हिंदुत्वनिष्ठांचा राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी संघटितपणे कार्य करण्याचा संकल्प !

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाग्यनगर (आंध्रप्रदेश) येथे षष्टम् राज्यस्तरीय हिंदू अधिवेशन पार पडले !

२५ हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ११० हून अधिक पदाधिकारी उपस्थित

राष्ट्र आणि धर्म यांवर होणाऱ्या आघातांविषयी चर्चा

भाग्यनगर (आंध्रप्रदेश) – विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे संघटन आणि हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यांसाठी २७ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे षष्टम् राज्यस्तरीय हिंदू अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाला तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांतील २५ हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ११० हून अधिक पदाधिकारी उपस्थित होते. या अधिवेशनाला धर्माभिमानी अधिवक्ते आणि उद्योगपती यांनीही उपस्थित राहून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात सहभाग नोंदवला. या अधिवेशनाला सनातन संस्थेचे ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि भाजपचे धर्माभिमानी आमदार श्री. टी. राजासिंह यांनी संबोधित केले. या अधिवेशनामध्ये सर्व हिंदुत्वनिष्ठांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी संघटितपणे कार्य करण्याचा संकल्प केला.

या अधिवेशनामध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील आव्हाने, लव्ह जिहाद, हलाल अर्थव्यवस्था, इस्लामी राज्य आणण्यासाठी धर्मांधाकडून रचण्यात येत असलेले षड्यंत्र, देवालयांचे रक्षण, धर्मनिरपेक्षतेची निरर्थकता आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता अशा विविध विषयांवर वक्त्यांनी मार्गदर्शन केले. यासमवेतच राष्ट्र आणि धर्म यांवर होणारी आक्रमणे अन् समस्या यांवरही चर्चा करण्यात आली.