जपानमध्ये आकाशात दिसले हेरगिरी करण्यासाठी वापरण्यात येणारे चिनी फुगे !

  • फुगे दिसल्याची वर्ष २०२१ मधील घटना आता उघडकीस  

  • आवश्यकता पडल्यास फुगे नष्ट करण्याची जपानची घोषणा

टोकियो (जपान) – भारत आणि अमेरिका यांच्यानंतर आता चीनचे हेरगिरी करण्यासाठी वापरण्यात येणारे फुगे, म्हणजेच ‘स्पाय बलून’ जपानच्या आकाशात दिसले. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबर २०२१ मध्ये हे फुगे जपानमध्ये दिसले होते, मात्र त्याची छायाचित्रे आता प्रथमच समोर आली आहेत. ‘बीबीसी पॅनोरामा’ने कृत्रिम बुद्धीमत्तेच्या तंत्रज्ञानावर कार्यरत एका आस्थापनाच्या साहाय्याने जपानमध्ये अशा अनेक चिनी फुग्यांची उपग्रह छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. अशा प्रकारचे चिनी फुगे याआधी अमेरिकेतही दिसले होते.

१. बुद्धीमत्तेच्या तंत्रज्ञानावर कार्यरत असणार्‍या या आस्थापनाचे मालक कोरी जसकोल्स्की यांनी सांगितले की, हे फुगे उत्तर चीनमधून सोडण्यात आले आहेत. हे फुगे पूर्व आशिया पार करतांना दिसले. असे फुगे अत्यंत मोठ्या आकाराचे असतात आणि माहिती गोळा करण्यासाठी उपकरणांनी सुसज्ज असतात.

२. जपानच्या संरक्षण मंत्रालयात काम करणारे युको मुराकामी म्हणाले, ‘‘जपान सरकार अशा प्रकारच्या फुग्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. आवश्यकता पडल्यास देश आणि नागरिक यांच्या रक्षणासाठी ते नष्ट केले जातील.’’

३. माजी ‘सीआयए’  या अमेरिकी गुप्तचर संस्थेतील विश्‍लेषक जॉन कल्व्हर यांनी बीबीसीला सांगितले, ‘‘चीन गेल्या ५ वर्षांपासून अशा प्रकारच्या फुग्यांचा वापर करत आहे. हे फुगे अनेकदा पृथ्वीला प्रदक्षिणा घालत रहातात. हा एका दीर्घ मोहिमेचा भाग आहे.’’

४. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, ‘सीआयए’ने असेही म्हटले होते की, चीन हेरगिरीसाठी वापरण्यात येणार्‍या फुग्यांद्वारे चीन जगभरातील देशांच्या सैनिकी केंद्रांवर लक्ष ठेवत आहे. चीन गेल्या अनेक वर्षांपासून हे करत असून त्याने आतापर्यंत १२ देशांमध्ये असे फुगे पाठवून गोपनीय माहिती गोळा केली आहे. तैवानच्या परिसरातही असेच फुगे दिसले आहेत.

वर्ष २०२२ मध्ये चिनी फुग्यांनी भारतातही केली हेरगिरी !

अमेरिकी संरक्षणतज्ञ एच्.आय. सटन यांनी दावा केला होता की, जानेवारी २०२२ मध्ये चीनच्या अशा फुग्याने भारताच्या सैनिकी तळांची हेरगिरी केली होती. या वेळी अंदमान निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअरवर चिनी फुगे उडतांना दिसले होते. त्या वेळी त्याची छायाचित्रेही सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली होती. त्या वेळी भारताकडून यासंदर्भात कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नव्हती. (धूर्त चीनच्या अशा कारवायांवर वचक बसवण्यासाठी भारताने अन्य देशांचे संघटन करून चीनला समजेल अशा भाषेत त्याला उत्तर दिले पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

धूर्त चीनच्या कुरापतींना उत्तर म्हणून सर्व देशांनी एकत्र येऊन त्याला वाळीत टाकले पाहिजे आणि त्याच्याशी सर्व प्रकारचे संबंध तोडले पाहिजे !