सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !
‘संस्कृत भाषेपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या संस्कृतोद़्भव भाषांच्या व्याकरणाचा पाया साहजिकच भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच राहिला. परिणामी या भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत.
११ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘नामांची अनेकवचने करण्याच्या पद्धती आणि ‘वचनां’शी संबंधित काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे’ पाहिली. आजच्या लेखात ‘भाषेतील लिंगव्यवस्थे’ची माहिती पाहू.
(लेखांक १८ – भाग १)
१. सजीव सृष्टीतील ‘पुल्लिगीं’ आणि ‘स्त्रीलिंगी’ नामे
सजीव सृष्टीतील मानवजातीमध्ये काही व्यक्ती ‘पुरुष’ असतात, तर काही ‘स्त्री’ असतात. पशूंमध्येही काही ‘नर (पुरुष जातीचे)’ असतात, तर काही ‘मादी (स्त्री जातीच्या)’ असतात. ‘एखादा सजीव पुरुष जातीचा आहे कि स्त्री जातीचा आहे ?’, हे त्याच्या लिंगावरून ठरते. ‘लिंग’ या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ ‘चिन्ह’ असा आहे. पुरुष जातीच्या सजिवाला ‘पुल्लिगीं’ आणि स्त्री जातीच्या सजिवाला ‘स्त्रीलिंगी’ असे म्हणतात. ‘पुत्र, पाहुणा, राजा, वाघ, सिंह इत्यादी’ नामे ‘पुल्लिगीं’आहेत, तर ‘कन्या, आत्या, संचालिका, कोंबडी, खार इत्यादी’ नामे ‘स्त्रीलिंगी’ आहेत.
१ अ. निर्जीव सृष्टीतील ‘पुल्लिगीं’ आणि ‘स्त्रीलिंगी’ नामे : ओटा, कमंडलू (साधूंच्या हातातील पाण्याचे भांडे), खुंटी, आसंदी (खुर्ची), गाडी इत्यादी या निर्जीव वस्तू आहेत. तांत्रिकदृष्ट्या या वस्तू ‘पुल्लिगीं’ अथवा ‘स्त्रीलिंगी’ असण्याचे काहीच कारण नाही; परंतु मराठी भाषेत अशा निर्जीव वस्तूंचा उल्लेखही ‘पुल्लिगीं’ अथवा ‘स्त्रीलिंगी’ करण्यात येतो. यांतील ‘ओटा’ आणि ‘कमंडलू’ हे पुल्लिगीं शब्द आहेत, तर ‘खुंटी’, ‘आसंदी’ अन् ‘गाडी’ हे स्त्रीलिंगी शब्द आहेत.
१ आ. सजिवांची लिंगे ही ‘वास्तविक’, तर निर्जिवांची लिंगे ही ‘काल्पनिक’ असणे : येथे लक्षात ठेवायचा भाग हा आहे, ‘सजीव जगतातील प्राणीमात्रांची लिंगे ही वास्तवात अस्तित्वात असतात, तर निर्जीव जगतातील वस्तूंची लिंगे ही काल्पनिक असतात. त्या त्या भाषिकांची भाषा वापरण्याची पद्धत आणि त्यांच्या कल्पना यांतून ती निश्चित होतात.’
१ इ. सजीव सृष्टी आणि निर्जीव सृष्टी यांतील ‘नपुंसकलिंगी’ नामे : ‘जी नामे पुरुष जातीची कि स्त्री जातीची आहेत ?’, हे लक्षात येत नाही, त्या नामांना ‘नपुंसकलिंगी’ नामे’, असे म्हणतात. ‘घर’ हे एक नाम आहे. भाषेत वापरतांना हे नाम पुरुषवाचक वापरले जात नाही आणि स्त्रीवाचकही वापरले जात नाही. आपण ‘तो घर’, असे म्हणत नाही आणि ‘ती घर’, असेही म्हणत नाही. अशा पुल्लिगीं आणि स्त्रीलिंगी दोन्ही लिंगांतील नसणार्या ‘घर’ या नामाला ‘नपुंसकलिंगी’ नाम असे म्हणतात. भाषेत वापरतांना ‘ते घर’, असे म्हटले जाते. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
मुंगूस, अजगर, गाव, स्थळ, ग्रहण इत्यादी.
१ ई. ‘लिंग’ या शब्दाची व्याख्या : वरील सूत्र क्र. ‘१’ ते ‘१ इ’ यांत दिलेल्या सर्व विवेचनावरून ‘लिंग’ या शब्दाची व्याख्या पुढीलप्रमाणे करता येते.
‘नामाच्या ज्या रूपावरून त्या नामाने दर्शवलेली गोष्ट पुरुष जातीची आहे, स्त्री जातीची आहे कि दोन्हींपैकी कोणत्याही जातीची नाही, याचा बोध होतो, त्या रूपाला ‘लिंग’ असे म्हणतात.’
यावरून आपल्या लक्षात आले असेल की, मराठीत पुल्लिगं, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग अशी तीन लिंगे आहेत.
२. शब्दाचे ‘लिंग’ ठरवण्याच्या काही पद्धती
२ अ. पुरुषी गुणधर्म असलेली नामे पुल्लिगीं, तर स्त्रियांसारखे गुणधर्म असलेली नामे स्त्रीलिंगी लिहिणे : मोठा आकार, पुष्कळ मोठा आवाज, पुष्कळ शक्ती, राकटपणा, कठोरपणा इत्यादी पुरुषी गुणधर्म ज्या नामांमधून व्यक्त होतात, ती नामे पुल्लिगीं लिहिली जातात. याउलट लहान आकार, हळूवारपणा, अल्प शक्ती, नाजूक आवाज, चंचलता, मृदुता, सौंदर्य इत्यादी स्त्रियांसारखे गुणधर्म ज्या नामांमधून व्यक्त होतात, ती नामे स्त्रीलिंगी लिहिली जातात. ‘ठसा’ या शब्दामध्ये राकटपणा आहे. ‘ठसा’ हा बहुतांश वेळा शक्तीचा वापर करून कागदावर मारावा लागतो. त्यामुळे हा शब्द पुल्लिगीं आहे. त्याच्या तुलनेत ‘स्वाक्षरी’ करण्यासाठी फारच अल्प शक्ती वापरावी लागते. ती अलगदपणे करता येते. बर्याचदा तिच्यामध्ये कलात्मकताही असते. त्यामुळे ‘स्वाक्षरी’ हा शब्द स्त्रीलिंगी आहे. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
२ अ १. वरील ‘२ अ’ या नियमाला अपवाद असणारे शब्द
अ. ‘हुंकार’ हा हळू आवाजात दिला जातो, तरी तो पुल्लिगीं लिहिला जातो आणि ‘किंकाळी’ ही मोठ्याने फोडली जाते, तरी ती स्त्रीलिंगी लिहिली जाते.
आ. ‘बिंदू’ हा आकाराने लहान असतो, तरी तो पुल्लिगीं लिहिला जातो आणि ‘रेष’ ही आकाराने मोठी असते, तरी ती स्त्रीलिंगी लिहिली जाते.’
(क्रमशः पुढच्या शुक्रवारी)
– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.३.२०२३)