जळगाव (महाराष्ट्र) आणि सोनपूर (बिहार) येथील साधकांना ‘घरोघरी लागवड मोहिमे’च्या अंतर्गत नैसर्गिक पद्धतीने लागवड करतांना शिकायला मिळालेली अन् जाणवलेली सूत्रे

१. श्री. शांताराम पाटील, चोपडा, जळगाव, महाराष्ट्र

श्री. शांताराम पाटील

१ अ. शिकायला मिळालेली सूत्रे

१ अ १.‘घरोघरी लागवड मोहिमे’च्या अंतर्गत भाजीपाल्याचे देशी बियाणे नैसर्गिक पद्धतीने बीजामृताची प्रक्रिया करून लावणे आणि ९० ते ९५ टक्के बिया रुजल्यामुळे आनंद होऊन लागवडीविषयीची उत्कंठा वाढणे : ‘मला पूर्वीपासून औषधी वनस्पती, भाजीपाला आणि फळझाडे लावण्याची आवड होती. वर्ष २०२१ पासून दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून ‘घरोघरी लागवड मोहीम’ चालू झाली. तेव्हा आम्हाला पुणे येथील श्रीमती ज्योती शहा यांचे मार्गदर्शन लाभले. तेव्हापासून माझा लागवडीच्या संदर्भातील उत्साह द्विगुणित झाला. त्यानंतर मी देशी भाजीपाल्याची बियाणे शोधली आणि छतावर (‘टेरेस’वर) कुंड्यांमध्ये नैसर्गिक पद्धतीने बीजामृताची प्रक्रिया करून बीजारोपण केले. त्यातून ९० ते ९५ टक्के बिया रुजल्या. त्यामुळे मला पुष्कळ आनंद झाला आणि माझी लागवडीविषयीची उत्कंठा वाढत गेली. गुरुदेवांच्या कृपेने बीजरोपण चांगले झाल्यामुळे मला अन्य साधकांनी त्यांच्यासाठी बीजरोपण करायला सांगितले. ‘गुरुकृपेने मला छतावर भाजीपाला लावण्याची आणि साधकांना साहाय्य करण्याची संधी लाभली’, याबद्दल मी गुरुचरणी कृतज्ञ आहे.

श्री. शांताराम पाटील यांच्या घरी केलेल्या लागवडीत आलेली भाजी आणि वनस्पती

दुधी भोपळा
इन्सुलिन
पानफुटी

१ अ २. जीवामृत (टीप १) घातल्याने आणि रोपांवर आच्छादन केल्याने वनस्पतींची वाढ झपाट्याने होऊ लागणे अन् त्यातून आनंद मिळू लागणे : बियांपासून उगवलेली रोपे लागवड करण्याइतकी वाढल्यावर मी झुडूपवर्गीय रोपे कुंडीत लावली आणि वेलवर्गीय रोपे छतावर वाफा (झाडे लावण्यासाठी विटा रचून केलेला कप्पा) करून त्यात लावली. प्रतिदिन सकाळी मी आणि माझी नात कु. किमया (वय २ वर्षे) छतावर जाऊन प्रत्येक वनस्पतीचे निरीक्षण करत होतो. किमया मला झाडे आणि वेली यांच्याविषयी माहिती विचारत होती. तिलाही लागवडीची सेवा करायला आवडते. ती मला कुंड्यांमध्ये पाणी आणि जीवामृत घालायला साहाय्य करत असे. आम्ही प्रत्येक १० दिवसांनंतर जीवामृत बनवून रोपांना घालत होतो. आम्ही जीवामृत घातल्यामुळे आणि रोपांवर आच्छादन केल्यामुळे वनस्पतींची वाढ झपाट्याने होऊ लागली. त्यातून मला आनंद मिळू लागला.

टीप १ – जीवामृत : देशी गायीचे शेण, गोमूत्र, बेसन आणि गूळ यांपासून बनवलेले एक मिश्रण

१ अ ३. सर्व रोपांना ‘मिलिबग (मावा)’ नावाची कीड लागल्यावर केलेला उपाय : काही दिवसांनी सर्व रोपांना ‘मिलिबग (मावा)’ नावाची कीड लागली आणि किडीचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले. त्यावर उपाय म्हणून पाण्यात कडूनिंबाच्या पानांचा रस, थोडे तिखट (लाल मिरचीची पूड) आणि गोमूत्र मिसळून त्याची रोपांवर फवारणी केली. फवारणीमध्ये गोमूत्राचे प्रमाण अधिक घेतले गेल्यामुळे रोपांची वाढ थांबली आणि त्यांची पाने पिवळी पडू लागली. नंतर ८ – १० दिवसांनी आम्ही जीवामृत दिल्यावर हळूहळू रोपे पूर्ववत् होऊ लागली.

