संतोष देशमुख हत्या प्रकरण
मुंबई – बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राज्य सरकारच्या वतीने विशेष सरकारी अधिवक्ता म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे हत्या प्रकरण योग्य प्रकारे हाताळण्यासाठी राज्य सरकारने विशेष सरकारी अधिवक्त्याची नेमणूक केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २० डिसेंबर या दिवशी विधानसभेत देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दुहेरी चौकशी करण्याची घोषणा केली होती, तसेच ‘बीड जिल्ह्यातील गुन्हेगारांची पाळेमुळे खणून काढू’, असेही आश्वासन दिले होते. त्यापाठोपाठ विधीमंडळाचे अधिवेशन संपताच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहे. २१ डिसेंबर या दिवशी शरदचंद्र गटाचे नेते शरद पवार आणि त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मस्साजोग गावातील देशमुख कुटुंबियांची भेट घेतली.
सरकारने कितीही रक्कम दिली, तरी गेलेला माणूस परत येणार नाही. आता देशमुख कुटुंब एकटे नाही, आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत, असे शरद पवार यांनी सांगितले, तर धनंजय मुंडे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीला ग्रामस्थांनी घेराव घातला, तर दुसरीकडे परभणी येथे राज्यघटना अवमानाच्या विरोधात आंदोलनानंतर कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरीही शरद पवार आणि अजित पवार यांनी भेट दिली.