नक्षलवादी हेच साम्यवादी आणि साम्यवादी हेच नक्षलवादी आहेत, हे न सांगणे, हाच वैचारिक आतंकवाद ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ तृतीय दिवस – मान्यवरांचे विचार

नास्तिकतावाद्यांच्या हत्यामध्ये हिंदुत्वनिष्ठांना गोवण्याचे षड्यंत्र !

विद्याधिराज सभागृह, १८ जून (वार्ता.) – एम्.एम्. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर ६३ लोकांनी ‘पुरस्कार वापसी’ केली. मोहनदास गांधी यांच्या हत्येनंतर मधल्या काळात जणू काही कुणाची हत्या झाल्याच नाहीत आणि दाभोलकर, कलबुर्गी यांच्या हत्यांनंतर भयंकर काहीतरी झाल्याचे वातावरण निर्माण केले गेले.

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

आम्हाला कुणाच्या हत्येचे समर्थन करायचे नाही. नास्तिकतावाद्यांच्या हत्येनंतर हिंदुत्वनिष्ठांना आतंकवादी ठरवले जाते; परंतु ‘साम्यवाद्यांनी किती जणांना मारले ?’, हा प्रश्‍न कुणी विचारेल का ? साम्यवाद्यांनी जगभरात हत्या केलेल्यांचा आकडा १० कोटींहून अधिक आहे. नक्षलवाद्यांनी भारतात केलेल्या हत्या १४ सहस्रांहून अधिक आहेत. नक्षलवाद्यांनी ज्यांच्या हत्या केल्या आहेत, त्यात आदिवासी, आमदार, मंत्री आहेत; परंतु हे आपणाला दाखवले जात नाही. तथाकथित बुद्धीवादी आपणाला दाखवतात, तेच आपण पहातो. साम्यवाद्यांनी भारतातील केलेल्या १४ सहस्र हत्यांपेक्षा आपल्याला ४ नास्तिकतावाद्यांच्या हत्या मोठ्या वाटतात. नक्षलवादी हेच साम्यवादी आहेत आणि साम्यवादी हेच नक्षलवादी आहेत; मात्र हे कुणी सांगत नाही. हाच वैचारिक आतंकवाद आहे. नक्षलवाद्यांनी केलेल्या आक्रमणानंतर साम्यवाद्यांनी कधी शोकसभा घेतली आहे का ? उलट नक्षलवादी कारवायांचे समर्थन केले आहे. भारतावर मोगलांनी केलेल्या आक्रमणांविषयी चर्चा होते, तेव्हा ‘हे ४०० वर्षांपूर्वीचे आहे’, असे सांगितले जाते; परंतु २ सहस्र वर्षांपूर्वीच्या आणि कुठेही लिखित स्वरूपात नसतांना ‘आर्यांनी द्रविडांवर अत्याचार केले’, असे आपल्याला सुनावले जाते. हाच वैचारिक आतंकवाद आहे. केवळ ४ नास्तिकवाद्यांच्या हत्यांविषयी नाही, तर साम्यवाद्यांनी आतापर्यंत केलेल्या सहस्रावधी हत्यांविषयी हिंदुत्वनिष्ठांनी प्रश्‍न उपस्थित करायला हवा, असे वक्तव्य हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले.