गुरुपौर्णिमेनिमित्त संदेश !
‘गुरुपौर्णिमा हा देहधारी गुरु किंवा गुरुतत्त्व यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. हिंदूंच्या धर्मपरंपरेमध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुदर्शन घेणे, गुरुदक्षिणा देणे, गुरुसेवा करणे, तसेच गुरुकार्य करण्याचा संकल्प करणे, यांना विशेष महत्त्व असते. ‘समाजात धर्मसाधनेचा प्रचार करणे आणि धर्मग्लानी आल्यानंतर धर्मसंस्थापनेचे कार्य करणे’, हेही गुरुतत्त्वाचे कार्य आहे. धर्मग्लानी आल्यानंतर आर्य चाणक्य, श्री विद्यारण्यस्वामी, समर्थ रामदासस्वामी आदींनी कार्य केल्याची आधुनिक काळातील अनेक उदाहरणे आहेत. सध्याही समाजात आणि राष्ट्रात सर्वत्र अधर्म वाढीस लागला आहे. सध्याच्या ‘धर्मनिरपेक्ष’ राष्ट्रात समाजाला ‘धर्म म्हणजे काय ?’ हे शिकवलेच गेलेले नसल्याने प्रत्येक जण अधर्माने वागत आहे. अगदी दूधवाल्याने भेसळयुक्त दूध विकण्यापासून डॉक्टरने रुग्णांना लुबाडण्यापर्यंत आणि न्यायाधिशाने ‘सरकारी’ कर्मचार्यांप्रमाणे भ्रष्टाचार करण्याचे प्रसंग प्रतिदिन घडत आहेत. या अधर्माविरुद्ध जागृती करणे, अधर्म रोखण्यासाठी प्रत्यक्ष कृती करणे आणि अधर्म रोखल्यानंतर ती व्यवस्था पुनश्च धर्माला अनुकूल होण्यासाठी प्रयत्न करणे, असे कार्य करणे आवश्यक आहे. आजच्या आधुनिक काळात हीच धर्मसंस्थापना गुरुतत्त्वाला अभिप्रेत आहे. धर्मसंस्थापना म्हणजे केवळ धर्मनिरपेक्ष राष्ट्राला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे नव्हे, तर धर्मग्लानी आलेल्या राष्ट्रातील आणि समाजातील प्रत्येक घटकाला धर्ममय बनवणे होय. त्यामुळे हिंदूंनो, या गुरुपौर्णिमेपासून गुरुसेवा म्हणून प्रत्येक क्षेत्रात धर्मसंस्थापना होण्यासाठी क्षमतेनुसार कार्य करण्याचा संकल्प करा !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था (२०.३.२०२३)