‘वचने’ आणि त्यांच्या संदर्भातील नियम

सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !

‘संस्कृत भाषेपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या संस्कृतोद्भव भाषांच्या व्याकरणाचा पाया साहजिकच भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच राहिला. परिणामी या भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. २० जानेवारी २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण व्याकरणातील ‘वचनां’च्या संदर्भातील काही नियम पाहिले. आजच्या लेखात त्यापुढील नियम पाहू.

सुश्री (कु.) सुप्रिया नवरंगे

(लेखांक १७ – भाग ३)

३. नामांच्या वचनांमध्ये पालट करतांना लक्षात ठेवायचे नियम

(टीप : या विषयातील ‘३ अ’ ते ‘३ ऊ’ ही सूत्रे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखांमध्ये देण्यात आली आहेत.)

३ ए. ऊ-कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन वा-कारांत होणे : ‘सासू’ हे ऊ-कारांत नाम आहे, म्हणजे त्याच्या शेवटच्या ‘सू’ या अक्षरामध्ये ‘ऊ’ हा स्वर समाविष्ट आहे. आपण ‘ती सासू’, असे म्हणतो. यानुसार ‘सासू’ हे स्त्रीलिंगी नाम आहे. अशा ऊ-कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन ‘सासवा’ असे वा-कारांत होते. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

३ ए १. वरील नियमाला अपवाद असणारे काही शब्द : वधू, वास्तू, वस्तू, वेणू (बासरी) इत्यादी.

३ ऐ. ‘बायको’ या मराठीतील बहुधा एकमेव ओ-कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन ‘बायका’ असे आ-कारांत होते.

३ ओ. अ-कारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन ए-कारांत होणे : ‘पद (हुद्दा)’ हे अ-कारांत नाम आहे; कारण त्यातील ‘द’ हे शेवटचे अक्षर ‘अ’मिश्रित आहे. आपण ‘ते पद’, असे म्हणतो. यानुसार ‘पद’ हे नपुंसकलिंगी नाम आहे. या नामाचे अनेकवचन ‘पदे’ असे ए-कारांत होते. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

३ औ. ई-कारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन एकवचनाप्रमाणेच रहाणे : ‘पाणी’ हे ई-कारांत नाम आहे. आपण ‘ते पाणी’, असे म्हणतो. यानुसार ते नपुंसकलिंगी नाम आहे. हे नाम असलेले पुढील वाक्य पहा.

‘या नदीचे पाणी चांगले आहे.’

वरील वाक्यात आपण एकाच नदीच्या पाण्याविषयी बोलतो. त्यामुळे या वाक्यात ‘पाणी’ हा शब्द एकवचनी आहे. याउलट ‘या दहा गावांतील सर्वत्रचे पाणी चांगले आहे’, या वाक्यात आपण दहा गावांतील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या पाण्याविषयी बोलतो. त्यामुळे या वाक्यात ‘पाणी’ हा शब्द अनेकवचनी वापरण्यात आला आहे; परंतु तो ‘पाणी’ असाच एकवचनाप्रमाणे लिहिला आहे. याची आणखी दोन उदाहरणे पुढे दिली आहेत.

(क्रमशः पुढील शुक्रवारी)

– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.२.२०२३)