वळवई येथे कीर्तन संस्कार प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन

कीर्तन म्हणजे चालते बोलते ज्ञानपीठच ! – गोविंद गावडे, कला आणि संस्कृती मंत्री

सावईवेरे, १५ मे (वार्ता.) – कीर्तन म्हणजे चालते बोलते ज्ञानपीठच आहे. कीर्तन हे सुसंस्कारित पिढी घडवण्याचे आणि प्रबोधन करण्याचे उत्कृष्ट माध्यम आहे, असे प्रतिपादन कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी येथे केले. वळवई येथील श्री गजांतलक्ष्मी संस्थान आणि ‘तारी सोसायटी’ यांनी संयुक्त विद्यमाने ‘गोमंतक संत मंडळ’ संचालित कीर्तन विद्यालय यांच्या सहकार्याने वळवई येथील तारी सभागृहात ४ दिवसीय निवासी कीर्तन संस्कार प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात १४ मे या दिवशी झालेल्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने मंत्री गोविंद गावडे बोलत होते.

कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे

याप्रसंगी राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. सुहासबुवा वझे, श्री गजांतलक्ष्मी देवस्थानचे अध्यक्ष मधुसूदन तारी, ‘तारी सोसायटी’चे अध्यक्ष रत्नाकर तारी आणि पत्रकार नरेंद्र तारी यांची उपस्थिती होती. कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी त्यांच्या भाषणात पुढे ह.भ.प. सुहासबुवा वझे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या गोमंतक संत मंडळाच्या कार्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. प्रारंभी ‘गोमंतक संत मंडळा’च्या कार्याचा आढावा घेतांना ह.भ.प. सुहासबुवा वझे म्हणाले, ‘‘हेवेदावे, जातीभेद, मत्सर आज शिगेला पोचला आहे आणि यावर नियंत्रण आणण्यासाठी, तसेच हिंदु धर्माच्या रक्षणाकरिता संस्कारांची अत्यंत आवश्यकता आहे. लोकांमध्ये भक्ती निर्माण होण्यासाठी मंदिरांमधून धर्माचे शिक्षण देणे अत्यावश्यक आहे.’’ कार्यक्रमाच्या निमित्ताने वळवई येथील ज्येष्ठ कलाकारांचा मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

श्री. चेतन राजहंस

शिबिरात आयोजित ‘कीर्तन परिसंवाद’ या कार्यक्रमात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांचा सहभाग

कीर्तन संस्कार प्रशिक्षण शिबिरात १४ मे या दिवशी दुपारी ४ वाजता कीर्तन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादामध्ये कवी आणि लेखिका सौ. दीपा मिरींगकर, शिक्षिका सौ. निलांगी शिंदे, दैनिक ‘तरुण भारत’चे सहसंपादक श्री. राजू नाईक, दैनिक ‘गोमंतक’चे प्रतिनिधी श्री. नरेंद्र तारी आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांचा सहभाग होता.

परिसंवादामध्ये श्री. चेतन राजहंस म्हणाले, ‘‘जेव्हा एखादी कृती, पद्धत किंवा परंपरा काळाच्या कसोटीत टिकून रहाते आणि उलट ती वाढतच जाते तिला संस्कृती असे म्हणतात. कीर्तन हे भक्तीयोगाचे एक अंग असून ते काळाच्या कसोटीत टिकून राहिले. धर्म, तत्त्वज्ञान, नीती आणि कला ही संस्कृतीची ४ अंगे असून त्यांचे दर्शन कीर्तनातून होत असते. कीर्तन म्हणजे दशकलेचा एक संगम आहे.’’ तरुण भारतचे सहसंपादक श्री. राजू नाईक यांनी त्यांच्या मार्गदर्शनात कीर्तनाचा शालेय अभ्यासक्रमात सहभाग होणे काळाची आवश्यकता असल्याचे म्हटले.

ह.भ.प. सुहासबुवा वझे

♦ परिसंवादाच्या अखेर आभार व्यक्त करतांना राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. सुहास बुवा म्हणाले, ‘‘सनातन संस्था देव, देश, धर्म आणि अध्यात्म यांसाठी तळमळीने कार्य करत आहे. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांच्याकडून आम्हाला आज कीर्तनाविषयी अमूल्य असे मार्गदर्शन लाभले, हे आमचे भाग्य आहे. ’’

♦ तरुण भारतचे सहसंपादक श्री. राजू नाईक म्हणाले, ‘‘श्री. चेतन राजहंस यांनी किर्तनावर उत्कृष्ट वर्गच घेतला. मी आश्‍वस्त झालो.’’

शिबिरात आनंदी जीवन जगण्यासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेविषयी मार्गदर्शन

कीर्तन संस्कार प्रशिक्षण शिबिरात १४ मे या दिवशी सकाळच्या सत्रात सनातनचे साधक श्री. संगम बोरकर यांनी आनंदी जीवन जगण्यासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया या विषयावर मार्गदर्शन केले. श्री. संगम बोरकर यांनी स्वभावदोष निर्मूलनाचे महत्त्व, आपल्या स्वभावदोषांमुळे आपल्यावर शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर होत असलेला परिणाम, प्रक्रियेचा लाभ आदींविषयी माहिती दिली. शिबिरार्थींनी या वेळी उत्स्फूर्तपणे त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले. ‘आम्हाला स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवून आदर्श व्यक्ती बनायचे आहे’, असा निर्धार या वेळी शिबिरार्थींनी केला.