स्थानिक पातळीवर गणवेश खरेदी करता येणार !
नागपूर – सरकारी शाळांतील ‘एक राज्य, एक गणवेश’ योजनेत पालट केला. त्यानुसार गणवेश पुरवठा करण्याचे दायित्व स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीवर सोपवले आहे. मागील वर्षी सरकारने ‘एक राज्य, एक गणवेश’ योजनेत विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्याचे दायित्व स्वतःकडे घेतले होते. या योजनेअंतर्गत राज्यातील महिला बचतगटांना गणवेश शिवून देण्याचे काम दिले होते; परंतु निकृष्ट दर्जाचे गणवेश आणि गणवेश पुरवठा करण्यासाठी विलंबामुळे हा निर्णय वादात सापडला होता. त्यामुळे आता सरकार गणवेश खरेदी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीला निधी देणार आहे.
‘एवढ्या मोठ्या प्रमाणात एखादी योजना राबवायची असेल, तर त्यासाठी एखादे वर्ष जावे लागते. आता महिलांनी घेतलेल्या मशिनरी आणि गुंतवणुकीचे काय ?’ असा प्रश्न माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून हा पालट न करण्याची विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.