१ अ ४. उन्हाळ्यात कडक ऊन असल्यामुळे त्याचा परिणाम रोपांच्या वाढीवर आणि फलधारणेवर झाला. त्यामुळे अपेक्षित अशी फलनिष्पत्ती मिळाली नाही.

१ अ ५. आजी-आजोबा नाशिकला गेले असतांना त्यांच्या २ वर्षांच्या नातीने आई-बाबांना छतावर घेऊन जाणे आणि त्यांना रोपांना पाणी घालायला सांगणे : आम्ही काकडी, दुधी भोपळा, मिरच्या, वांगी, लसूण, फळझाडे आणि औषधी वनस्पती लावल्या आहेत. मी आणि माझी पत्नी नाशिकला गेलो असतांना आम्ही आमची नात कु. किमया हिला तिच्या आई-बाबांना भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पती यांना पाणी अन् जीवामृत बनवून घालण्याची आठवण करून देण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे ती आई-बाबांना छतावर घेऊन जायची आणि रोपांना पाणी घालायला सांगायची.

१ अ ६. घरच्या घरी लागवड केल्याने वेळप्रसंगी भाजीपाला आणि औषधी वनस्पती लगेच उपलब्ध होणे : ‘आपण वनस्पतींची काळजी घेतो, तशीच वनस्पतीही आपली काळजी घेतात’, याची मला अनुभूती आली. आपण घाईत असलो, तर आपल्याला भाजीपाला आणायला बाजारात जाण्याची आवश्यकता नसते; कारण आपण घरची वांगी, मिरची, टॉमेटो काढून त्यांचा उपयोग करू शकतो, तसेच आपण अकस्मात् रुग्णाईत झालो, तर तातडीने चिकित्सालयात जाण्याची आवश्यकता नसते; कारण आपण औषधी वनस्पतींचा वापर करून प्राथमिक उपचार करू शकतो.

१ अ ७. ‘कोरोना’ महामारीच्या कालावधीत प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आणि कोरोनापासून बचाव होण्यासाठी गुळवेलीचा उपयोग होणे : ‘कोरोना’ महामारीच्या कालावधीत माझ्याकडे मोठ्या प्रमाणात गुळवेल लावलेली होती. मी ती घरातील व्यक्तींना आणि बाजूच्या लोकांना दिली. त्यामुळे सर्वांची प्रतिकारशक्ती वाढण्यास आणि कोरोनापासून बचाव होण्यास साहाय्य झाले. ‘सर्व प्रकारच्या तापावर गूळवेलीचा वापर केल्याने ताप पूर्णपणे बरा होतो’, याचा अनुभव मी घेतला. तेव्हापासून माझे वनस्पतींवरील प्रेम वाढले आहे.

१ आ. जाणवलेली सूत्रे

१. मी नाशिकहून चोपडा (जिल्हा जळगाव) येथे परत आल्यावर भाजीपाला, वेली आणि फळझाडे यांच्याकडे पाहिले. तेव्हा ‘ती माझी आतुरतेने वाट पाहत आहेत’, असे मला जाणवले.

२. भाजीपाला आणि वनस्पती हिरव्यागार अन् फळाफुलांनी बहरलेल्या दिसतात. त्या पाहून मलाही आनंद होतो.’ (२.११.२०२२)

२. श्री. राकेश श्रीवास्तव, सोनपूर, बिहार

श्री. राकेश श्रीवास्तव

२ अ. काही औषधी वनस्पती वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे न लागणे आणि ‘पावसाळ्याच्या कालावधीत या वनस्पतींची वाढ जोमाने होते’, असे लक्षात येणे : ‘मी घराजवळ पारिजातक, कोरफड, गुळवेल, हाडसांधी आणि गवती चहा, या सर्व औषधी वनस्पतींची लागवड केली आहे, तसेच या सर्वांचा मी औषधांसाठी उपयोग करतो. या सर्व वनस्पती वाढवण्यासाठी मला कोणतेही विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत. ‘पावसाळ्याच्या कालावधीत या वनस्पतींची वाढ जोमाने होते’, असे माझ्या लक्षात आले.’

(२५.१०.२०२२)