‘विकसित भारत २०४७’चे उद्दिष्ट गोवा सर्वांत अगोदर गाठणार ! – ओम बिर्ला, अध्यक्ष, लोकसभा

अधिवेशनांच्या घटत्या कालावधीविषयी चिंता व्यक्त

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचा सन्मान करतांना मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि विधानसभेचे सभापती रमेश तवडकर

पणजी, १५ जून (वार्ता.) – ‘विकसित भारत : २०४७’चे उद्दिष्ट गोवा सरकार सर्वांत अगोदर गाठणार आहे, असा विश्‍वास लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, ‘‘विधानसभांचे कामकाज अल्प दिवस चालणे, ही चिंतेची गोष्ट आहे; मात्र गोव्यात वर्षाकाठी विधानसभेचे ४० दिवस कामकाज होते, ही चांगली गोष्ट आहे.’’

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे १५ जून या दिवशी गोव्यात एक दिवसाच्या भेटीवर आले होते. या वेळी त्यांनी विधानसभा सभागृहात आजी-माजी आमदार, सरपंच, उपसरपंच, नगरसेवक, जिल्हा पंचायत सदस्य यांना ‘विकसित भारत  २०४७ : लोकप्रतिनिधींची भूमिका’ या विषयावर संबोधित केले. या वेळी व्यासपिठावर विधानसभेचे सभापती रमेश तवडकर आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. ओम बिर्ला यांच्या भाषणावर विरोधी पक्षांतील सातही आमदारांनी बहिष्कार घातला.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला पुढे म्हणाले,

‘‘जनतेच्या कल्याणासाठी कायदे बनवतांना विधानसभेत व्यापक चर्चा व्हायला पाहिजे. सध्या विधानसभेच्या कामकाजाचे दिवस घटत चालले आहेत आणि हे योग्य नव्हे. विधानसभेत जेवढी अधिक चर्चा होईल, तेवढे चांगले कायदे सिद्ध होणार आहेत. लोकप्रतिनिधींनी नवनवीन तंत्रज्ञानांचा वापर करून जनतेशी संवाद वाढवला पाहिजे. गोवा हे लहान राज्य असले, तरी जनतेच्या अपेक्षा अधिक असू शकतात. यामध्ये प्राथमिकता निवडून आपण पुढे जायला पाहिजे.’’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘आत्मनिर्भर भारत’ हे स्वप्न पूर्ण करू ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे तेथील कामकाज चांगल्या रितीने हाताळतात.  गोवा विधानसभेला यापूर्वी माजी राष्ट्रपती दिवंगत अब्दुल कलाम यांनी संबोधित केले होते.

गोव्याच्या विकासासाठी गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर, पहिले सभापती पां.पु. शिरोडकर, माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर आणि विधानसभेचे सर्वाधिक काळ आमदार, मुख्यमंत्री, सभापती अन् मंत्री या नात्याने काम केलेले प्रतापसिंह राणे यांचे मोठे योगदान आहे.

कार्यक्रमावर बहिष्कार घालणारे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव विधानसभेच्या बाहेर विधानसभा संकुलात पत्रकारांना म्हणाले,

‘‘कार्यक्रमाविषयी विरोधी पक्षातील आमदारांना विश्‍वासात घेतले नाही. केंद्र आणि राज्य सरकार यांच्या हुकूमशाही धोरणांचा निषेध करण्यासाठी आम्ही कार्यक्रमावर बहिष्कार घातला.’’