आज फाल्गुन कृष्ण पक्ष द्वादशी (२९.३.२०२२) या दिवशी सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर यांचा ४९ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…
२८.११.२०२१ या दिवशी पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या फोंडा, गोवा येथील घरी त्यांची मुलगी चि.सौ.कां. वैष्णवी (आताची सौ. अनन्या अक्षय पाटील) हिच्या विवाहानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी सद्गुरु ((सुश्री (कुमारी)) अनुराधा वाडेकर येणार होत्या. त्या वेळी त्यांच्या सहवासात मला आलेल्या अनुभूती आणि त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर यांच्या चरणी ४९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचा पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या घरी लाभलेला सत्संग !
१ अ. सद्गुरु अनुराधा वाडेकर येणार, त्या दिवशी दुपारपासूनच वातावरणात वेगळा उत्साह जाणवून पुष्कळ दिवसांनी संध्याकाळच्या वेळी शीतल वारा वहाणे : मी सद्गुरु अनुताई यांना २ वर्षांनंतर प्रत्यक्ष भेटणार होते. त्या दिवशी मला दुपारपासूनच वातावरणात वेगळाच उत्साह जाणवत होता. पुष्कळ दिवसांनी संध्याकाळच्या वेळी गार वारा वहात होता. जणू काही प्रीतीस्वरूप सद्गुरु अनुताईंच्या आगमनाचा आनंद पंचमहाभूतांनाही होत होता.
१ आ. सद्गुरु अनुराधा वाडेकर आल्यावर घरात कार्यक्रमाची गडबड चालू असूनही शांतता आणि शीतलता जाणवून मन निर्विचार होणे : सद्गुरु अनुताई घरात आल्यावर मला एकदम शांतता आणि शीतलता जाणवून माझे मन निर्विचार झाले. प्रत्यक्षात त्या वेळी घरात पुष्कळ माणसे होती. तेथे कार्यक्रमाची गडबड चालू होती; परंतु सद्गुरु अनुताईंच्या येण्याने एका क्षणात सर्व काही पालटले. मला सभोवती असणार्या व्यक्तींची जाणीव न्यून होऊन माझे मन पूर्णपणे सद्गुरु अनुताईंकडेच खेचले गेले.
१ इ. ‘सद्गुरु अनुताईंकडून प्रीतीच्या स्पंदनांच्या मोठमोठ्या लाटा येत असून मी त्या लाटांमध्ये न्हाऊन निघत आहे’, असे साधिकेला जाणवणे अन् ‘त्यांच्याशी बोलण्यापेक्षा त्यांचे अस्तित्व अनुभवावे’, असे वाटणे : ‘सद्गुरु अनुताईंकडून प्रीतीच्या स्पंदनांच्या जणू मोठमोठ्या लाटाच माझ्या दिशेने येत असून ‘त्या लाटांमध्ये मी न्हाऊन निघत आहे’, असे मला जाणवत होते. त्यामुळे मला शीतलता जाणवत होती. त्या वेळी ‘सद्गुरु अनुताईंशी बोलण्यापेक्षा त्यांचे अस्तित्व अधिकाधिक अनुभवावे’, असे मला वाटत होते. ही सर्व प्रक्रिया आपोआपच चालू झाली. यात माझे काहीच प्रयत्न नव्हते. मी केवळ ते सर्व अनुभवत होते.
१ ई. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी जवळ घेतल्यावर साधिकेला ध्यान लागणे : सद्गुरु अनुताईंनी मला जवळ घेतले. त्या वेळी माझे ध्यान लागल्यासारखे झाले आणि ‘मी त्यांच्यात विरघळत आहे (माझे अस्तित्व अत्यल्प झाले आहे.)’, असे मला जाणवत होते. त्या वेळी माझे मन इतके शांत झाले होते की, आताही त्या क्षणाची आठवण झाल्यास मला तशीच अनुभूती येते.
