भाजपच्या प्रवक्त्या नुपुर शर्मा यांना इस्लामी कट्टरतावाद्यांकडून बलात्कार करून गळा चिरण्याची धमकी !

शर्मा यांच्यावर महंमद पैगंबर यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप !

देहली – देहली भाजपच्या नेत्या आणि पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा यांना इस्लामी कट्टरतावाद्यांकडून बलात्कार करण्यासह गळा चिरून हत्या करण्याची धमकी दिली जात आहे. त्यांच्या कुटुंबालाही जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे. वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणावरून ‘टाइम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रामध्ये बोलत असतांना त्यांनी महंमद पैगंबर यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, असा त्यांच्यावर आरोप केला जात आहे. यामुळे सुन्नी बरेलवी संघटना असलेल्या रझा अकादमीकडून पोलिसांत तक्रारही प्रविष्ट करण्यात आली आहे.

चर्चासत्रामध्ये शर्मा म्हणाल्या होत्या की, जर हिंदूंच्या श्रद्धांवर चिखलफेक करण्यात येत असेल, तर इस्लामविषयी मीही अशा प्रकारे टिप्पणी करू शकते. त्यांनतर त्यांनी महंमद पैगंबर यांच्याशी संबंधित एका घटनेविषयीचा उल्लेख केला. त्यांचे हे वक्तव्य सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित केले जात आहे.

संपादकीय भूमिका

  • बहुसंख्यांक हिंदूंच्या देशातील सत्ताधारी पक्षाच्या राष्ट्रीय महिला प्रवक्त्याला अशी धमकी मिळणे, हे हिंदू आणि शासनकर्ते यांना लज्जास्पद !
  • भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांना अशी धमकी मिळत असेल, तर सर्वसाधारण हिंदूंची काय स्थिती असेल, याचा विचारच न केलेला बरा !

 ‘अ‍ॅल्ट न्यूज’चे महंमद जुबेर यांनी नुपुर शर्मा यांच्या वक्तव्याची मोडतोड  करून मुसलमानांना उकसवले !

‘अ‍ॅल्ट न्यूज’ नावाच्या हिंदुद्वेषी आणि राष्ट्रद्रोही वृत्तसंकेतस्थळावरून त्याचे सहसंस्थापक महंमद जुबेर यांनी नुपुर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याची मोडतोड करून ट्वीट केले. या माध्यमातून त्यांनी मुसलमानांना उकसवले. त्यामुळे शर्मा यांना जिवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या. शर्मा यांनी जुबेर यांच्या ट्वीटचा, तसेच त्यांच्या विरोधात धमक्या देणारे ‘स्क्रीनशॉट्स’ घेऊन देहली पोलिसांच्या नावाने ट्वीट केले.

राष्ट्रीय महिला आयोग महंमद जुबेर आणि संबंधित इस्लामी कट्टरतावादी यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करील का ? – संपादक