सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या सहवासाने जीवनाला भक्‍तीमय कलाटणी मिळाली ! – प्रदीप चिटणीस, शास्‍त्रीय गायक, ठाणे

‘वर्ष २०१८ पासून मी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या फोंडा (गोवा) येथील संशोधन केंद्रात ‘संगीताच्‍या माध्‍यमातून मानसिक आणि शारीरिक त्रास कसे दूर होतात’, याविषयी विविध प्रयोग करण्‍यासाठी सातत्‍याने जात आहे. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यासारख्‍या संतांचे दर्शन होणे, हे खरोखरंच माझे फार मोठे भाग्‍य आहे. एवढे प्रचंड कार्य असलेल्‍या संतांविषयी मी काय बोलू ?

श्री. प्रदीप चिटणीस

१. प्रथम भेटीतच आपलेसे करणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

वर्ष २०१७ मधील विजयादशमीच्‍या दिवशी मी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना भेटलो. पहिल्‍या भेटीतच त्‍यांनी मला आपलेसे केले. त्‍या वेळी ते मला म्‍हणाले. ‘‘हे तुमचेच घर आहे, येथेच रहा !’’ त्‍यावर मी म्‍हटले, ‘‘येथे मी माझा तंबोरा आणून ठेवतो.’’ त्‍यावर ते म्‍हणाले, ‘‘नुसता तंबोरा नको, आम्‍हाला तुम्‍ही हवे आहात.’’ त्‍यांच्‍या या बोलण्‍याने मी अतिशय भारावून गेलो आणि तेव्‍हापासून त्‍या परिवाराचाच एक सदस्‍य झालो !

२. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी घडवलेले अनमोल साधक आणि रामराज्‍यासारखा सनातनचा आश्रम !

हळूहळू माझा साधकांशी परिचय वाढत गेला. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या विचारांचा आणि त्‍यांनी केलेल्‍या महान कार्याचा उलगडा होत गेला. मला सर्वांत भावले, ते अहंकाराचा लवलेशही नसणारे त्‍यांनी घडवलेले अनमोल साधक अन् आश्रमातील रामराज्‍य ! आजवर मी असे (रामनाथी आश्रमाप्रमाणे) जग कुठेच पाहिलेले नाही. आत्‍मसात करायला जी सर्वांत कठीण गोष्‍ट आहे, ती ‘अहं निर्मूलन’ ही येथील प्रत्‍येक साधकाच्‍या ठायी ठासून भरलेली आहे ! हे कसे शक्‍य आहे ? यामागे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची केवढी मोठी तपश्‍चर्या असेल, याची कल्‍पनाच करता येत नाही.

३. संगीतातील नवनवीन प्रयोग सुचवूनही नम्रतापूर्वक त्‍याचे श्रेय इतरांना देणारे सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव

दुसरी महत्त्वाची गोष्‍ट म्‍हणजे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची संशोधक वृत्ती ! त्‍यांच्‍याकडून मला संगीतातील विविध प्रयोग करण्‍यासाठी नवीन दिशा आणि प्रोत्‍साहन मिळते. ‘मला संगीतातील रागांवर इतके प्रयोग करता येऊ शकतील’, असे कधी स्‍वप्‍नातही वाटले नव्‍हते. ते इथे येऊन साकार करता आले, ते केवळ आणि केवळ सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याच कृपाआशीर्वादाने ! प्रत्‍येक वेळी गुरुदेवांकडून नवीन प्रेरणा मिळत असते. त्‍यांची एवढी मोठी योग्‍यता असतांना त्‍यांच्‍याकडून मला नेहमी ‘अरे वा, हे आज नवीनच शिकायला मिळाले तुमच्‍याकडून !’ किंवा ‘हे आम्‍हालापण शिकवा !’, असे अत्‍यंत नम्रतापूर्वक उद़्‍गार ऐकायला मिळतात.

४. नामजप होत नसल्‍याची खंत गुरुदेवांसमोर बोलून दाखवल्‍यानंतर काही काळातच नामजपच विविध रागांत आळवण्‍याची लागलेली ओढ !

एकदा मी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना घाबरत घाबरतच म्‍हटले, ‘‘गुरुदेव, माझ्‍याकडून नामजप वगैरे काही होत नाही हो ! म्‍हणजे खरे सांगू का ? मला त्‍याचा कंटाळा येतो. आश्रमातील साधक कसा काय एवढा ५-६ घंटे नामजप करू शकतात ?’’ गुरुदेव माझ्‍याशी फारच आपुलकीने बोलायचे; म्‍हणून मी स्‍पष्‍ट बोलायचे जरा धाडसच केले. त्‍यावर गुरुदेव अगदी सहज म्‍हणाले, ‘‘अहो, तुमची साधना संगीतातूनच आहे. तुम्‍हाला वेगळा नामजप करायची काहीच आवश्‍यकता नाही.’’

या उत्तराने मला फार बरे वाटले. त्‍यानंतर मात्र माझ्‍यात एक मोठा पालट झालेला मला प्रकर्षाने जाणवला, तो म्‍हणजे मला आमच्‍या शास्‍त्रीय संगीतातील गायल्‍या जाणार्‍या रागातील शृंगारिक बंदिशी गाव्‍याश्‍याच वाटेनात. (बंदिश म्‍हणजे शास्‍त्रीय गायनातील रागाचे स्‍वरूप स्‍पष्‍ट करणारे बोलगीत. ही मध्‍य किंवा द्रुत लयीत गातात.) केवळ भक्‍तीरसच मनाला भावू लागला. मला नवीन नवीन रचना (बंदिशी) करायचा छंद आहे; पण आता माझ्‍याकडून या रचना अशा होऊ लागल्‍या आहेत की, ज्‍यात श्री गणेश, श्रीराम, श्रीकृष्‍ण, माता दुर्गा, माता सरस्‍वती यांचीच विविध नावे आपोआप श्रीगुरूंच्‍या कृपेने येतात आणि ज्‍या नामजपाचा मला कंटाळा होता, तोच नामजप आज विविध रागांतून अन् विविध चालींमध्‍ये आळवण्‍याचा मला छंदच जडला आहे. ‘दुसरे काहीही गावे’, असे वाटेनासे झाले आहे. ही सर्व परमपूज्‍यांचीच कृपा ! गुरुमाऊली किती प्रेमळ असते. तिला आपल्‍या शिष्‍याची किती काळजी असते आणि ती योग्‍य मार्ग त्‍याला कसा दाखवते ?, याची प्रचीती मला आली.

जय गुरुदेव !’

– श्री. प्रदीप चिटणीस, शास्‍त्रीय गायक, ठाणे (२५.४.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक