गोवा : कारवाईनंतर कह्यात घेतलेल्या मद्याच्या बाटल्यांची काळ्या बाजारात विक्री !

अबकारी खात्यात आणखी एक घोटाळा

कह्यात घेतलेल्या मद्याच्या बाटल्या काळ्या बाजारात !

पणजी, २३ जून (वार्ता.) – अबकारी खात्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा अनधिकृतपणे अनुज्ञप्ती देण्याचा घोटाळा उघडकीस आलेला असतांना आता कारवाईनंतर कह्यात घेतलेल्या मद्याच्या बाटल्या काळ्या बाजारात विकल्या जात असल्याचे उघडकीस आले आहे. अनुज्ञप्ती घोटाळ्यास उत्तरदायी असलेला खात्यातील एक वरिष्ठ कारकूनच या नव्याने उघडकीस आलेल्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार आहे.

धाड टाकून कह्यात घेतलेल्या मद्याच्या बाटल्यांची नियमानुसार खात्यामध्ये अधिकृतपणे नोंदणी करण्याऐवजी या बाटल्या काळ्या बाजारात विकल्या जात होत्या. संबंधित वरिष्ठ कारकुनाला किनारपट्टी  भागात कुठे मद्यविक्रीचे दुकान अथवा मद्यालये अनधिकृतपणे चालू आहेत, याची माहिती होती. तो संबंधित ठिकाणी धाड घालून संबंधित मालकाला दंड भरण्यासाठी ‘चलन’ देत होता आणि कह्यात घेतलेल्या मद्याच्या बाटल्या अबकारी खात्याच्या कार्यालयात नेत होता; मात्र संबंधित कार्यालयातून धाड घालून कह्यात घेतलेल्या मद्याच्या बाटल्या आश्‍चर्यकारकपणे गायब होत होत्या आणि त्यांची काळ्या बाजारात विक्री केली जात होती. या विक्रीतून मिळणारा पैसा संबंधित वरिष्ठ कारकून अबकारी निरीक्षकालाही देत होता. घोटाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर खात्याने वरिष्ठ कारकुनाचे अन्यत्र स्थानांतर करण्यात आले आहे; मात्र त्याच्यावर निलंबनासारखी कारवाई झालेली नाही.


हे ही वाचा –

गोव्यात अबकारी खात्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा मद्य अनुज्ञप्ती घोटाळा
https://sanatanprabhat.org/marathi/695126.html