पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात भजन आणि कीर्तन करण्यास बंदी !

वारकरी संप्रदाय आणि श्री विठ्ठलभक्त यांमध्ये तीव्र संताप

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील सभामंडपात भजन आणि कीर्तन करण्यास मंदिराचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी बंदी घातली आहे. ‘यापुढे संत तुकाराम भवन येथे भजन-कीर्तन करावे’, अशी तोंडी सूचना गुरव यांनी दिली आहे. ‘भजन आणि कीर्तन हे देवासमोरच होणे आवश्यक आहे. त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी वारकरी संप्रदाय आणि श्री विठ्ठलभक्त यांनी दिली आहे. या निर्णयामुळे वारकरी संप्रदाय आणि श्री विठ्ठलभक्त यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

श्री विठ्ठल मंदिरात येणार्‍या लाखो भाविकांना दर्शनाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर समितीची स्थापना करण्यात आली आहे; मात्र कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर आणि सदस्य यांना माहिती न देता मंदिरातील सभामंडपात महाराज मंडळींना भजन आणि कीर्तन करण्यास बंदी घालण्याची तोंडी सूचना दिली.

प्रतिक्रिया

याविषयी चौकशी करण्यात येईल ! – ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सहअध्यक्ष, मंदिर समिती

ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी मंदिरात महाराजांना भजन आणि कीर्तन करण्यास बंदी घातली आहे, याविषयी काही ठाऊक नाही. याची चौकशी करण्यात येईल.

मंदिराच्या सभामंडपात भजन-कीर्तनास बंदी असणे संतापजनक ! – रामकृष्ण वीर महाराज, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, वारकरी संप्रदाय पाईक संघ

रामकृष्ण वीर महाराज

मंदिराच्या सभामंडपात चालू असणारा ‘श्री विठ्ठल नामजप’ बंद करण्याचे महापाप मंदिर समितीच्या अधिकार्‍यांनी केले आहे. हा प्रकार संतापजनक आहे. मंदिर सरकारच्या कह्यातून मुक्त करण्याचा लढा वारकरी संप्रदायाने पुकारलेला असतांना हा प्रकार घडणे म्हणजे सरकारीकरणाच्या दुष्परिणामाचा प्रत्यक्ष पुरावाच समितीने दिला आहे. दुर्दैव असे की, ‘भजनी विक्षेप तेची पै मरण !’ (आम्हाला भजनामध्ये व्यत्यय आल्यास, मरणप्राय वेदना होतात) हे जगद्गुरु तुकोबारायांचे उद्गार मंदिर समितीवर असलेले वारकरी प्रतिनिधी विसरले आहेत का ? यासंदर्भात अधिकार्‍यांवर मंदिर समितीच्या सदस्यांनी तात्काळ कारवाई करायला हवी आणि हे जमत नसल्यास तात्काळ सदस्य पदाचे त्यागपत्र द्यावे, अन्यथा आम्हाला त्यांच्याच घरासमोर आंदोलन करावे लागेल.

(म्हणे) ‘सभामंडपात मंदिर समितीचे कार्यालय असल्याने कामकाज करतांना त्रास होतो !’ – बालाजी पुदलवाड, व्यवस्थापक, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती

बालाजी पुदलवाड

श्री विठ्ठल मंदिरात महाराज मंडळींनी भजन आणि कीर्तन म्हटल्यास मुख दर्शन रांगेतील भाविकांना त्रास सहन करावा लागतो. भजन, कीर्तनास महाराज मंडळींचे अनेक शिष्यगण येत असल्याने पोलिसांना सुरक्षा करण्यासाठी अडचण येते, तसेच सभामंडपात मंदिर समितीचे कार्यालय असल्याने कामकाज करतांना त्रास होतो. या कारणामुळे महाराज मंडळींना मंदिरात भजन, कीर्तन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. (कामकाजात भजन-कीर्तन यांचा त्रास होत असेल, तर मंदिर समितीचे कार्यालय अन्यत्र का हालवत नाही ? त्यासाठी मंदिराच्या परंपरा मोडण्याची दुर्बुद्धी मंदिर समितीच्या सदस्यांना का होते ? – संपादक)

निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर आंदोलन करू !-हिंदु जनजागृती समिती

पंढरपूर देवस्थानमधील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोरील सभा मंडपात भजन-कीर्तन बंद करणारे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांचा निषेध करावा तेवढा अल्पच आहे. अशा प्रकारचे निर्णय हे मंदिर समितीच्या पदाधिकार्‍यांना माहिती नाहीत, याविषयी आश्‍चर्य वाटते. धार्मिक भावना दुखावणारे आणि लाखो वारकर्‍यांच्या भावनांशी खेळणारे निर्णय असे अधिकारी परस्पर कसे घेतात ? आणि संबंधित अन्य पदाधिकार्‍यांना हे ठाऊक कसे नसते ? हा निर्णय जर अधिकार्‍याने तोंडी आणि वैयक्तिक घेतला असेल, तर त्या अधिकार्‍यावर कारवाई करावी. त्याचे तात्काळ निलंबन करावे आणि श्री विठ्ठल मंदिरामध्ये भजन-कीर्तनाचा अडथळा होतो, यापेक्षा मंदिर समितीच्या कार्यालयाचा अडथळा होत असेल, तर ते कार्यालय अन्यत्र हलवावे, भजन-कीर्तन बंद करू नये. आज भजन-कीर्तन बंद केले आहे. उद्या मंदिरात जाऊन दर्शन बंद करतील. या गोष्टींचा हिंदु जनजागृती समितीकडून आम्ही निषेध करत आहोत. मंदिर सरकारीकरण करण्याचा हा दुष्परिणाम आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास संपूर्ण राज्यभर आम्ही आंदोलन करू, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी दिली आहे.

संपादकीय भूमिका

  • भक्तांना भक्तीभावाने देवासमोर भजन, कीर्तन करता यावे, यासाठीच मंदिरांची निर्मिती करण्यात आली आहे. असे असतांना मंदिरातील अधिकारी त्यावरच बंदी घालत असतील, तर मंदिर सरकारीकरण हिंदूंसाठी किती घातक आहे ? हे लक्षात येते !
  • आज भजन, कीर्तनाला बंदी घातली आहे, उद्या दर्शनालाही बंदी घालायला सरकारी अधिकारी मागे-पुढे पहाणार नाहीत. हे हिंदूंनी लक्षात घेऊन मंदिर सरकारच्या कह्यातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत !
  • याच अधिकार्‍यांनी ‘आवाजाचा त्रास होतो’ म्हणून मशिदीवरील अजान बंद करण्यास सांगितले असते का ? कि केवळ हिंदू सहिष्णु आहेत, म्हणून त्यांच्यावरच निर्बंध लादायचे ?