सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळाऐवजी तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी जैन समाजाचा इचलकरंजी (कोल्हापूर) येथे मोर्चा !

जैन बांधवांनी इचलकरंजी शहरात काढलेला मोर्चा

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – झारखंड सरकारने जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या सम्मेद शिखरजीला पर्यटनस्थळाचा दिलेला दर्जा रहित करून तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी जैन समाजाने २६ डिसेंबरला प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी निवेदन स्वीकारले. या प्रसंगी आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामी ज्वालामालिनी, बाळासाहेब चौगुले, राहुल आवाडे, सौ. किशोरी आवाडे यांसह अन्य उपस्थित होते.

आमदार श्री. प्रकाश आवाडे म्हणाले, ‘‘भारतीय राज्यघटनेतील तरतुदींप्रमाणे पवित्र तीर्थक्षेत्रांचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा अधिकार अल्पसंख्यांकांना आहे. तीर्थक्षेत्रे असुरक्षित आणि अपवित्र होतील, असे कोणतेही कृत्य करता येत नाही. सम्मेद शिखरजी हे पर्यटनस्थळ झाल्यास त्याच्या उपासनेत व्यत्यय येईल.’’ लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामी ज्वालामालिनी म्हणाले, ‘‘ही भूमी जैन धर्मियांची म्हणजेच त्यांच्या हक्काची भूमी आहे. त्यासाठी आम्ही संयमाने मागणी करत आहोत. त्याची नोंद न घेतल्यास आम्हाला पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागेल.’’ याच मागणीसाठी जयसिंगपूर शहरातही मोर्चा काढण्यात आला.

संपादकीय भूमिका

पर्यटनस्थळाऐवजी तीर्थस्थळाचा दर्जा देण्याची मागणी करावी लागणे, हे हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता अधोरेखित करते !