१ उ. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचे पाय दाबण्याची संधी मिळणे, त्यांच्या चरणांचा स्पर्श लोण्याप्रमाणे मऊ जाणवणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चरण दाबण्याची इच्छा सद्गुरु अनुताईंच्या माध्यमातून पूर्ण होणे : त्या रात्री देवाने मला काही वेळ सद्गुरु अनुताईंचे पाय दाबण्याची संधी दिली. त्या वेळी सद्गुरु ताईंच्या चरणांचा स्पर्श मला लोण्याप्रमाणे मऊ जाणवला. ‘सद्गुरु अनुताई अधिक निर्गुण स्तरावर आहेत’, असे मला जाणवत होते. त्यांच्या चरणांकडे बघितल्यावर मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांचे स्मरण होत होते. माझ्या मनात अनेक दिवसांपासून ‘प.पू. गुरुदेवांचे चरण दाबावेत’, असा विचार येत होता. मी ‘प्रतिदिन रात्री त्यांचे चरण चेपून देणे आणि त्यांच्या पायांना मर्दन करणे’, अशा मानस कृती करत असे. ‘सद्गुरु अनुताईंच्या माध्यमातून प.पू. गुरुदेवांनी माझी इच्छा पूर्ण केली’, याबद्दल मनात पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होत होती.
२. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या सहवासात अनुभवलेले त्यांचे काही दैवी गुण !
अ. ‘साधेपणा’ हा सद्गुरु अनुताईंचा स्थायी भाव आहे. प.पू. गुरुदेवांप्रमाणे त्यांचे राहणीमान अत्यंत साधे; परंतु नीटनेटके आहे. ‘सद्गुरु अनुताई म्हणजे ईश्वराचे सगुण रूप, जे अतिशय सुंदर असून एका क्षणातच ‘आपण त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावे’, असे आहे.
आ. त्या सतत इतरांचा विचार करतात. ‘त्यांच्या मनात सतत इतरांच्या आनंदाचाच विचार असतो’, असे मला जाणवले.
इ. त्या सर्वांमध्ये मिसळलेल्या असूनही एका क्षणासाठीही त्यांच्या भावस्थितीतून बाहेर येत नाहीत.
ई. त्या अखंड अनुसंधानात आणि शिष्यभावातच असतात. सद्गुरु अनुताई बोलण्यात सतत ‘प.पू. गुरुदेवांची आपल्यावर कशी आणि किती कृपा आहे ! आपण त्यांच्याचमुळे आहोत’, अशी कृतज्ञता व्यक्त करणारी वाक्ये असतात. त्यामुळे त्यांच्या समवेत असणार्या प्रत्येक साधकाचा भाव जागृत होतो.
उ. वैष्णवीच्या विवाहाच्या निमित्ताने पू. (सौ.) जाधवकाकूंचे नातेवाईक आले होते. सद्गुरु अनुताईंनी त्या सर्वांची प्रेमाने विचारपूस केली. त्यामुळे सर्वांना पुष्कळ आनंद मिळाला.
ऊ. सद्गुरु अनुताई सद्गुरु पदावर असूनही कोणालाच आपले वेगळेपण जाणवू देत नाहीत. त्या सर्वांमध्ये असूनही नसल्यासारख्या वाटत होत्या.
‘सद्गुरु अनुताईंच्या सत्संगात आपल्या मनाची स्थिती आपोआप पालटते’, असे लक्षात आले.
३. सद्गुरु अनुताईंनी केलेल्या प्रीतीच्या वर्षावाचे वर्णन करणे शब्दातीत असणे
काही घंट्यांच्या सत्संगात सद्गुरु अनुताईंनी माझ्यावर प्रीतीचा इतका वर्षाव केला की, त्याबद्दल शब्दांतून कृतज्ञता व्यक्त होणे अशक्य आहे. सद्गुरु अनुताई म्हणजे प.पू. गुरुदेवांच्या शिकवणीचे, त्यांच्या सर्वच गुणांचे मूर्तीमंत रूप, ज्याचे शब्दांत वर्णन करणे अशक्य आहे. ‘त्या प.पू. गुरुदेवांची तत्त्वे प्रत्येक श्वासागणिक जगतात’, असे मला जाणवते.
‘सद्गुरु अनुताईंचा सहवास मिळणे आणि त्यांची प्रीती अनुभवता येणे’, ही प.पू. गुरुदेवांची माझ्यावर असलेली अपार कृपा आहे. ‘मला सद्गुरु अनुताईंकडून शिकता येऊ दे आणि प.पू. गुरुदेवांना अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न करता येऊ देत’, हीच प.पू. गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना आहे.
– सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) फोंडा, गोवा. (२.१२.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |