गोवा : अबकारी खात्यात घोटाळा करणार्‍या वरिष्ठ कारकुनाने ११ लाख रुपये परत केले

उर्वरित पैसे भरण्याचा खात्याचा आदेश

पणजी, २४ जून (वार्ता.) – अबकारी खात्यातील बनावट अनुज्ञप्ती आणि बनावट अनुज्ञप्ती नूतनीकरण घोटाळ्याच्या प्रकरणी प्रमुख सूत्रधार असलेल्या खात्यातील वरिष्ठ कारकुनाने खात्यामध्ये ११ लाख रुपये जमा केले आहेत. पेडणे अबकारी कार्यालयात कामावर असतांना या घोटाळ्यातून कमावलेले सर्व पैसे परत करण्याच्या आदेशानंतर संबंधित संशयित वरिष्ठ कारकुनाने हे पैसे परत केले आहेत. खात्याने उर्वरित पैसेही परत करण्याचा आदेश दिला आहे. अबकारी खात्याच्या पेडणे येथील कार्यालयात कामावर असलेल्या संबंधित वरिष्ठ कारकुनाने मद्यविक्रीची दुकाने आणि मद्यालये यांना अनुज्ञप्ती देणे आणि अनुज्ञप्तीचे नूतनीकरण करणे यांसाठी एकूण ७७ व्यावसायिकांकडून पैसे घेतले; मात्र हे पैसे अबकारी खात्याच्या अधिकोषात जमा केलेच नव्हते. खात्याने मद्यविक्रीची दुकाने आणि मद्यालये यांच्या अनुज्ञप्तीचे नूतनीकरण झालेले नसल्याने संबंधित व्यावसायिकांना नोटिसा पाठवण्यास प्रारंभ केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अबकारी खात्याने संबंधित वरिष्ठ कारकुनाला नुकतेच पणजी येथे खात्याच्या मुख्यालयात बोलावून पैसे वसूल करण्याची प्रक्रिया चालू केली आहे.

या प्रकरणात सहभागी असल्याचा संशय असलेल्या अबकारी निरीक्षकाचाही जबाब नोंदवला जात आहे. संबंधित वरिष्ठ कारकुनाकडून संपूर्ण वसुली होईपर्यंत त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. वास्तविक हा घोटाळा वर्ष २०१७ पासून चालू असून तो २८ लाख रुपयांचा असण्याची शक्यता आहे. ‘अबकारी खाते हा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न करत नाही ना ?’, अशी चर्चा सध्या चालू आहे. ‘खात्याने या प्रकरणी अजूनही दक्षता खाते किंवा पोलीस यांच्याकडे तक्रार का प्रविष्ट केलेली नाही ?’, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

दोषींकडून सर्व वसुली करणार आणि  कारवाई होईल ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

मुख्यमंत्री डॉ. सावंत

अबकारी घोटाळा प्रकरणी दोषींकडून सर्व वसुली करून घेण्यात येणार आहे, तसेच संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तरादाखल दिले.

 (सौजन्य : Dainik Gomantak TV)


हे ही वाचा –

गोवा : कारवाईनंतर कह्यात घेतलेल्या मद्याच्या बाटल्यांची काळ्या बाजारात विक्री !
https://sanatanprabhat.org/marathi/695456.html

संपादकीय भूमिका

  • पैसे परत केले, तरी या घोटाळ्यात सहभागी सर्वांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.
  • घोटाळा लक्षात आला; म्हणून पैसे परत केले; पण अशा प्रकारे आणखी किती भ्रष्टाचार संबंधितांनी आणि इतरांनी केला असेल, हे सांगणे कठीण आहे.
  • आर्य चाणक्य यांनी म्हटले होते, ‘पाण्यात मासा पाणी कधी पितो आपल्याला कधीच कळत नाही, त्याप्रमाणे प्रशासनात भ्रष्टाचारी पैसे कसे आणि कधी खातात ? ते कळत नाही !’