गोवा येथील कला अकादमीच्या खुल्या प्रेक्षागृहाच्या रंगमंचाचे छत कोसळले : नागरिकांमध्ये संताप

या घटनेविषयी रंगकर्मी, कलाकार, विरोधी पक्षांचे आमदार आणि समाजातील विविध स्तरांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे !

पणजी, १७ जुलै (वार्ता.) – एकीकडे निविदा न काढता नूतनीकरण केल्याच्या प्रकाराने गेले काही मास चर्चेत असलेल्या कला अकादमीच्या खुल्या प्रेक्षागृहाच्या रंगमचाचे छत १६ जुलैच्या मध्यरात्री अनुमाने १२.३० वाजता कोसळले. या घटनेविषयी रंगकर्मी, कलाकार, विरोधी पक्षांचे आमदार आणि समाजातील विविध स्तरांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या त्यागपत्राची मागणी विरोध पक्षांनी केली आहे, तर सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी याविषयी श्वेतपत्रिका काढली जाणार असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.

अंदाजे ५४ कोटी रुपये खर्च करून कला अकादमीचे नूतनीकरण करण्यात येत आहे. नूतनीकरणाच्या कामासाठी गेल्या २ वर्षांपासून अधिक काळ कला अकादमी बंद आहे. नूतनीकरण पूर्णत्वास येत असून येत्या काही मासांत याचे उद्घाटन केले जाणार होते. निविदा न काढता नूतनीकरणाचे काम हाती घेतल्याने हे काम प्रारंभापासूनच वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छत मध्यरात्री कोसळल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; परंतु यात लाखो रुपयांची हानी झाली आहे. व्यासपिठावरील अनेक पुरातन आणि दर्जेदार प्राचीन साहित्याची मोठी हानी झाली आहे.

सा.बां.खात्याचा अहवाल आल्यावर  चित्र स्पष्ट होईल ! – गोविंद गावडे,  कला आणि संस्कृती मंत्री

याविषयी कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे म्हणाले, ‘‘खुल्या रंगमंचाचे छत सुमारे ४३ वर्षे जुने होते आणि आम्ही ते काम हाती घेतले नव्हते. प्रेक्षक जेथे बसतात त्याची आणि व्यासपीठ यांची डागडुजी केली होती. सध्या याविषयी सा.बां. खात्याच्या अधिकार्‍यांशी बोलणे झाले आहे आणि त्यांना लवकरच पहाणी अहवाल पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा अहवाल आल्यावर याविषयी काही गोष्टी स्पष्ट होणार आहेत.’’

याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘सा.बां.खात्याच्या प्रधान मुख्य अभियंत्यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली आहे. त्यांचा याविषयी अहवाल आल्यानंतर मी अधिक भाष्य करू शकेन.’’

श्वेतपत्रिका काढणार ! – सार्वजनिक बांधकाम मंत्री

चौकशी अहवाल आल्यानंतर याविषयी श्वेतपत्रिका काढण्यात येणार आहे. कला अकादमीचा नूतनीकरण झालेला भाग लोकांसाठी कधी खुला केला जाणार याविषयी आताच सांगू शकत नाही.

नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर सा.बां. खाते ते कला आणि संस्कृती खात्याला सुपुर्द करणार आहे आणि त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी घटनास्थळाची पहाणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना दिली.

न्यायालयीन चौकशी करा ! – युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

या घटनेला सा.बां. खाते आणि सरकार उत्तरदायी आहे. या घटनेची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.

याविषयी आम्ही विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार आहोत. सरकारमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. हे सरकार ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ करणारे आहे.

मंत्री गोविंद गावडे यांनी पदाचे त्यागपत्र द्यावे ! – ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई

कला अकादमीचा नूतनीकरण घोटाळा मी मागे विधानसभेत उघड केला होता आणि म्हणून भाजपने मला लक्ष्य केले; परंतु आज माझे म्हणणे खरे ठरले आहे.

आजच्या घटनेने भ्रष्टाचार उघड झालेला आहे. सरकारने कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांचे त्यागपत्र घेऊन स्वच्छ चारित्र्य अन् कार्यक्षम व्यक्तीकडे हा पदभार सोपवावा.