प्राचीन व्याख्या

मुळात ‘हिंदु’ म्हणजे कोण ? हिंदुत्व म्हणजे काय ? हिंदुत्वनिष्ठ कुणाला म्हणायचे ? याचा यत्किचिंतही अभ्यास राहुल गांधींना नाही. हिंदूंच्या विविध प्राचीन ग्रंथांत तसेच पौराणिक ग्रंथात ‘हिंदु’ या शब्दाच्या अनेक व्याख्या दिल्या आहेत. हिंदूंमधील काही थोर पुरुषांनीही हिंदूंच्या काही व्याख्या केल्या आहेत. काही व्याख्या पुढीलप्रमाणे – ‘हिंदु’ शब्दाची उत्पत्ती वेदकाळापासून झाल्याचे दिसून येते. पुराणातही हा शब्द दिसून येतो. ऋग्वेदात म्हटले आहे, ‘हिमालयं समारभ्य यावत् सिन्धुसरोवरम् । तद्देवनिर्मितं देशं हिन्दुस्थानं प्रचक्षते ॥ – बार्हस्पत्यशास्त्र’ म्हणजे हिमालयापासून हिंदमहासागरापर्यंत पसरलेल्या देवनिर्मित देशाला ‘हिंदुस्थान’ असे नाव आहे. ‘हीनं दूषयति इति हिन्दुः । – शब्दकल्पद्रुम’ म्हणजे ‘जे हीन (निंद्य आणि दूषणास्पद) असते, त्याला जो त्याज्य मानतो तो हिंदु.’   शैव ग्रंथात म्हटले आहे, ‘हीनञ्च दूषयत्येव हिन्दुरित्युच्यते प्रिये । – मेरुतन्त्र, प्रकाश ३३’ म्हणजे ‘शंकर पार्वतीला सांगतात, ‘‘हे प्रिये, जो (स्वतःमधील) हीनत्व (दुर्गुण) नष्ट करतो, तो हिंदु होय !’’ ‘पारिजात हरण’ या पौराणिक नाटकात हिंदूंची व्याख्या करतांना म्हटले आहे, ‘हिनस्ति तपसा पापान् दैहिकान् दुष्टमानसान् । हेतिभिः शत्रुवर्गं च स हिन्दुरभिधियते ॥ (अर्थ : जो आपल्या तपाने शारीरिक आणि मानसिक पापांचा नाश करतो अन् शस्त्राने शत्रूंचा नाश करतो, तो ‘हिंदु’ होय.)

५. स्वामी विवेकानंद यांना अपेक्षित ‘हिंदु’ या शब्दाचा अर्थ

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद एके ठिकाणी ‘हिंदु’ या नामाभिधानाविषयी म्हणतात, ‘‘आपण ‘हिंदु’ आहोत. हिंदु या शब्दाविषयी मला कोणताही वाईट अर्थ ध्वनित करायचा नाही. त्यामध्ये काही वाईट अर्थ आहे, याच्याशी मी सहमत नाही. भूतकाळात ‘सिंधूच्या एका बाजूला रहाणारे ते ‘हिंदू’ इतकाच त्याचा अर्थ होता. जे आपला द्वेष करत आले, त्यांनी या शब्दाला वाईट अर्थ चिटकवला; पण त्याचे काय ? ‘हिंदु या शब्दाने जे उज्ज्वल आहे, जे आध्यात्मिक आहे त्याचा निर्देश व्हावा कि जे लज्जास्पद आहे, जे पायदळी तुडवले गेले आहे, जे दैन्यवाणे आहे अशांचा बोध व्हावा ?’, हे आपल्यावर अवलंबून आहे. हिंदु या शब्दाला कोणत्याही भाषेतील अधिकाधिक गौरवपूर्ण अर्थ आपल्या कृतींनी आणून देण्यासाठी आपण सिद्ध होऊ या.’’ दुसर्‍या एका ठिकाणी स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘मी हिंदु आहे, असे जो बांधव म्हणतो, तो लगेच तुमचा परमप्रिय, परमनिकट आप्त झाला पाहिजे. मग तो कोणत्याही देशातून आलेला असो, तो तुमची भाषा बोलत असो वा अन्य भाषा बोलत असो. असे झाले, तरच तुम्ही स्वतःला हिंदु म्हणवून घेऊ शकता. जर कोणत्याही हिंदूंची वेदना स्वतःच्या वेदनेइतकीच तुमचे हृदय व्यथित करत असेल, तरच तुम्ही हिंदु आहात.’’

६. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ‘हिंदु’ शब्दाची व्याख्या

 

स्वातंत्र्यवीर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदूंची व्याख्या करतांना म्हणतात,

‘‘आसिन्धुसिन्धुपर्यन्ता यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्‍चैव स वै हिन्दुरिति स्मृत: ॥

अर्थ : सिंधू नदीपासून सागरापर्यंत पसरलेल्या या विस्तीर्ण भूभागावर रहाणारे जे लोक या भूमीला आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी मानत असतील, ते हिंदु होय.’’

७. राहुल गांधी यांचे वरीलपैकी एका तरी लक्षणाशी साधर्म्य आहे का ?

