साधनेच्या प्रत्येक टप्प्यावर साधकांना प्रीतीने सांभाळणार्‍या सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर !

आज फाल्गुन कृष्ण पक्ष द्वादशी (२९.३.२०२२) या दिवशी सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर यांचा ४९ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…

१. सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात सेवेसाठी येण्याची संधी मिळून संतांचा सत्संग लाभणे

सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर

१ अ. आश्रमात परात्पर गुरु पांडे महाराज आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर यांची भेट होणे : वर्ष २०१० मध्ये मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने देवद येथील सनातनच्या आश्रमात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या तपपूर्ती सोहळ्याच्या वेळी सेवा करण्याची संधी मिळाली. या वेळी प्रथमच मला संतांचे दर्शन झाले. आधी परात्पर गुरु पांडे महाराज आणि नंतर सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर यांची भेट झाली. ही भेट म्हणजे ‘श्री गुरूंनी या अज्ञानी जिवाला जणू त्यांच्याजवळ घेतल्याचा अनमोल क्षण होता’, हे आजवरच्या अनुभूतींतून लक्षात येते.

१ आ. आश्रमात ५ दिवसांसाठी आल्यावर साधकांचे निरपेक्ष प्रेम आणि संतांची प्रीती अनुभवायला मिळणे, घरी जाण्यापूर्वी सद्गुरु अनुताई आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी ‘पुन्हा लवकर या’, असे म्हटल्यावर ‘देवाने त्याच्या अधिक जवळ घेतले आहे’, असे वाटणे : मी घरी जातांना सद्गुरु अनुताईंनी मला ‘आश्रमात पुन्हा येणार ना ?’, असे विचारले आणि जणू माझ्यासाठी आश्रमात येण्याचा संकल्पच केला. आमच्या घरातील कुणीच साधनेत नसल्याने ते मला आश्रमात पाठवायला सिद्ध नव्हते, तरीही सद्गुरूंच्या संकल्पामुळे मी प्रथमच ५ दिवसांसाठी आश्रमात रहायला आलो. या ५ दिवसांच्या सत्संगात देवाने मला साधकांचे निरपेक्ष प्रेम आणि संतांची प्रीती अनुभवायला दिली. मला दैवी सुगंधाची अनुभूतीही आली. देवाने मला पुष्कळ काही दिले. आश्रमातील भावमय वातावरणात रहाता आल्याने ‘सेवेतच रहावे’, असे मला वाटू लागले. घरी जाण्यापूर्वी सद्गुरु अनुताई आणि सद्गुरु राजेंद्रदादा यांची भेट झाली. तेव्हा त्यांनी ‘पुन्हा लवकर या’, असे मला सांगितले. तेव्हा ‘देवाने मला त्याच्या अधिक जवळ घेतले आहे’, अशी मला जाणीव झाली.

२. साधनेच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेरणा देणार्‍या आणि साहाय्य करणार्‍या सद्गुरु अनुराधा वाडेकर !

श्री. मनीष माळी

२ अ. सत्संगातील सूत्रे लिहून घेण्याची सवय नसल्याने सद्गुरु ताईंनी ‘एक एक सूत्र कसे लिहायचे’, हे शिकवणे : वर्ष २०११ मध्ये मी देवद आश्रमात असणार्‍या सत्संगांना जाऊ लागलो. त्या वेळी सत्संगात सद्गुरु अनुताईसुद्धा असायच्या. मला सत्संगातील सूत्रे लिहून घेण्याची सवय नसल्याने मी कोणतीच सूत्रे लिहून घेत नव्हतो. हे पाहून सद्गुरु ताईंनी मला त्यांच्या जवळ बसवले आणि ‘एक एक सूत्र कसे लिहायचे’, हे शिकवले. ‘सत्संगातील सूत्रे माझ्या लक्षात येत आहेत ना’, याकडे त्यांचे लक्ष असायचे.

२ आ. प्रांतीय हिंदू अधिवेशनाच्या वेळी घरातून सेवेला जाण्यास विरोध होणे, श्रीकृष्णाला प्रार्थना केल्यावर श्रीकृष्णाच्या ठिकाणी सद्गुरु अनुताई दिसणे आणि सेवेला जाण्याची प्रेरणा मिळणे : सद्गुरु अनुताईंच्या कृपेने वर्ष २०१३ मध्ये प्रांतीय हिंदू अधिवेशनाच्या वेळी मला सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी परीक्षेचे दिवस जवळ आल्याने मला घरातून सेवेला जाण्यास विरोध होत होता. त्या वेळी मी आमच्या घरातील देवघरात असलेल्या श्रीकृष्णाला मनातील संघर्ष सांगत होतो. नंतर मी प्रार्थना करून डोळे उघडले, तर मला श्रीकृष्णाच्या ठिकाणी सद्गुरु अनुताई उभ्या असल्याचे दिसले. हे दर्शन ३० ते ४० सेकंद झाले. त्यानंतर मी काहीतरी कारण सांगून सेवेसाठी गेलो. या अनुभूतीतून सद्गुरु ताईंची प्रीती मला अनुभवायला आली.

