‘सतत उद्योग करत रहा आणि त्याच्यावर विचार करून काहीतरी संशोधन मांडा’, हे माझ्या आईचे वाक्य होते. त्या वाक्याचा प्रत्यय मला फोंडा, गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात आला. ‘संगीत उद्धारक गायक’, असे ज्यांना मी म्हणीन ते ठाणे येथील श्री. प्रदीप चिटणीस यांनी मला त्यांच्या समवेत या संशोधन केंद्रात नेले. तेथे मी नृत्यातून प्रक्षेपित होणार्या सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील प्रयोग केला अन् तो अत्यंत यशस्वी झाला. त्या निमित्ताने तेजस्वी रूप असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे गुणदर्शन झाले. तेव्हा अत्यंत आनंद वाटला. इतकी तेजस्वी व्यक्ती आपल्यासमोर आल्यानंतर आपल्यात काय काय पालट होतात, हे अनुभवता आले.
१. आध्यात्मिक शिकवणीमुळे सहस्रा जिज्ञासूंना जीवनाकडे पहाण्याची दिशा देणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !
मी ‘नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट’ या संस्थेचा कलाकार आहे. मी कथ्थक नृत्यातील असल्यामुळे आणि माझे प्रथम गुरु नटराज गोपीकृष्ण, लछ्छू महाराज, मोहनराव कल्याणपूरकर यांनी केलेल्या आध्यात्मिक किंवा सात्त्विक नृत्याच्या संस्कारांमुळे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात नृत्य करतांना माझा अंतरात्मा सतत संशोधक स्थितीत होता. मला या संशोधनात असे आढळले की, नृत्य करतांना आपण त्या भजनांतील केवळ आध्यात्मिक बाजू मांडत नसून नृत्याद्वारे त्या भजनातील आध्यात्मिक शिकवणीचा प्रचारही होत आहे. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात हा आध्यात्मिक शिकवणीचा प्रभाव मला दिसून आला. सहस्रो जिज्ञासू तेथे येतात आणि तेथील सात्त्विकतेमुळे त्या सहस्रो लोकांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन पालटतो. तेथील शक्ती म्हणजे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले ! ‘त्यांच्यात आध्यात्मिक शिकवणीचे सत्त्व आहे’, असे मला जाणवले.
२. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय संशोधन केंद्रात नृत्य करतांना उपास्यदेवतेचे स्मरण करण्याची प्रेरणा मिळाली !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात प्रत्यक्ष नृत्य करतांना मला वाटले, मी सलग अर्धा-पाऊण घंटा नृत्य करू शकेन कि नाही; परंतु नृत्यप्रयोगांतर्गत मी तेथे २-३ घंटे उभा होतो. ‘एवढा वेळ होऊनही मला कुठलाही त्रास झाला नाही’, ही एक अनुभूतीच आली. मी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात ३-४ दिवस राहिलो. त्या कालावधीत मला प्रेरणा मिळाली की, नृत्य करतांना सतत आपल्या उपास्यदेवतेचे स्मरण केले पाहिजे, जसे आम्ही कलाकार नटराजाला भजतो, तसे !
तालाचे दहा प्राण सांगितले आहेत.
कालो मार्गः क्रियाङ्गानि ग्रहोजातिः कला लयः ।
यतिः प्रस्तारकश्चेति तालप्राणाः दश स्मृताः ।।
अर्थ : काल, मार्ग, क्रिया, अंग, ग्रह, जाति, कला, लय, यति आणि प्रस्तार हे तालाचे दहा प्राण आहेत.
या प्राणांची जी शिकवण आहे, ती अनुभवण्याची दिशा महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात अत्यंत काळजीपूर्वक मांडली गेली आहे. प्रत्येकाला समजेल, अशा भाषेत ते शिकवतात.
३. नव्या पिढीला संस्कृतीची शिकवण देण्याची व्यवस्था !
‘मी नाट्यशास्त्राचा अभ्यासक आहे; परंतु ते सगळे संस्कृतमध्ये लिहिले गेल्यामुळे आताच्या पिढीपर्यंत पोहोचत नाही’, हे माझे दुःख आहे. माझ्याकडे नृत्य शिकण्यासाठी येणार्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात बर्याच वेळा लक्षात येते की, कथ्थकचे बोल म्हणतांना पाचवी-सहावीतील मुलांनाही संस्कृतच्या उच्चाराची पद्धत शिकवावी लागते. ‘आपल्या संस्कृतीविषयी तरुण पिढीला संदेश मिळावा’, अशी माझी जी इच्छा होती, ती मला महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात दिसून आली.
४. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’द्वारे प्रभावळ मोजण्याचे प्रभावी तंत्रज्ञान !
नृत्य संशोधनाच्या अंतर्गत मी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात तांडवनृत्य केले. त्या दिवशी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (UAS) या उपकरणाने माझी प्रभावळ मोजण्यात आली. मला याविषयी कुतुहल होते आणि संशोधन केंद्रात त्याचा मला प्रत्यक्ष अनुभव मिळाला. त्या उपकरणामुळे स्वतःतील आध्यात्मिक शक्तीची प्रभावळ जाणता येते किंवा नृत्य केल्यानंतर त्या प्रभावळीत होणारी वाढ-घटही दिसून येते. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (वर्ष २०२२ मध्ये आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांनी आम्हाला प्रभावळीत कसा पालट होतो, ते समजावून सांगितले. तो ‘ऑरा स्कॅनर’ मला आवडला.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याचा प्रचार अखंड जगतात होवो’, ही माझी सदिच्छा !! ‘नटराज नृत्य निकेतन संस्थे’च्या वतीने आणि आमच्या केतकर परिवाराकडून सर्वांच्या सदिच्छा !
– पू. डॉ. राजकुमार केतकर, प्रसिद्ध कथ्थक नृत्याचार्य, ठाणे.
(२८.४.२०२३)
ठाणे येथील घरी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाल्याची अनुभूती !
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला भेट देऊन आम्ही ठाण्याला आमच्या घरी परत आलो. त्यानंतर ३-४ दिवसांनी मी पहाटे उठलो, तेव्हा मला माझ्या घरी अचानक गुरूंचे, म्हणजे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे दर्शन झाले ! त्या वेळी ते प्रत्यक्ष मला घरी दिसले. माझ्या मनात विचार आला, ‘मी माझ्या घरी आहे. हे येथे कसे आले ?’ मी म्हटले, ‘‘गुरुजी तुम्ही इथे कसे काय ?’’ मग माझी तंद्री मोडली. त्यांचे दर्शन मला अशा प्रकारे पहाटे झाले. ही फार उत्तम अनुभूती आली. ही अनुभूती सांगितल्यावर माझ्या पत्नीलाही आश्चर्य वाटले. ही अनुभूती काहीतरी साक्षात्कार देऊन गेली.
‘अशा प्रकारे डॉक्टरांचे मला जे दर्शन झाले, ते असेच सर्वकाळ टिकावे’, ही त्यांच्या चरणी विनंती !
मी त्यांच्यासमोर लहान आहे; परंतु मला डॉ. आठवले यांनी ‘संत’ म्हणून घोषित केले. त्यांनी ओळखले की, आमच्या गुरूंनी आम्हाला जे नृत्य शिकवले होते, ते इतरांना शिकवतांना मी केवळ धनलोभाने शिकलेलो नाही. त्यामुळे डॉ. आठवले यांनी दिलेली ‘संत’ ही पदवी मला अत्यंत सार्थकी वाटली. मी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे स्मरण करीन की, अशाच प्रकारे त्यांची माझ्यावर कृपा राहो ! प.पू. भक्तराज महाराजांची कृपा राहो !’
– पू. डॉ. राजकुमार केतकर, प्रसिद्ध कथ्थक नृत्याचार्य, ठाणे. (२८.४.२०२३)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घडवलेल्या साधकांविषयी गौरवोद्गार !
उत्तम आचरणाने सर्वांना आपलेसे करणारे श्री. गिरिजय प्रभुदेसाई !
‘श्री. गिरिजय प्रभुदेसाई हे तेथे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रातील एक उत्तम व्यक्तीमत्त्व ! सगळ्यांना आपलासा करणारा असा हा गिरिजय, त्याचे आचरण मला फार उत्तम भावनेने भावले ! त्याने आम्हा सगळ्यांना प्रेमाने आपल्या भावासारखी वागणूक दिली. त्याचे तबलावादन वीरश्रीयुक्त आणि उत्साहवर्धक होते.’
त्याच्यासह अन्यही साधक एकमेकांना सांभाळून घेऊन चांगल्या प्रकारे सेवा करत होते.
– पू. डॉ. राजकुमार केतकर, प्रसिद्ध कथ्थक नृत्याचार्य, ठाणे.