नवाब मलिक यांच्यावरील देशद्रोहाच्या आरोपांचा विरोधकांकडून विधान परिषदेत पुनरोच्चार !

त्यागपत्रासाठी घोषणा देत केला सभात्याग !

.कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहीम आणि अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक

मुंबई, ३ मार्च (वार्ता.) – कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहीम याच्याशी संबंध असल्याचा आरोप करत ३ मार्च या दिवशी विरोधकांनी विधान परिषदेत अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या त्यागपत्राची मागणी केली. नवाब मलिक आणि सत्ताधारी यांच्या निषेधाचे फलक दाखवत मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विरोधकांनी सभात्याग केला. विधान परिषदेच्या कामकाजाला प्रारंभ झाल्यावर विरोधकांनी सभापतींच्या आसनापुढील जागेत येऊन सत्ताधारी आणि नवाब यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या

या वेळी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, नवाब मलिक यांनी दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्याशी आर्थिक व्यवहार केले आहेत. हा थेट दाऊद याच्याशी संबंध आहे. नवाब मलिक कारागृहातून मंत्रीपदाचे कामकाज पहाणार आहेत का ? त्यामुळे मलिक यांनी त्यागपत्र द्यावे.

या वेळी गोंधळात सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज चालू ठेवले. नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय, राज्यपालांचे अभिभाषण पटलावर ठेवणे, अभिभाषणाविषयी आभार प्रदर्शन, विधेयके पटलावर ठेवणे, शोकप्रस्ताव आदी कामकाज गोंधळातच रेटवण्यात आले.

सभापतींनी प्रवीण दरेकर यांना २ मिनिटे बोलण्याची संधी दिली; मात्र या वेळीही सभागृहात गोंधळ होता. त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी बोलण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचे भाषण सभागृहाच्या पटालावर घेण्यात येणार नसल्याचे सभापतींनी सांगितले.