पिंपरी-चिंचवड शहरातील बेशिस्त गाडी चालकांकडून ३ कोटी रुपयांचा दंड वसूल !

‘सीसीटीव्ही’च्या माध्यमातून दंडाची नोटीस

प्रतिकात्मक चित्र

पिंपरी (पुणे) – शहरातील मुख्य चौकामध्ये लावण्यात आलेल्या ‘सीसीटीव्ही कॅमेर्‍यां’च्या चित्रीकरणामध्ये पहाणी केली. त्यातून चालू वर्षात आतापर्यंत ४१ सहस्र ६९५ बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करत ३ कोटी ४ लाख २५ सहस्र ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य चौकामध्ये २५० ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसवण्यात आले; परंतु त्यात ‘फुटेज’ (चित्रीकरण पुन्हा पहाणे) सुविधा नव्हती. त्यानंतर ‘स्मार्ट सिटी प्रकल्पां’तर्गत वर्ष २०२२ मध्ये ३ सहस्र ५०० छायाचित्रक बसवण्यात आले. त्यानंतर निगडी येथील वाहतूक कार्यालयातून कारवाईस प्रारंभ झाला. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचा संदेश भ्रमणभाषवर पाठवण्यात येतो. १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२४ या ११ महिन्यांत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी १ अधिकारी, ४ पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिली.

संपादकीय भूमिका :

वाहन चालवण्यापासून सर्व प्रकारची शिस्त जनतेला लावल्यासच शहर ‘स्मार्ट सिटी’ होईल हे प्रशासन लक्षात घेईल का ?