नवी देहली – बनावट औषधे कदापि सहन केली जाणार नाहीत. भारतातील औषधे उत्पादन करणार्या ७१ आस्थापनांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली असून त्यांपैकी १८ आस्थापनांवर बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली. भारताने निर्यात केलेल्या खोकल्याच्या औषधामुळे काही देशांतील रुग्ण मुले मृत्यूमुखी पडली, असा दावा करण्यात आल्याच्या अनुषंगाने मांडविया यांनी वरील कारवाई केली.
मांडविया यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की, औषधांच्या गुणवत्तेवर सातत्याने लक्ष ठेवले जाते. बनावट औषधांमुळे कुणी मृत्यूमुखी पडणार नाही, यासाठी सरकार आणि औषध नियामक संस्था सातत्याने सतर्क असतात. आपण जगाचे औषधालय असून आपल्याला जगाला निश्चितीपूर्वक सांगायला हवे की, ‘आम्ही गुणवत्तापूर्ण औषधे देणारे औषधालय आहोत.’