अमरावती – धर्म हा समजावून सांगावा लागतो. जर तो नीट समजला नाही, तर त्या धर्माच्या अर्धवट ज्ञानाने अधर्म होतो. जगामध्ये धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले आहेत, ते याच चुकीच्या समजुतीमुळे झाले आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प.पू. डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले. येथील कंवरनगर परिसरातील महानुभाव आश्रमाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भानखेड येथील गोविंद गुरुकुलमध्ये विशेष कार्यक्रम चालू होता. त्या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी डॉ. मोहन भागवत बोलत होते.
ते पुढे म्हणाले,…
१. थोड्याशा ज्ञानाने पुष्कळ फुगलेल्या माणसाला ब्रह्मदेवही समजावू शकत नाही, असे सुभाषितामध्ये म्हटले आहे. अशा प्रकारे समजूत काढणे जिकिरीचे काम आहे, त्याला समजावयाला जावे, तर समाज म्हणतो, हा चुकीचा आहे, याला हाकला. याला मारा, याला ठोका.
२. धर्म समजावून सांगण्याचे काम करणारे संप्रदाय असावे लागतात. नुसते पंथ असून चालत नाहीत, तर त्याला विवेक आवश्यक असतो. ज्या पंथाला विवेक प्राप्त होतो, तो पंथ चांगला समाज घडवतो. महानुभाव पंथ आणि संघाचे अध्यात्मशक्तीचे कार्य व्यापक स्वरूपात जोमाने चालू राहील.