गुरुस्तवन पुष्पांजली

गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष सदर !

दासबोधातील सद्गुरुस्तवन आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्यातून उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !

१. सूर्यनारायण आणि सद्गुरु

‘आदित्यें अंधकार निवारे । परंतु मागुतें ब्रह्मांड भरे ।
नीसी जालियां नंतरें । पुन्हां काळोखें ।।

तैसा नव्हे स्वामीराव । करी जन्ममृत्य वाव ।
समूळ अज्ञानाचा ठाव । पुसून टाकी ।।

– दासबोध, दशक १, समास ४, ओवी १० आणि ११

अर्थ : सूर्याच्या योगे अंधकार नाहीसा झाला, तरी रात्र झाली की, ब्रह्मांड काळोखाने परत भरून जाते; पण सद्गुरु स्वामीराज तसे नाहीत. ते अज्ञानाचा समूळ नाश करतात. त्यामुळे पुनःपुन्हा जन्म-मरणाच्या फेर्‍यांत सापडावे लागत नाही.’

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१ अ. आपल्या दिव्य प्रभेचे तेज अवघ्या ब्रह्मांडामध्ये पसरवून अज्ञान आणि अंधकार नष्ट करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘सूर्यनारायणाप्रमाणे सर्वत्र ज्ञानरूपी प्रकाश पसरवणारे तत्त्व पृथ्वीतलावर सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांच्या रूपात कार्यरत झाले असले, तरी ते कधीच अस्तास जात नाही. अज्ञानांधकार नष्ट करणार्‍या श्री गुरूंचा तेजोमय प्रकाश उत्तरोत्तर वाढतच आहे आणि त्याची प्रभा अवघ्या ब्रह्मांडामध्ये पसरत आहे. त्या दिव्य प्रभेचे तेज आणि तिचा स्पर्श यांमुळे साधकांचा जन्ममरणरूपी ताप नष्ट होऊन त्यांचा उद्धार होत आहे.

साधकांनो, श्री गुरूंच्या दिव्य प्रभेचा तेजोमय स्पर्श आपण अखंड अनुभवूया आणि ते तेज आपल्या पेशीपेशींमध्ये जाऊन आपले आंतरिक साधनेचे तेज उत्तरोत्तर वाढत आहे, याची अनुभूती घेऊया !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२४.६.२०२३)