महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेतील स्वरांमध्ये ‘ॲ’ आणि ‘ऑ’ या स्वरांचा समावेश !

मुंबई – महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेतील ‘स्वरांमध्ये ‘ए’ नंतर ‘ॲ’ आणि ‘ओ’ नंतर ‘ऑ’ या स्वरांचा समावेश केला आहे. त्यामुळे आता ‘अ’, ‘आ’, ‘इ’, ‘ई’, ‘उ’, ‘ऊ’, ‘ऋ’, ‘लृ’, ‘ए’, ‘ॲ’, ‘ऐ’, ‘ओ’, ‘ऑ’ आणि ‘औ’ असे १४ स्वर लिखाणात वापरता येणार आहेत. ‘अं’ आणि ‘अः’ हे स्वरादी आहेत. १० नोव्हेंबर या दिवशी याविषयीचा शासन आदेश काढण्यात आला आहे.

यासह शासकीय कामकाजात देठयुक्त ‘श’ आणि पाकळीयुक्त ‘ल’ स्वीकारण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. देवनागरी लिपीच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी मराठी भाषा विभागाने ‘मराठी भाषा विभागाकडून ‘मराठी भाषा प्रमाणलेखन निश्चितीकरण समिती’ स्थापन करण्यात आली होती. या समितीने मराठी वर्णमालेतील स्वर, स्वरादी, व्यंजने आणि विशेष संयुक्त व्यंजने यांच्या संख्येत कोणताही पालट सुचवलेला नाही. सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापिठे, मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, मराठी पाठ्यपुस्तके यांमध्ये शासनाच्या या नियमानुसार देवनागरी लिपीतील प्रमाणीकृत मराठी वर्णमाला, अक्षरमाला आणि अंक यांचा स्वीकार करणे आवश्यक असणार आहे. यांसह स्वरचिन्हे, स्वरांशचिन्हे, तसेच स्वरेतर चिन्हे अशा संज्ञा-संकल्पना अधिक काटेकोरपणे आणणे, ‘चंद्रबिंदू’चा समावेश करणे, ‘व्याप्तीचिन्ह, छेदचिन्ह अन् तिर्यकरेषा या लेखनचिन्हांचा समावेश करणे आदींचा शासकीय कामकाजात समावेश कायम असणार आहे.

महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेसंबंधी काढलेला शासनादेश स्वागतार्ह !

सुश्री (कु.) सुप्रिया नवरंगे

महाराष्ट्र शासनाने नुकताच मराठी भाषेसंबंधी काढलेला शासनादेश अतिशय विचारपूर्वक सिद्ध केलेला आणि अभ्यासपूर्ण आहे. वर्णमालेतील देठयुक्त ‘श’ आणि पाकळ्यांचा ‘ल’ ही या अक्षरांची मूळ सात्त्विक रूपे आहेत. शासनाने त्यांचा स्वीकार करण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. सध्याच्या काळानुसार ‘ॲ’ आणि ‘ऑ’ या नवीन स्वरांचा केलेला स्वीकार अपरिहार्य आहे. आज टंकलेखन, मुद्रण, त्यांच्या यंत्रणा इत्यादींमध्ये पुष्कळ पालट झाले आहेत. संगणकाच्या वापराने दैनंदिन जीवनात क्रांती केली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून या शासनादेशातील लिखाणाचे नवे नियम सिद्ध करण्यात आले आहेत. ते करतांना भाषेच्या मूळ स्वरूपाला धक्का लावण्यात आलेला नाही, उलट ‘लिखित भाषा चांगली कशी दिसेल’, याचा विचार करण्यात आला आहे, याकरता शासनाचे अभिनंदन !

– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड्. (दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होणार्‍या ‘सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !’, या सदराच्या संकलक) (१३.७.२०२२)