देहलीतील आम आदमी पक्षाचे (‘आप’चे) सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘भारतीय नोटांवर देवी लक्ष्मी, गणपति यांच्या मुद्रा असायला हव्यात’, असे वक्तव्य केले आणि देशभर वादंग उठला. केजरीवाल यांच्या पाठोपाठ शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी ‘देवीदेवतांच्या प्रतीकांऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र लावावे’, असे सांगितले; पण खरच या नोटांवर कुणाचे चित्र छापायचे ? याविषयीचा असा काही कायदा आहे का ? केवळ म. गांधी यांचेच छायाचित्र या नोटांवर छापणे बंधनकारक आहे का ? कि या सगळ्यात केजरीवाल केवळ वादंगाच्या आगीत स्वतःची राजकीय स्वार्थाची पोळी भाजून घेत आहेत ? याचा ऊहापोह या लेखात केला आहे.
१. भारतीय चलनांचा पूर्वेतिहास
भारतीय चलनांचा इतिहास हा पार हडप्पा संस्कृतीपर्यंत मागे नेता येतो. त्याही काळात वापरात असलेली नाणी उत्खननात सापडली आहेत. त्यानंतर भारतीय इतिहासातील अनेक प्रसिद्ध राजघराण्यांनी राजेपदावर आल्यानंतर आपल्या नावाची नाणी सिद्ध केली होती. भारतात जो रुपया आपण सर्वच जण वापरतो, त्याचा प्रारंभ देहलीचा अफगाण सुलतान शेरशह या अफगाण सुलतानाने केली. त्यानेच चांदीचे ‘रुपया’ नावाचे चलन प्रचारात आणले. त्यानंतरही अनेक राजांनी स्वतःची चलने चलनात आणली. जसे छत्रपती शिवाजी महाराजांनीही स्वतःच्या राज्याभिषेकाच्या वेळी ‘शिवराई’ आणि ‘होन’ हे चलन प्रचारात आणले होते; पण ते फार काळ चलनात राहिले नाही. ही सर्व चलने नाण्यांच्या स्वरूपात होती. १८ व्या शतकापर्यंत भारतात कागदी नोटांचा वापर चालू झाला नव्हता.
१८ व्या शतकात बंगालमध्ये ब्रिटीश सत्ता आल्यानंतर ‘बँक ऑफ बंगाल’ने पहिल्यांदा भारतात कागदी नोटा छापल्या. वर्ष १८५७ च्या उठावानंतर देशाची सत्ता ही ब्रिटीश राजघराण्याकडे गेली आणि भारतीय नोटांवर ब्रिटीश राजांची चित्रे दिसायला लागली. किंग जॉर्ज सहावे यांचे चित्र पहिल्यांदा भारतीय नोटांवर छापले गेले. वर्ष १८६२ मध्ये त्यांची जागा राणी व्हिक्टोरियाने घेतली. वर्ष १९३५च्या कायद्याने भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली आणि किंग जॉर्ज सहावे यांचे चित्र असलेली १० सहस्र रुपयांची नोट चलनात आणली. यानंतर या इतिहासातील मोठा टप्पा येतो तो वर्ष १९४७ नंतर, म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर. या काळात सारनाथच्या अशोक स्तंभाचे चित्र असलेली नोट भारतात प्रचारात आणायचे ठरवले गेले आणि त्याचा प्रारंभ १ रुपयाच्या नोटेपासून करण्यात आला. आज आपण ज्या नोटा बघतो आहोत, त्यावर वर्ष १९९६ पासून त्यात नोटेच्या पुढल्या बाजूला म. गांधी यांचे छायाचित्र कायमस्वरूपी ठेवण्यात आले आणि मागच्या बाजूस वेगवेगळी चित्रे आहेत. कधी सारनाथचा अशोक स्तंभ, तर कधी दांडी यात्रा. भारत सरकारने वेळोवेळी आपल्या भारतासाठी अतुलनीय योगदान दिलेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ त्यांचे चित्र असलेली नाणी चलनात आणली आहेत. त्यामुळे भारतीय नोटांवर कुठले प्रतीक असावे ? याविषयी सरकारचा एकच असा कुठला कायदा नाही किंवा तशी कुठली प्रथा नाही.
(सौजन्य : Dainik Jagran – दैनिक जागरण)
२. देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याविषयी केजरीवाल बोलतील का ?
हा सगळा इतिहास बघता यावरून ‘आप’चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ज्या वादाला तोंड फोडले आहे. तो वाद अत्यंत निरर्थक आहे आणि केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठीच केला गेला आहे; कारण अशी हिंदु देवतांची चित्रे नोटांवर छापावीत का ? याविषयी वर्ष २०१० मध्येच तत्कालीन काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने विचार करायला प्रारंभ केला होता; पण त्यावर काहीच निर्णय घेतला नाही. सध्या हा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेकडे आहे. मूळात देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रश्न असतांना केजरीवाल यांनी याविषयी काही मत किंवा ठोस योजना सांगणे अधिक महत्त्वाचे ठरते, अन्यथा त्यांच्या धार्मिक भावनांशी खेळून आपला स्वार्थ साधण्याच्या डाव यशस्वी होईल.
– हर्षद वैद्य
(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’, २७.१०.२०२२)