ग्‍लानी आलेल्‍या धर्माला तेजतत्‍व देण्‍याचे काम डॉ. जयंत आठवले आणि सनातन संस्‍था यांनी केले ! – भारताचार्य सु.ग. शेवडे, डोंबिवली

सु.ग. शेवडे यांच्‍यासमवेत चर्चेतील एका आनंदाच्‍या क्षणी प.पू. डॉ. आठवले (वर्ष २०००)

‘परमपूज्‍य डॉ. जयंत आठवले यांचा आणि माझा परिचय ४० वर्षांपासून आहे. वेगवेगळ्‍या निमित्ताने आम्‍ही एकत्र आलो. त्‍यांचे हे कार्य चालू झाल्‍यापासून मी पहात आहे. प.पू. भक्‍तराज महाराज (परात्‍पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे गुरु तथा सनातन संस्‍थेचे श्रद्धास्‍थान) यांच्‍याशीही माझा परिचय होता. इंदूर (मध्‍यप्रदेश) येथे दत्तजयंतीला नाना महाराज तराणेकर (मध्‍यप्रदेशातील दत्तावतारी संत) यांच्‍याकडे मी अनेक वर्षांपासून जात असे. तेथे अनेकदा प.पू. भक्‍तराज महाराज यांची भजने आणि प्रवचने ऐकण्‍याचा योग मला लाभला. प.पू. भक्‍तराज महाराज यांचे शिष्‍य या दृष्‍टीने विचार केला, तर डॉ. जयंत आठवले यांनी त्‍यांच्‍याकडून भक्‍तीचा मार्ग उत्तम प्रकारे प्राप्‍त केला आहे. केवळ प्राप्‍त केला नाही, तर ‘जे जे आपणासी ठावे । ते ते इतरांसी सांगावे । शहाणे करून सोडावे । सकळ जन ।’ या समर्थांच्‍या उक्‍तीप्रमाणे त्‍यांनी त्‍यांचे अवघे आयुष्‍यच या कार्यासाठी वेचले आणि सनातन संस्‍थेचा डोलारा उभा केला. तेव्‍हापासून त्‍यांनी आजतागायत सनातन संस्‍थेच्‍या माध्‍यमातून अतिशय मौलिक कार्य केले आहे.

भारताचार्य सु.ग. शेवडे

अनेक जण स्‍वतःला ‘हिंदुत्‍वनिष्‍ठ’ म्‍हणवतात. अभिमानाने ‘हिंदुत्‍ववादी’ म्‍हणून मिरवतात; पण ते स्‍वतः धर्मनिष्‍ठ नसल्‍याने त्‍यांना धर्मशास्‍त्राची जाण नसते. धर्माच्‍या आज्ञा काय आहेत ? ‘वेद, उपनिषदे, पुराणे, भागवत, रामायण, महाभारत आणि शास्‍त्र काय सांगतात ?’, हे अशा हिंदुत्‍वनिष्‍ठांना माहीत नाही. त्‍यामुळे हिंदूंना धर्मशिक्षण देणे अत्‍यावश्‍यक आहे. ‘वेद शास्‍त्र नाही पुराण प्रमाण । तयाचें वदन नावलोका’ या उक्‍तीप्रमाणे ‘वेद-शास्‍त्र ज्‍यांना प्रमाण वाटतच नाहीत, अशांचे तोंड बघू नये’, असे संत तुकाराम महाराज यांनी सांगितले आहे. असे अनेक जण आहेत, जे वेद-शास्‍त्र प्रमाण मानत नाहीत; पण स्‍वतःला हिंदुत्‍वनिष्‍ठ समजतात. अशा स्‍थितीत ग्‍लानी आलेल्‍या धर्माला अखंड तेजतत्‍व देण्‍याचे काम डॉ. जयंत आठवले आणि सनातन संस्‍था यांनी केले आहे. परमपूज्‍य डॉ. जयंत आठवले यांना ८१ वर्षे पूर्ण होत आहेत आणि ‘अद्यापही ते पूर्वी इतक्‍याच ताजेपणाने कार्यरत आहेत’, असे वाटते. यांमुळे ‘परमेश्‍वराची त्‍यांच्‍यावर अखंड कृपा आहे’, हेही स्‍पष्‍ट जाणवते. त्‍यांच्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त खूप खूप शुभेच्‍छा !’

(२१.४.२०२३)