सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्सव’ साजरा करण्याविषयी सप्तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सांगितलेली सूत्रे !

‘२३.२.२०२३ या दिवशी सप्तर्षी नाडीपट्टीवाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून झालेल्या नाडीवाचन क्रमांक २२२ मध्ये ‘वर्ष २०२३ मध्ये गुरुदेवांचा जन्मोत्सव कसा साजरा करावा ?’, याविषयी सप्तर्षींनी सांगितलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. वर्ष २०२३ मध्ये गुरुदेवांचा जन्मोत्सव हा ‘ब्रह्मोत्सव’ म्हणून साजरा करावा !

अ. मागच्या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये झालेल्या जन्मोत्सवाच्या वेळी गुरुदेव बाहेरून भाड्याने आणलेल्या एका रथात आरूढ झाले होते. या वर्षी (वर्ष २०२३ मध्ये) होणार्‍या गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या वेळी गुरुदेव लाकडाच्या रथात विराजमान होणार आहेत. यासाठी साधकांनी श्रीविष्णुतत्त्व आकर्षित करणारा एक सुंदर लाकडी रथ तयार करावा.

आ. भूतलावर गुरुदेवांचा हा रथोत्सव पहायला आकाशात त्रिमूर्ती, त्रिदेवी, देवदेवता, ८८ सहस्र ॠषी, यक्ष, किन्नर, गंधर्व, असे सर्व देव – ऋषीगण उपस्थित रहाणार आहेत. या वर्षीचा गुरुदेवांचा जन्मोत्सव हा केवळ ‘रथोत्सव’ नसून हा साक्षात् ‘श्रीविष्णूचा ब्रह्मोत्सव’ असणार आहे. ज्याप्रमाणे तिरुपति येथे श्रीविष्णूचा ब्रह्मोत्सव साजरा केला जातो, तसा उत्सव गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या निमित्त आयोजित करावा.

इ. ज्याप्रमाणे श्रीविष्णूच्या रथात भूदेवी आणि श्रीदेवी असतात, त्याचप्रमाणे गुरुदेवांच्या रथामध्ये त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी असलेल्या भूदेवीचा अवतार श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् श्रीदेवीचा अवतार श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनीही बसावे.

नाडीपट्टी वाचन करतांना पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी

२. ब्रह्मोत्सवाची तिथी आणि वेळ यांचे वैशिष्ट्य

सर्व देवदेवता, सप्तर्षी आणि ऋषीगण यांच्या सभेमध्ये श्रीविष्णूचा चौथा अवतार श्रीनृसिंह अन् श्री महालक्ष्मी यांच्यात जो संवाद झाला, त्याप्रमाणेच आम्ही ११ मे २०२३ या दिवशी गुरुदेवांचा जन्मोत्सव ‘ब्रह्मोत्सव’ म्हणून साजरा करण्यास सांगितले आहे. त्रेतायुगात श्रीविष्णूने नवमी या तिथीला श्रीरामावतार धारण केला. द्वापरयुगात श्रीविष्णूने अष्टमी या तिथीला श्रीकृष्णावतार धारण केला होता आणि आता या कलियुगात श्रीविष्णूने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या रूपात सप्तमी या तिथीला जन्म घेतला आहे. (टीप)  गुरुदेवांचे जन्मनक्षत्र ‘उत्तराषाढा’ आहे. तिरुपति बालाजीचा जन्म ‘श्रवण’ या नक्षत्रात झाला होता. आपण जो ब्रह्मोत्सव साजरा करत आहोत, त्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे षष्ठी आणि सप्तमी या दोन्ही तिथी एकत्र आल्या आहेत, तसेच गुरुदेवांच्या उत्तराषाढा या जन्मनक्षत्राची वेळ संपून तिरुपति बालाजीच्या ‘श्रवण’ या नक्षत्राला आरंभ झाला आहे. श्रीनृसिंह आणि श्री महालक्ष्मी यांची आज्ञा आहे, ‘ज्या वेळी वैशाख कृष्ण सप्तमी ही तिथी असेल आणि ज्या वेळी आकाशात श्रवण नक्षत्राचा काळ आरंभ होईल, त्याच वेळी श्रीविष्णूचा अवतार असलेल्या गुरुदेवांचा ‘ब्रह्मोत्सव’ साजरा करावा.’

