‘वचने’ आणि त्‍यांच्‍या संदर्भातील नियम

सनातनचे संस्‍कृतवर आधारलेले नाविन्‍यपूर्ण मराठी व्‍याकरण !

संस्‍कृत भाषेपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या संस्‍कृतोद़्‍भव भाषांच्‍या व्‍याकरणाचा पाया साहजिकच भाषाजननी संस्‍कृतचे व्‍याकरण हाच राहिला. परिणामी या भाषांचे व्‍याकरण शिकण्‍यासाठी संस्‍कृतचे व्‍याकरण ठाऊक असणे अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्‍या आक्रमणामुळे नव्‍या पिढीला संस्‍कृतवर आधारित स्‍वभाषेचे व्‍याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्‍वभूमीवर या लेखमालेमध्‍ये मराठीची स्‍वायत्तता आणि तिचे संस्‍कृतशी असलेले आध्‍यात्मिक नाते जपत व्‍याकरणाचे नियम मांडण्‍यात आले आहेत.

मागील लेखात आपण ‘तमिळनाडू’, ‘मानस सरोवर’ इत्‍यादी शब्‍दांचे व्‍याकरण पाहिले. आजच्‍या लेखात व्‍याकरणातील ‘वचने’ या विषयासंबंधी जाणून घेऊ. (लेखांक १७ – भाग १)

सुश्री (कु.) सुप्रिया नवरंगे

१. ‘वचन’ म्‍हणजे काय ?

हे पहाण्‍यापूर्वी आपण ‘नाम म्‍हणजे काय ?’, याची थोडक्‍यात उजळणी करू. ‘व्‍यक्‍ती, प्राणी, वनस्‍पती, वस्‍तू इत्‍यादी सर्व सजीव-निर्जीव गोष्‍टी; त्‍यांचे गुण, अवगुण, तसेच वैशिष्‍ट्ये यांना दिलेल्‍या नावांना ‘नामे’ असे म्‍हणतात, उदा. संगीता, गाय, वड, दूध, पलंग, साधेपणा इत्‍यादी.’ अशा प्रकारे व्‍याकरणात नामाचा अर्थ पुष्‍कळ व्‍यापक आहे.

एखादे नाम उच्‍चारले की, त्‍या नामाने दर्शवलेली गोष्‍ट एक आहे कि एकापेक्षा अधिक आहे, हे ऐकणार्‍याच्‍या लगेच लक्षात येते. ‘इंद्रिय’ हे नाम उच्‍चारल्‍यावर ‘आपण एका इंद्रियाविषयी बोलत आहोत’ आणि ‘इंद्रिये’ असे म्‍हटल्‍यावर ‘आपण एकापेक्षा अधिक इंद्रियांविषयी बोलत आहोत’, हे ऐकणार्‍यास त्‍वरित कळते. अशा प्रकारे नामामध्‍ये संख्‍या दर्शवण्‍याचा गुणधर्म असतो. त्‍याला ‘वचन’ असे म्‍हणतात.

२. वचनांचे प्रकार

मराठी भाषेमध्‍ये वचनांचे ‘एकवचन’ आणि ‘अनेकवचन / अनेक वचन’ असे दोन प्रकार आहेत. (‘एकवचन’ आणि ‘अनेकवचन’ हे शब्‍द ‘एक वचन’ अन् ‘अनेक वचन’ असे तोडून न लिहिता जोडून लिहिले जातात. – सुश्री सुप्रिया)

२ अ. एकवचन : जेव्‍हा एखादे नाम उच्‍चारल्‍यावर ‘नामाने दर्शवलेली गोष्‍ट संख्‍येने एकच आहे’, हे लक्षात येते, तेव्‍हा त्‍या नामाला ‘एकवचन’ असे म्‍हणतात. ‘चक्र’ हे नाम उच्‍चारले की, त्‍यातून ‘चक्र संख्‍येने एकच आहे’, हे समजते. त्‍यामुळे या नामाला ‘एकवचन’ असे म्‍हणतात. बहुतांश नामांची मूळ रूपे ही एकवचनीच असतात, उदा. ‘यंत्र’ हे नाम आहे आणि ते एकवचनी आहे. ‘एकवचना’ची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत – अनुष्‍ठान, आकडा, उंबरठा, राष्‍ट्र, सूत्र इत्‍यादी.

२ आ. अनेकवचन : जेव्‍हा एखादे नाम उच्‍चारल्‍यावर ‘नामाने दर्शवलेली गोष्‍ट संख्‍येने एकापेक्षा अधिक आहे’, हे लक्षात येते, तेव्‍हा त्‍या नामाला ‘अनेकवचन’ असे म्‍हणतात, उदा. ‘पत्रे’ असे म्‍हटले की, त्‍यातून ‘पत्रे संख्‍येने दोन किंवा त्‍यापेक्षा अधिक आहेत’, हे समजते. त्‍यामुळे या नामाला ‘अनेकवचन’ असे म्‍हणतात. अनेकवचनाला ‘बहूवचन’ असेही एक नाव आहे. अनेकवचनाची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत – ओळी, औषधे, खुणा, नेते, लिंबे इत्‍यादी.

३. नामांच्‍या वचनांमध्‍ये पालट करतांना लक्षात ठेवायचे नियम    

३ अ. आ-कारांत पुल्लिगीं नामाचे अनेकवचन ए-कारांत होणे : ‘डोळा’ हा आ-कारांत शब्‍द आहे; कारण त्‍याच्‍या शेवटी ‘ळा’ हे ‘आ’युक्‍त अक्षर आले आहे. आपण ‘तो डोळा’, असे म्‍हणतो, म्‍हणजे ‘डोळा’ हा पुल्लिगीं शब्‍द आहे. अशा आ-कारांत पुल्लिगीं नामाचे अनेकवचन ‘डोळे’ असे ए-कारांत होते, म्‍हणजे या नामातील शेवटचे अक्षर ‘ळे’ असे ‘ए’युक्‍त होते. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

३ आ. आ-कारांत नामे वगळून अन्‍य सर्व पुल्लिगीं नामांची रूपे एकवचनात आणि अनेकवचनात सारखीच असणे : ‘ऊस’ हा अ-कारांत शब्‍द आहे; कारण त्‍याच्‍या शेवटचे ‘स’ हे अक्षर ‘अ’युक्‍त आहे. आपण ‘तो ऊस’, असे म्‍हणतो, म्‍हणजे हा शब्‍द पुल्लिगीं आहे. अशा अ-कारांत पुल्लिगीं नामाचे अनेकवचन ‘ऊस’ असेच होते. याच प्रकारे आ-कारांत नसलेल्‍या ई-कारांत, ऊ-कारांत इत्‍यादी सर्वच पुल्लिगीं नामांची रूपे एकवचनात आणि अनेकवचनात सारखीच असतात. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

(क्रमशः पुढील शुक्रवारी)

– सुश्री (कु.) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.१.२०२३)