|
चिपळूण – गेल्या २४ तासांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. येथील वाशिष्ठी नदीनेही आता चेतावणी पातळी ओलांडली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. शहरातील सखल भागांत पाणी साचण्यास प्रारंभ झाला बाजारपेठमध्येही पाणी भरणे चालू झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंग यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत चिपळूणसह जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. या वेळी आमदार शेखर निकम हेही उपस्थित होते.
चिपळूण तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने २१ जुलैपर्यंत कोकणात अनेक ठिकाणी अतीवृष्टीची चेतावणी दिली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खबरदारीच्या उपाययोजना तातडीने कराव्यात, मदतकार्य, तसेच आपत्ती व्यवस्थापनाची पथके सिद्ध ठेवण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंग यांना दिल्या आहेत.
चिपळूणच्या वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी गाठली; अजित पवारांनी दिल्या महत्वाच्या सूचना#chiplun #AjitPawar #maharashtra https://t.co/iuaBFblOPZ
— Lokshahi Marathi (@LokshahiMarathi) July 19, 2023
वाशिष्ठीचे पाणी वाढले असल्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून आवश्यक त्या ठिकाणी नागरिकांचे तातडीने स्थलांतर करावे, तसेच पुरामुळे बाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी दिल्या.
#चिपळूण मध्ये #वाशिष्ठी नदीचं पाणी इशारा पातळीच्या वर… १९ जुलैला दुपारी दीडच्या स्थितीनुसार बाजारपुलाजवळ पाणीपातळी ५.२२ मी. आहे. इशारा पातळी ५ मी. असून, धोका पातळी ७ मीटर आहे. #Flood #ChiplunFlood #Monsoon2023 #Heavyrainfall #FloodAlert @satarkindia #पूर https://t.co/k9l1eG8QWC pic.twitter.com/y2R8s9XLnI
— Kokan Media (@KokanMedia) July 19, 2023
वर्ष २०२१ मध्ये वाशिष्ठी नदीला आलेल्या पुरामुळे चिपळूणमध्ये मोठी वित्तहानी झाली होती. त्या वेळी वाशिष्ठी नदीच्या पात्रातील गाळ काढण्यासाठी विशेष निधी उपमुख्यमंत्री पवार यांनी दिला होता. वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याच्या कामाची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकार्यांकडून या वेळी घेतली. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.