गुरुपौर्णिमेनिमित्त संदेश !
समष्टीच्या माध्यमातून अधिक प्रमाणात गुरुकृपा संपादन करता येते
सध्याची स्थिती पाहिली, तर राष्ट्र आणि धर्म संकटात आहेत. ‘लव्ह जिहाद’, ‘धर्मांतर’, ‘पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण’, ‘मंदिरांचे सरकारीकरण’, ‘देवतांचे विडंबन’ अशा प्रकारच्या सर्व गोष्टी होतांना दिसत आहेत. पर्यायाने आपले अस्तित्वच धोक्यात आले आहे. हे सर्व धोके ओळखून त्यावर उपाययोजना काढणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने धर्माचरण, साधना करणे आणि इतरांना धर्माचरण अन् साधना शिकवणे महत्त्वाचे आहे. ही खरी समष्टी साधना आहे. अशा प्रकारे समष्टीच्या माध्यमातून अधिक प्रमाणात गुरुकृपा संपादन करता येते, कारण ‘खर्या शिष्यांना मोक्षाला नेणे’, हे जसे गुरूंचे कार्य असते, तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी, धर्मसंस्थापनेसाठी समाजाला जागृत करणे, हेही गुरूंचे कार्य असते.
सध्याचा काळ हा आपत्काळ आहे. आपत्काळात तरून जाण्यासाठी भगवंताचे भक्त बनणे आवश्यक आहे. ‘न मे भक्त: प्रणश्यति !’, म्हणजे ‘माझ्या भक्ताचा नाश होत नाही.’ हे भगवंताचे वचन आहे. त्यासाठी साधनेचे प्रयत्न झोकून देऊन करूया. (२६.५.२०२३)