वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव – सप्तम दिवस : मान्यवरांचे विचार
रामनाथी (फोंडा), २२ जून (वार्ता.) – मागील १३ वर्षे आम्ही गोरक्षणाचे काम करत आहोत. आतापर्यंत कसायांच्या तावडीतून आम्ही २ लाख गायींची सुटका केली आहे. गोमातेची तस्करी करतांना वाहनांमध्ये गायींना कोंबण्यात येते. त्यांच्या नाकात दोरी घालून त्यांची दुर्दशा केली जाते. सरकारकडून २ सहस्र रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय तत्परतेने घेतला जाऊ शकतो, तर गोमातेला ‘राष्ट्रमाता’ घोषित करण्याचा निर्णय तत्परतेने का होऊ शकत नाही ?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आमची विनंती आहे की, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्यात यावे अन्यथा रस्त्यावर येऊन आम्ही आंदोलन करू. जन्मदात्या आईनंतर गाय आपली माता आहे. आपण गोमातेचे दूध पितो; परंतु तिचे रक्षण करण्यात आपण न्यून पडत आहोत. नांदेड येथे गोरक्षकांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. गोरक्षकांना प्रशासनाकडून सहकार्य मिळत नाही. गोमातेचे रक्षण करण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र यायला हवे, असे वक्तव्य अमरावती येथील श्री महाकाली माता शक्तीपीठ प्रतिष्ठानचे श्री १००८ महाशक्ती पीठाधीश्वर श्री शक्तीजी महाराज यांनी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात केले.