‘गायीला आलिंगन देण्‍याचा दिवस’ साजरा करण्‍याचे आवाहन केंद्रशासनाकडून मागे !

समाजातून टीका होऊ लागल्‍याने आवाहन मागे घेतल्‍याची शक्‍यता !

नवी देहली – केंद्रशासनाच्‍या पशूसंवर्धन मंत्रालयाच्‍या सूचनेनंतर पशू कल्‍याण मंडळाने (‘अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया’ने) येत्‍या १४ फेब्रुवारीला म्‍हणजे पाश्‍चात्त्यांच्‍या ‘व्‍हॅलेंटाईन डे’च्‍या दिवशी ‘काऊ हग डे’ (गायीला आलिंगन देण्‍याचा दिवस) साजरा करण्‍याचे आवाहन केले होते. लोकांना त्‍यांच्‍या संस्‍कृतीविषयी जागृत करणे, भावनात्‍मक समृद्धी आणि आनंद घेण्‍यासाठी हा दिवस साजरा करण्‍यात येत असल्‍याचे या मंडळाकडून सांगण्‍यात आले होते; मात्र आता या मंडळाने त्‍यांचे हे आवाहन मागे घेतले आहे. मंडळाचे सचिव एस्.के. दत्ता यांनी नवीन पत्रक जारी करत ‘काऊ हग डे’ साजरा करण्‍याचे आवाहनपत्र मागे घेत असल्‍याचे घोषित केले आहे. मंडळाच्‍या ‘काऊ हग डे’ला सामाजिक माध्‍यमांतून, तसेच काही नेत्‍यांकडून विरोध होऊ लागल्‍याने ते मागे घेण्‍यात आल्‍याचे म्‍हटले जात आहेत.

१. समाजवादी पक्षाने नेते अखिलेश यादव यांनी म्‍हटले होते की, आलिंगन दिवस साजरा करण्‍याऐवजी ‘स्‍पर्श दिवस’ नाव ठेवायला हवे होते.

२. राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्‍हाड यांनीही प्रश्‍न उपस्‍थित केला होता.

३. ‘गायीविषयी कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यासाठी दिवाळीतील ‘वसुबारस’ हा सण साजरा केला जातो, तर हा दिवस कशासाठी ?’ असा प्रश्‍नही अनेकांकडून उपस्‍थित करण्‍यात आला होता. (याला संकुचित मानसिकता असेच म्‍हणावे लागेल ! जर अशा प्रकारचा अजून एक दिवस साजरा करून जागतिक स्‍तरावर त्‍याला महत्त्व देण्‍याचा प्रयत्न होत असेल, तर त्‍यात चुकीचे काय ? – संपादक)

बीबीसीकडून व्‍यंगचित्राद्वारे हिंदुद्वेषी टीका

नवी देहली – केंद्रशासनाच्‍या पशू कल्‍याण मंडळानेे येत्‍या १४ फेब्रुवारीला ‘काऊ हग डे’ (गायीला आलिंगन देण्‍याचा दिवस) साजरा करण्‍याचे आवाहन केल्‍यानंतर हिंदुद्वेषाची काविळ झालेल्‍या बीबीसीने एका व्‍यंगचित्राद्वारे याला हास्‍यास्‍पद ठरवण्‍याचा प्रयत्न केला होता. बीबीसीने या व्‍यंगचित्रात म्‍हटले होते, ‘येत्‍या आठवड्याभरात ‘काऊ गोबर डे’, ‘काऊ मूत्र डे’, ‘काऊ मिल्‍क डे’, ‘काऊ घास डे’ आदी साजरे करण्‍यात येतील.’ या व्‍यंगचित्राची पोस्‍ट बनवून बीबीसीने सामाजिक माध्‍यमांतून प्रसारित केली होती, त्‍यावर मुसलमानांकडून गायीविषयी अवमानकारक विधाने करण्‍यात येत होती.

संपादकीय भूमिका

  • भारतात हिंदुद्वेषी लोकांची संख्‍या अल्‍प नाही, त्‍यामुळे अशा प्रकारचा विरोध होणे नवीन नाही. त्‍यावर केंद्र सरकारने ठाम राहून हे आवाहन कायम ठेवायला हवे होते, असेच धर्माभिमानी हिंदूंना आणि गोप्रेमींना वाटते !
  • विदेशात ‘काऊ कडलिंग’ (गायींच्‍या सहवासात रहाणे) नावाने सहस्रो रुपये देऊन काही घंटे गायींच्‍या सहवासात राहून मानसोपचार करून घेण्‍याचा प्रयत्न करत असतात. त्‍याकडे पहाता भारतात अशा प्रकारचा दिवस साजरा करण्‍यात आला, तर त्‍यात वाईट काय आहे ? उलट त्‍याला सरकारी स्‍तरावर महत्त्व मिळाले असते !