२ इ. ठाणे येथे कार्यक्रमाला जायचे असतांना सद्गुरु अनुताईंनी साधकाचा उसवलेला सदरा शिवून देणे : एप्रिल २०१४ मध्ये मी मुंबई येथील सेवाकेंद्रात सेवेसाठी गेलो होतो. एकदा ठाणे येथील एका कार्यक्रमात मला सद्गुरु अनुताईंच्या समवेत जायचे होते. या कार्यक्रमाला जाण्यासाठी माझ्याकडे चांगला सदरा नव्हता. माझ्या सदर्‍याची शिलाईही उसवली होती. तेव्हा त्यांनी माझ्या सदर्‍याची उसवलेली शिलाई नीट शिवून दिली आणि मला साहाय्य केले. त्या वेळी ‘संत माझ्यासाठी किती करतात, त्यांचे ऋण कोणत्या जन्मी आणि कसे फिटेल देवा ?’, असे वाटून मला कृतज्ञता वाटली.

३. वर्ष २०१८ ते २०२१ मध्ये ‘युवा साधक प्रशिक्षण कार्यशाळे’त सेवा करतांना सद्गुरु अनुताईंकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

३ अ. कर्तेपणा स्वतःकडे न घेणे : देवाने मला पुष्कळ वेळा संतांच्या वाणीतील चैतन्य अनुभवण्यास दिले आहे. कधीही सद्गुरु अनुताईंचा आवाज नकळत जरी ऐकला, तरी माझी भावजागृती होते. काही वेळा ‘सद्गुरु अनुताई’ असा विचार आला, तरी मनाला आनंद आणि भाव यांची स्पंदने जाणवतात. याविषयी मी सद्गुरु अनुताईंना सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘तुझा भाव आहे; म्हणून असे होते. तू परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण कर. आपल्याला तिथे (त्यांच्यापर्यंत) जायचे आहे.’’

३ आ. ‘श्री गुरूंना आढावा द्यायचा आहे’, असे सांगून तत्परतेने आढावा पूर्ण करून घेणे : दिवसभर कार्यशाळा झाल्यावर ‘कार्यशाळेचा आढावा उद्या सिद्ध करावा’, असा विचार आम्ही साधकांनी केला होता; पण सद्गुरु अनुताईंनी ‘श्री गुरूंना आढावा द्यायचा आहे’, असे म्हणून रात्री जागून आमच्याकडून तो पूर्ण करून घेतला. संत ‘गुरूंच्या सेवेत किती सतर्क आणि तत्पर असतात’, हे सद्गुरु ताईंकडून मला शिकायला मिळते.

३ इ. सत्संगातील सर्व सूत्रे स्वतः लिहून घेणे : कार्यशाळा, सत्संग आदी प्रसंगी सद्गुरु अनुताई स्वतः सर्व सूत्रे लिहून घ्यायच्या. हे पाहून ‘मी थोडीच सूत्रे लिहून घेतो आणि नंतर ‘मला सर्व समजले आहे’, असे म्हणून काही लिहून घेत नाही’, हे माझ्या लक्षात आले.

३ ई. चुकांवर तत्त्वनिष्ठतेने दृष्टीकोन देणे : सद्गुरु अनुताई सेवेतील चुकांवर साधकांना तत्त्वनिष्ठतेने दृष्टीकोन देतात. तेव्हा त्यांच्यामध्ये मारक भावातील प्रीती जाणवते. त्या वेळी साधकांची साधना व्हावी, ही त्यांची तळमळ आणि प्रीती खर्‍या अर्थाने लक्षात येऊन कृतज्ञता वाटते.

३ उ. अनुभूती – कार्यशाळेत सेवा करतांना सद्गुरु अनुताई समोर असतांना ‘चैतन्याचा पिवळा, भावाचा निळा आणि निर्गुणाचा पांढरा गोळा माझ्याकडे येत आहे’, असे मला जाणवायचे.

सद्गुरु ताई रात्री उशिरापर्यंत जागून सेवा करतात. हे पाहून ‘आपण करत असलेली सेवा ही केवळ त्यांच्या चैतन्य शक्तीमुळे आणि अस्तित्वामुळे होत आहे’, असे लक्षात आले.

४. सद्गुरु अनुताईंच्या आशीर्वादाने ‘ऑनलाईन’ कार्यशाळेत हिंदी भाषेत विषय मांडता येणे

कोरोना महामारीच्या काळात युवा साधकांच्या ‘ऑनलाईन’ कार्यशाळेचे आयोजन केले होते. तेव्हा ‘कार्यशाळेत मी हिंदी भाषेत विषय मांडायचा आहे’, हे मला समजले. तेव्हा ‘मी हिंदी भाषेत बोलू शकेन का ?’ हा विचार मनात येऊन माझ्या मनाची स्थिती अस्थिर झाली. त्यानंतर सद्गुरु अनुताईंशी बोलल्यावर त्यांनी ‘तुला विषय मांडायला जमेल’, असे सांगितले आणि त्यांच्या आशीर्वादानेच मी कार्यशाळेत हिंदीतून बोलू शकलो.

‘परात्पर गुरु डॉक्टर, सद्गुरु अनुताईंच्या प्रमाणे मलाही सतत शिकण्याच्या स्थितीत रहाता येऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.

‘सद्गुरु अनुताई, आपण शिकवलेले सर्व माझ्या कृतीत येऊ दे. आपण मला गुरुदेवांच्या चरणी घेऊन जावे’, हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे.

– श्री. मनीष माळी, पेण, जिल्हा रायगड. (१३.२.२०२२)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक