मंदिरांवरील आघातांविरुद्ध संघटितपणे लढण्याचा निर्धार !

  • ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची पहिली राज्यस्तरीय बैठक श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे संपन्न !

  • ५० हून अधिक मंदिरांच्या प्रतिनिधींचा सहभाग !

पुणे, १९ एप्रिल (वार्ता.) – मंदिरांवरील आघातांविरुद्ध संघटितपणे लढण्याचा निर्धार राज्यातील विविध मंदिरांचे विश्‍वस्त आणि प्रतिनिधी यांनी येथे केला. पुणे येथील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थानात १६ एप्रिल २०२३ या दिवशी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या पहिल्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हा निर्धार करण्यात आला. या वेळी राज्यातील ज्योतिर्लिंग, अष्टविनायक, तसेच प्रमुख मंदिरे यांच्याशी संबंधित मंदिरांचे विश्‍वस्त, तसेच मंदिरांच्या संदर्भात कार्य करणारे ५० हून अधिक राज्यस्तरीय मंदिरांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीनंतर घोषणा देतांना ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे सदस्य

महाराष्ट्र सरकारने अधिसूचना काढून ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ला मंदिरांशी संबंधित ‘अधिकृत संस्था’ म्हणून मान्यता द्यावी, तसेच मंदिरांशी संबंधित कुठलाही निर्णय घेण्याच्या पूर्वी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’शी चर्चा करावी, अशा मागण्याही या वेळी करण्यात आल्या. जळगाव येथे ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत पार पडलेल्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’ नंतर ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना करण्यात आली होती.

श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थानकडून आयोजित या बैठकीचा प्रारंभ दीपप्रज्वजन, शंखनाद आणि वेदमंत्राच्या उद्घोषाने झाला. यानंतर उपस्थित विविध मंदिर विश्‍वस्त आणि प्रतिनिधी यांचा सन्मान श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष अधिवक्ता सुरेश कौदरे आणि विश्‍वस्त श्री. मधुकर अण्णा गवांदे यांच्या हस्ते झाला. त्यानंतर ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक तथा ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी बैठकीच्या आरंभी मंदिर महासंघाच्या वतीने मागील ३ मासात जे उपक्रम झाले आणि जी आंदोलने केली त्याला मिळालेले यश याविषयी सर्वांना संबोधित केले. तसेच मंदिरांच्या विश्‍वस्तांनीही ३ मासांमध्ये मंदिरांच्या संदर्भात केलेल्या कृतीचा आढावा मांडला. या वेळी महासंघाची कार्यकारिणी कशी असेल, तसेच पुढील कार्याची दिशा ठरवण्यात आली. या वेळी सर्वांनी ‘हर हर महादेव’ या जयघोषाने अनुमोदन दिले.

श्री. सुनील घनवट

‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे प्रसिद्धीपत्रक –

 

पुणे येथील श्री क्षेत्र भीमाशंकर हेच धर्मशास्त्रात वर्णिंत ज्योतिर्लिंग ! – अधिवक्ता सुरेश कौदरे, अध्यक्ष, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान

पुणे येथील श्री क्षेत्र भीमाशंकर हेच अनादि कालापासून धर्मशास्त्रात वर्णित असलेले ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे त्याविषयी वाद निर्माण करणे योग्य नाही. आज विविध मंदिरांमध्ये असलेल्या पुजार्‍यांच्या वेतनासह अनेक समस्या आहे. त्या सोडवण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे, यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत.

कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची स्थिती नाजूक ! – श्री चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस

श्रीक्षेत्र कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची स्थिती अत्यंत नाजूक आहे. या संदर्भामध्ये तात्काळ लक्ष घालणे आवश्यक आहे. श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या संदर्भात अनेक मतप्रवाह समोर येतांना दिसत आहेत. या विषयी शृंगेरी पीठाचे शंकराचार्य यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला पाहिजे.

महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटक, गोवा, देहली, तमिळनाडू राज्यांतही ‘मंदिर महासंघ’ स्थापन करणार ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे

कर्नाटक, गोवा, देहली आणि तमिळनाडू राज्यांमध्येही मंदिरांची परिस्थिती बिकट आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात मंदिरांचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना करण्यात आली आहे, त्याप्रमाणे या ४ राज्यांतही मंदिरांचे रक्षण आणि संवर्धन यांसाठी ‘मंदिर महासंघ’ स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

मंदिरांच्या विकासासाठी विद्यामान कायद्यात पालट आवश्यक ! – श्री. अनुप जयस्वाल, अध्यक्ष, विदर्भ देवस्थान समिती

‘बॉम्बे पब्लिक ट्रस्ट’ या कायद्यात मंदिराच्या संवर्धन आणि रक्षण यांदृष्टीने विचार करण्यात आलेला नाही. हा कायदा जुना आहे. त्यामुळे या कायद्यामध्ये आवश्यक ते पालट करून मंदिरांच्या हितासाठी तो झाला पाहिजे. तसेच दुर्गम भागातील मंदिरांच्या विकास कार्याला पुरातत्व विभागाकडून अनेक अडचणी निर्माण केल्या जात आहेत. त्या दूर करण्याची आवश्यकता आहे. मंदिरांचा विकास करण्यासाठी प्रत्येक मंदिरांचे विश्‍वस्त आणि स्थानिक यांचा समन्वय आवश्यक आहे.

बैठकीस उपस्थित महासंघाचे सदस्य

मंदिर आणि त्याच्या परंपरा नदशीर मार्गाने लढा देणे, हे काळानुसार धर्माचरणच ! – अधिवक्ता अभिषेक भगत, श्री भवानीमाता मंदिर, नगर

मंदिर आणि त्याच्या परंपरा जपण्यासाठी सनदशीर मार्गाने लढा देणे, हे काळानुसार धर्माचरणच आहे. हिंदु धर्म आणि परंपरा जपण्यासाठी या मंदिर महासंघाच्या माध्यमातून वेळ देणे फार आवश्यक आहे. अनेक ठिकाणी देवस्थानच्या मालकीच्या भूमी परस्पर विकली जात आहे. यासंदर्भात आवाज उठवण्याची आवश्यकता आहे.

सरकारीकरण झालेल्या देवस्थानांमध्ये भक्तांची मोठ्या प्रमाणावर लूट ! – श्री. किशोर गंगणे, माजी अध्यक्ष, श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ

सरकारीकरण झालेल्या अनेक मंदिरांमध्ये प्रतिदिन सहस्त्रो भाविक दर्शनाला येतात; परंतु तिथे सुविधांचा अभाव पहायला मिळतो. अनेक देवस्थानांमध्ये भक्तांची मोठ्या प्रमाणावर लूट होत आहे. अनेक आर्थिक घोटाळे उघडकीस येत आहेत. याविषयी मंदिर महासंघाने जलद पाऊले उचलणे आवश्यक आहे.

मंदिर संस्‍कृती टिकवणे आवश्‍यक ! – रामनारायण मिश्रा, आंतरराष्‍ट्रीय सभापती, अखिल भारतीय सरयूपरिण ब्राह्मण महासंघ, नागपूर

मंदिरांमुळे आपली संस्कृती टिकून आहे. मंदिर संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सरकार मुल्ला-मौलवींना पैसे देते, त्याचप्रमाणे मंदिरातील पुजार्‍यांनाही मानधन देणे आवश्यक आहे. त्यामुळे आपली मंदिरे आणि त्याचे व्यवस्थापन होण्यासाठी फार साहाय्य होईल. सरकारचे मंदिराकडे दुर्लक्ष होते, ही एक मोठी समस्या आहे.

मंदिरांच्या संदर्भात हिंदूंचे एक मंडळ (बोर्ड) असणे आवश्यक ! – श्री वीरेंद्रसिंह उत्पाद, पंढरपूर येथील रुक्मिणी मातेचे वंशपरंपरागत पुजारी

ज्या वेळी पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे पुजारी हटवण्याचा निर्णय झाला, त्या वेळी जवळपास १ सहस्र पुजारी कुटुंबांवर परिणाम झाला. आज ज्याप्रमाणे अन्य धर्मियांसाठी मंडळे आहेत त्याचप्रमाणे मंदिरांच्या संदर्भात हिंदूंचे एक मंडळ (बोर्ड) असणे आवश्यक आहे.

मंदिरांच्या सरकारीकरणामुळे मनमानी कारभार वाढतो ! – श्री. गणेश लंके, सचिव, पंढरपूर देवस्थान भ्रष्टाचार विरोधी कृती समिती

मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर मनमानी कारभार वाढतो. पूर्वी भाविकांच्या सोयीप्रमाणे मंदिरांच्या वेळा असायच्या, आता सरकार मनाला वाटेल तेव्हा मंदिर बंद करते. मंदिरामध्ये श्री विठ्ठलाच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणावर द्राक्षांची आरास वा सजावट यांसाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. जिथे आवश्यक आहे, तेथेच खर्च झाला पाहिजे.

सरकारीकरण झालेली मंदिरे पुन्हा भक्तांना मिळवून देण्यासाठी लढा आवश्यक ! – अधिवक्ता (पू.) सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद

सरकारीकरण झालेली मंदिरे पुन्हा भक्तांच्या कह्यात मिळवून देण्यासाठी लढा देणे आवश्यक आहे. ज्या सरकारीकरण झालेल्या मंदिरांत घोटाळे झाले आहेत. त्यांच्या विरोधात कायदेशीर लढा देण्यासाठी सर्व मंदिरांच्या विश्‍वस्तांनी कार्यरत रहाणे आवश्यक आहे.

उपस्थित मान्यवर

‘श्रीक्षेत्र भीमाशंकर संस्थान’चे अध्यक्ष अधिवक्ता सुरेश कौदरे, सहकार्यकारी विश्‍वस्त श्री. मधुकर गवांदे, ‘श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. जितेंद्र बिडवई, ‘जी.एस्.बी. टेम्पल ट्रस्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ऋत्विक औरंगाबादकर, ‘श्री वरदविनायक मंदिर महड’चे विश्‍वस्त अधिवक्ता विवेक पेठे, ‘श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर पुरोहित महासंघा’चे अध्यक्ष श्री. मनोज थेटे, नगर येथील ‘श्री भवानीमाता मंदिर’चे अधिवक्ता अभिषेक भगत, ‘श्री तुळजाभवानी पुजारी मंडळा’चे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे, ‘पंढरपूर देवस्थान भ्रष्टाचार विरोधी कृती समिती’चे सचिव श्री गणेश लंके, अमरावती येथील ‘श्री लक्ष्मीनारायण संस्थान’चे विश्‍वस्त श्री. अशोक कुमारजी खंडेलवाल, ‘हिंदु जनजागृती समिती’चे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, ‘सनातन संस्थे’चे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक तथा ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट आणि अन्य मंदिर प्रतिनिधी उपस्थित होते.