मुख्य प्रश्‍न असा आहे की, स्वतःला हिंदु म्हणवून घेत असतांना हिंदूंच्या वरील व्याख्या राहुल गांधी यांना अभिप्रेत आहेत काय ? किंबहुना हिंदूच्या अशा काही व्याख्या त्यांच्या कानावर तरी कधी पडल्या आहेत का ? ‘अज्ञान आणि हीनता यांचा त्याग करणारा तो हिंदु’, हे त्यांना मान्य आहे का ? किंवा स्वामी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी ‘हिंदु’ या शब्दाला गौरव प्राप्त व्हावा, अशी कृती कधी केली आहे का ? किंवा ‘मी हिंदु आहे’, असे म्हणणारा कुणी त्यांना परमप्रिय वाटतो का ? हिंदूंच्या वेदनांनी त्यांचे हृदय कधी व्यथित होते का ? किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात त्याप्रमाणे त्यांना ‘भारत ही आपल्या पूर्वजांची भूमी’ वाटते का ? त्यांना या देशातील सनातन धर्म त्यातील संस्कारासह स्वीकारार्ह आणि पुण्यप्रद वाटतो का ? मुळीच नाही.

८. काँग्रेसची तडफड !

‘हिंदु’ या शब्दाच्या वरील व्याख्या किंवा या शब्दातील उदात्त भाव यांच्याशी त्यांचे काही देणे नाही; किंबहुना राहुल गांधींचा ‘हिंदु’ हा शब्द हिंदुत्वविरोधी आहे. हिंदु म्हणजे चांगले, म्हणजे आम्ही आणि हिंदुत्व म्हणजे वाईट, म्हणजे संघ, भाजप, नरेंद्र मोदी अन् हिंदुत्व विचारसरणीच्या सर्व व्यक्ती. हिंदुत्वनिष्ठांना सत्तेतून बाहेर काढा, म्हणजे भाजपला सत्ताच्युत करा आणि हिंदूंना सत्तेवर बसवा, म्हणजे काँग्रेसला सत्तारूढ करा, असेच राहुल गांधी यांना म्हणायचे आहे. म्हणूनच हिंदूंना भ्रमित करणारे विधान त्यांनी केले आहे.

मासोळीला पाण्याबाहेर काढल्यानंतर जशी तिची तडफड होते, तशीच अवस्था सध्या काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते यांची झाली आहे. तरीही ते सत्तालोलुपतेचा आरोप भाजपवर करतात, हा एक मोठा विनोद आहे. लक्ष्मणपुरी (लखनौ, उत्तरप्रदेश) येथील एका सभेत बोलतांना राहुल गांधी म्हणाले, ‘‘हिंदू सत्याग्रहावर, तर हिंदुत्वनिष्ठ सत्ताग्रहावर विश्‍वास ठेवतात.’’ वस्तूस्थिती काय आहे ? या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. त्यांपैकी ५४ वर्षे काँग्रेसने या देशावर राज्य केले. त्यातही १७ वर्षे पंडित जवाहरलाल नेहरू, १५ वर्षे श्रीमती इंदिरा गांधी, ५ वर्षे राजीव गांधी, १० वर्षे मनमोहन सिंह; पण प्रत्यक्षात सोनिया गांधी असे एकाच नेहरू आणि गांधी घराण्याने तब्बल ४७ वर्षे या देशावर राज्य केले, तरीही राहुल गांधी भाजपवर म्हणजेच हिंदुत्वनिष्ठांवर सत्तालोलुपतेचा आरोप करतात. याला त्यांचे अज्ञान म्हणावे कि निर्लज्जपणा म्हणावा ? असा प्रश्‍न मला पडला आहे !

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.


विश्‍वात होत असलेला भारतगौरव !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढत असतांना दुसरीकडे जगात भारताच्या गौरवातही वाढ होत चालली आहे. आता ‘भारताला डावलून जगाला पुढे जाता येणारच नाही’, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. यासमवेतच इतके दिवस सरकारी तिजोरी मनसोक्त लुटणारे लुटारू आणि अशासकीय संघटना, म्हणजे ‘एन्.जी.ओ.’ यांच्या माध्यमातून या देशाच्या विकासांच्या योजनांना सातत्याने खीळ घालणार्‍या विदेशी धनावर पुष्ट होऊन हिंदुत्व आणि देश द्रोही कारवाया करणार्‍यांचाही पुरता बंदोबस्त झाला. वरील सर्व गोष्टींचे विलक्षण दुःख होत असल्यामुळे केवळ वैफल्यग्रस्त होऊन, राहुल गांधी आणि त्यांचे अन्य सहकारी नेहमीच वाह्यात विधाने करत असतात. त्यांच्या अनेक वाह्यात विधानांपैकी त्यांनी हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठांविषयी केलेले विधान होय !

– श्री. शंकर गो. पांडे

संपादकीय भूमिका

राहुल गांधी यांची हिंदूंच्या बाजूने बोलण्याची खेळी ही निधर्मीपणाची आणि बुध्दीभेदाची असून ती न कळण्याला जनता दूधखुळी नाही !