सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !
‘संस्कृत भाषेपासून मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषांची निर्मिती झाली. या संस्कृतोद्भव भाषांच्या व्याकरणाचा पाया साहजिकच भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच राहिला. परिणामी या भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असण्ो अनिवार्य बनले. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.
मागील लेखात आपण सर्वनामांचे काही प्रकार पाहिले. आजच्या लेखात ‘विशेषणां’ची माहिती घेऊ.
(लेखांक ११)
१. ‘विशेषण’ म्हणजे काय ?
‘ससा पांढराशुभ्र होता’, या वाक्यातील ‘ससा’ हे नाम आहे. ‘ससा कसा होता ?’, तर ‘पांढराशुभ्र’ होता, म्हणजे ‘पांढराशुभ्र’ ही सशाविषयी दिलेली विशेष माहिती आहे. अशा प्रकारे ‘वाक्यातील नामाविषयी विशेष माहिती देणार्या शब्दाला ‘विशेषण’ असे म्हणतात.’ याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत आणि प्रत्येक उदाहरणाच्या शेवटी कंसात त्यातील विशेषण दिले आहे.
अ. प्रवीण सज्जन आहे. (सज्जन)
आ. कपडे सात्त्विक असायला हवेत. (सात्त्विक)
इ. वटवृक्ष सातशे वर्षे जुना आहे. (सातशे वर्षे जुना)
ई. रायगड ही राजधानी होती. (राजधानी)
विशेषण वाक्यातील ज्या नामाविषयी विशेष माहिती सांगते, त्या नामाला ‘विशेष्य’ असे म्हणतात. वरील वाक्यांमधील ‘प्रवीण’, ‘कपडे’, ‘वटवृक्ष’ आणि ‘रायगड’ ही ‘विशेष्ये’ आहेत.
२. वाक्यात विशेषण हे नेहमी नामासह येत असणे
वाक्यात नाम असेल, तरच विशेषण येते. नाम नसेल, तर येत नाही. त्याचबरोबर वाक्यात नाम नसेल, तर एरव्ही विशेषण असणारे शब्द नामाचे कार्य करतात. याचे एक उदाहरण पुढे दिले आहे.
अ. विद्वान व्यक्ती कधी विद्वत्तेचे प्रदर्शन करत नाहीत. – या वाक्यात ‘विद्वान’ हे ‘व्यक्ती’ या नामाचे विशेषण आहे.
अ १. विद्वान कधी विद्वत्तेचे प्रदर्शन करत नाहीत. – या वाक्यात ‘व्यक्ती’ हे नाम आलेले नसल्यामुळे ‘विद्वान’ हाच शब्द नामाचे कार्य करतो. येथे तो विशेषण नाही.
३. विशेषणांचे प्रकार
विशेषणांचे पुढील तीन प्रकार आहेत.
३ अ. गुणविशेषण
३ आ. संख्याविशेषण
३ इ. सार्वनामिक विशेषण
३ अ. गुणविशेषण : ‘शहाणा मुलगा’ या शब्दरचनेत ‘मुलगा’ हे नाम आहे आणि ‘शहाणा’ हे त्याचे विशेषण आहे. ‘शहाणा’ हा त्या मुलाचा गुण आहे. अशा प्रकारे ‘ज्या विशेषणाद्वारे शब्दरचनेतील नामाचा एखादा गुण सांगितला जातो अथवा त्याची वैशिष्ट्यपूर्ण स्थिती दर्शवली जाते, त्या विशेषणाला ‘गुणविशेषण’ असे म्हणतात.’ याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
दैवी बालक, रसाळ संत्री, शिस्तबद्ध आयोजन, बहुमूल्य मार्गदर्शन, निळा पडदा इत्यादी.
३ आ. संख्याविशेषण : ‘चार कोन’ या शब्दरचनेत ‘कोन’ हे नाम आहे आणि ‘चार’ हे त्याचे विशेषण आहे. अशा प्रकारे ‘ज्या विशेषणाद्वारे शब्दरचनेतील नाम ‘किती संख्येने आहे ?’, हे सांगितले जाते, त्या विशेषणाला ‘संख्याविशेषण’ असे म्हणतात.’ याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
सात समुद्र, चौसष्ट कला, अर्धा लिटर, एक दशांश भाग, थोडा वेळ इत्यादी.
३ इ. सार्वनामिक विशेषण : ‘त्याचा तबला’, या शब्दरचनेतील ‘त्याचा’ हे सर्वनाम आहे आणि ‘तबला’ हे नाम आहे. वास्तविक सर्वनाम हे नामाच्या ऐवजी वापरले जाते; पण या ठिकाणी ‘त्याचा’ हे सर्वनाम ‘तबला’ या नामाच्या ऐवजी वापरलेले नाही, तर ते ‘तबला’ या नामाविषयी विशेष माहिती सांगण्यासाठी, म्हणजे ‘तो तबला कुणाचा आहे ?’, हे सांगण्यासाठी वापरले आहे. याचा अर्थ या शब्दरचनेत ‘त्याचा’ हे सर्वनाम राहिलेले नसून विशेषणाचे कार्य करत आहे. सर्वनामांपासून सिद्ध झालेल्या अशा विशेषणांना ‘सार्वनामिक विशेषणे’ असे म्हणतात. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
तिच्या वस्तू, कोणता परिसर ?, तो रस्ता, हे देश, ही फुले इत्यादी.’
(समाप्त)
– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.८.२०२२)