टीप : ‘आधी अनेक वर्षे ‘माझा जन्मदिवस षष्ठीला आहे’, असे मला वाटायचे. महर्षींनी सांगितल्यापासून ‘माझा जन्मदिवस सप्तमी आहे’, असे मला कळले.’ – डॉ. जयंत आठवले

श्री. विनायक शानभाग

३. ब्रह्मोत्सवात तीन गुरूंनी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करावे ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी उगवत्या सूर्यासारखे भगव्या रंगाचे रेशमी वस्त्र परिधान करावे. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भूदेवीशी संबंधित हिरव्या रंगाची रेशमी साडी आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी श्रीदेवीशी संबंधित पिवळ्या रंगाची रेशमी साडी नेसावी.

४. रेशमाचे वस्त्र धारण करण्यामागील शास्त्र

रेशमाचा धागा शुक्र या ग्रहाशी संबंधित आहे. शुक्र हा ग्रह यश, समृद्धी आणि कीर्ती यांच्याशी संबंधित आहे, तसेच रेशमाच्या धाग्यात ‘लक्ष्मीकटाक्ष’ आहे, म्हणजे रेशमाच्या वस्त्राकडे बघणार्‍याला श्री महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि म्हणून देवतांच्या मूर्तींना रेशमी वस्त्र नेसवण्याची पद्धत आहे.

५. मैदानाचे रक्षण करण्यासाठी हनुमंत, गरुड आणि आदिशेष सूक्ष्मातून मैदानात उपस्थित असणे !

श्रीरामावतारात शिव हनुमंताच्या रूपात धर्मसंस्थापनेच्या कार्यात साहाय्याला आला होता आणि श्रीकृष्णावतारात महाभारताच्या युद्धाच्या वेळी अर्जुनाच्या रथावर चिरंजीव हनुमंत बसला होता. त्याचप्रमाणे श्रीविष्णूचा अवतार असलेल्या गुरुदेवांच्या रथात ध्वजाजवळ हनुमंत सूक्ष्मातून उपस्थित असणार आहे. गोमंतकाच्या ज्या भूभागावर श्रीविष्णूचा रथ चालणार आहे, त्या मैदानाचे रक्षण अनेक दिवसांपासून गरुड आणि आदिशेष करत आहेत. या मैदानात सर्वांच्या आधीच गरुड आणि आदिशेष सूक्ष्मातून उपस्थित आहेत. वाईट शक्तींची छाया मैदानात पडू नये; म्हणून गरुडाने सूक्ष्मातून त्याचे पंख संपूर्ण मैदानावर पसरले आहेत.

६. सर्व साधकांनी भूदेवी आणि श्रीदेवी यांच्या समवेत श्रीविष्णूचे डोळे भरून भावपूर्ण दर्शन घेतल्याने त्यांना ईश्वराचा आशीर्वाद मिळणार आहे !

श्रीविष्णूचा रथ हा शुभयोग देणारा ‘मोक्षरथ’ आहे. हा वैकुंठातून भक्तांसाठी मानव रूपात आलेल्या भगवंताचा सुवर्णयोग देणारा रथ आहे. रथारूढ भूदेवी आणि श्रीदेवी यांच्यासहित श्रीविष्णूचे दर्शन घेतल्याने सर्व भक्तांचे ताप, दैन्य, पीडा, भूत-पिशाचबाधा, दारिद्र्य, रोग, दुःख आणि ग्रहबाधा दूर होणार आहे. गेली अनेक वर्षे साधकांनी वाईट शक्तींचे नाना प्रकारचे त्रास सहन केले आहेत. ते त्रास दूर करण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी गुरुदेव रथावर विराजमान होऊन साधकांना दर्शन देणार आहेत. सर्व साधकांनी भूदेवी आणि श्रीदेवी यांच्या समवेत श्रीविष्णूचे डोळे भरून भावपूर्ण दर्शन घेतल्याने त्यांना ईश्वराचा आशीर्वाद मिळणार आहे.’

– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), चेन्नई (२३.२.२०२३)

‘तिरुपति बालाजी’चा ‘ब्रह्मोत्सव’

श्रीविष्णु उत्सवप्रिय आहे; म्हणून तिरुपति येथे गेल्या १ सहस्र वर्षांपासून प्रत्येक वर्षी भूदेवी आणि श्रीदेवी यांच्यासहित श्री वेंकटेश्वरदेवाचा उत्सव साजरा केला जातो. या ९ दिवसांच्या उत्सवाला ‘ब्रह्मोत्सव’, असे म्हटले जाते. या उत्सवात श्रीदेवी आणि भूदेवी यांच्यासहित श्रीविष्णु ‘सुवर्णरथा’त आरूढ होतो. ‘सर्व भक्तांना दर्शन मिळावे’, यासाठीच ब्रह्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आली. ब्रह्मोत्सवातील ‘ब्रह्म’ या शब्दाचा अर्थ ‘सर्वाेच्च’, असा आहे; म्हणून ब्रह्मोत्सव म्हणजे सर्वाेच्च उत्सव. श्रीविष्णूसाठी साजर्‍या होणार्‍या सर्व उत्सवांमध्ये ‘ब्रह्मोत्सव’ हा सर्वाेच्च आहे.

‘सर्व साधकांना गुरुदेवांचा ब्रह्मोत्सव निर्विघ्नपणे बघता यावा’, यासाठी श्रृंगीऋषि यांनी पाऊस आणि चक्रीवादळ यांना थोपवून ठेवले ! – सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून)

‘श्रृंगीऋषींनी केलेल्या ‘पुत्रकामेष्टी यागा’मुळे भगवान श्रीविष्णु श्रीरामाच्या रूपात दशरथ महाराजांच्या घरी जन्मला. श्रृंगीऋषींच्या आगमनामुळे रोमपाद राजाच्या राज्यातील दुष्काळ दूर झाला आणि पाऊस आला. श्रृंगीऋषि यांचे वैशिष्ट्य असे की, ‘त्यांच्या आगमनाने पाऊस येणे किंवा न येणे’, असे होऊ शकते. ‘सर्व साधकांना गुरुदेवांचा ब्रह्मोत्सव निर्विघ्नपणे बघता यावा, तसेच गुरुदेव आणि त्यांचा रथ यांचे दर्शन व्हावे’, यासाठी श्रृंगीऋषि ब्रह्मोत्सवाच्या दिवशी मैदानात उभे होते. त्यांनी पावसाला मैदानापासून २१ कि.मी. दूर आणि चक्रीवादळाला १ सहस्र २०० कि.मी. दूर थांबवले होते. (‘बंगालच्या खाडीमध्ये तयार झालेले ‘मोखा’ नावाचे चक्रीवादळ ९.५.२०२३ या दिवशी वेगाने किनार्‍यावर आपटेल’, असे भारतीय हवामान खात्याने सांगितले होते. शेवटी ‘मोखा’ चक्रीवादळ २ दिवस बंगालच्या खाडीतील अंदमान द्वीपसमुहाजवळ थांबले.’ – संकलक) ‘सर्वांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे दर्शन व्हावे आणि कार्यक्रमस्थळी पावसामुळे कुठलेही अडथळे निर्माण होऊ नयेत’, यासाठी मैदानात सूक्ष्मातून उभे राहून पावसाला थांबवणारे श्रृंगीऋषि अन् श्रीविष्णूचे अवतार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी आम्ही सप्तर्षी कृतज्ञ आहोत.’ – सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, १२.५.२०२३, सकाळी ११.३०)

(‘श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवात पावसामुळे अडथळे येऊ नयेत’, यासाठी कार्य करणार्‍या श्रृंगीॠषींच्या चरणी आम्ही सनातनचे सर्व साधक कृतज्ञ आहोत.’ – संकलक)